‘अय्या तुला तर मिशा आहेत.’
तिच्या दोन वेण्या बांधून पूर्ण होत नाही ऐवढ्यात तो समोरून ओरडला.
‘थांब बाकींच्यांना पण सांगतो तुला मिशा आहेत त्या.’ तो ओरडत पळाला. तिला तर मेल्याहून मेल्यासारखं झालं.
‘त्यानं सगळ्यांना सांगितलं तर? एकतर तो कमालीचा आगाऊ आणि मस्तीखोर. त्यातून त्यानं इतरांना सांगितलं तर शाळेत सगळेच मला चिडवतील’ ती घाबरून गेली. तिनं धावत जाऊन पहिल्यांदा आरशात पाहिलं.
‘हो की खरंच मिशा दिसतायत’. अगदी त्याच्यासारख्या नाहीत पण हलकीशी लव ओठांवर दिसत होती. तिच्या उजळ वर्णावर तर ती जास्त उठून दिसत होती. आतापर्यंत ही गोष्ट तिच्याही लक्षात आली नव्हती.
‘यालाच बरं दिसलं हे’. तिच्या मनात आलं अन् तिला तर रडूच कोसळलं.
‘माझ्या मिश्या पप्पांसारख्या होणार का? की मामासारख्या? या आता कधीच जाणार नाहीत का?’ विचार करून तिच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू थांबतच नव्हते.
‘मला शाळेत जायचं नाही, तिनं उशी तोंडावर दाबली आणि हमसून हमसून रडायला लागली. शेवटी आई जाऊन त्या मुलाला ओरडली. तिला कधीही चिडवणार नाही असं त्यानं आईसमोर कबूल केलं तेव्हा कुठे तिची भीती दूर झाली. पण ती शाळेत गेली तरी मिशांचा विचार मात्र तिच्या डोक्यातून जात नव्हता.
‘अगं एवढं विचार करण्यासारखं काय आहे त्यात? असं बऱ्याच मुलींना असतं, तू आता वयात येतेस. शरीरात बदल होतात. हॉर्मोनल चेंजेंसमुळे येतं असं कधी कधी. काही मुलींच्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात, काही जाड्या होतात, काहींना पाळी येत नाही, तसाच तुझ्यातही तो बदल होत आहे. बघ प्रत्येक बाईच्या शरीरात मेल हॉर्मोन्स असतात, पण त्यांचं प्रमाण हे नियंत्रणात किंवा खूपच कमी असतं. पण अनेकदा हॉर्मोनल इम्बॅलेन्समुळे मेल हॉर्मोन्सचं प्रमाण बाईच्या शरीरात वाढतं आणि परिणामी चेहऱ्यावर विशेषत: हनुवटीवर आणि ओठांवर केस येऊ लागतात.’ तिला हे सगळं ऐकून अक्षरश: किळस वाटला. आता त्या प्रसंगाला किमान आठ नऊ वर्षे उलटली असतील. पण, आजही या मिशांनी तिचा पिच्छा काही सोडला नाही. ‘दाढी मिशांतली सुंदर मुलगी’ असं विशेषणच तिनं स्वत:ला लावून घेतलं होतं. एव्हाना मिशा दाढी चेहऱ्यावर घेऊन मिरवण्याची तिला सवयच झाली होती. त्यातून काही वर्षांनी तर ट्रेनमधल्या सुंदर मुलींकडे पाहणं, विशेषत: त्यांच्या चेहऱ्याकडे हा दाढी मिशीतल्या मुलीचा नवा उद्योगच झाला होता.
‘wow, कसली सुंदर दिसतेय यार ती?’
‘हो ना! तिची स्किन तर बघ ना कसली आहे.’
‘तिच्या चेहऱ्याकडे तर बघ ना, एकपण केस नाही, काश मी पण तिच्यासारखीच असते.
‘अगं ए कुठून कुठे गेलीस…?’
‘nothing !’
तिनं दुसरीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत मोबाईलची स्क्रीन आपल्या ओठांजवळ नेली.
‘hmmm.. साले पुन्हा आले.. आताच तर अपरलिप्स केले होते. दहा दिवसपण झाले नाही अन् उगवले पुन्हा. काय माझं शरीर आहे यार उद्या ओठांच्यावर थोड्या बिया पेरल्या तरी दोन दिवसांत उगवतील.’ उगाचंच तिला काहीतरी थुकराट जोक सुचला. ती दाढी मिशीतली सुंदर मुलगी गालातल्या गालात हसली. मी त्यांच्यापेक्षा कशी वेगळी आहे, कोणत्या तारखेला अपरलिप्स, चिन केलं तर जास्त चांगलं, मग किती दिवसांनी करावं याचं गणित मांडण्यात तिचा प्रवासातला वेळ जायचा, कधी कधी आपल्यासारखी एखादी मुलगी महिलांच्या घोळक्यात दिसली की तिला हायसं वाटायचं. ट्रेनमध्ये थोड्यावेळापूर्वी दिसलेल्या त्या सुंदर महिलांचे चेहरे आठवल्यावर आपल्याही चेहऱ्यावरही ‘सोपस्करण’ करण्याची वेळ आली आहे हे तिला आठवलं. ती ट्रेनमधून खाली उतरली अन् पार्लरच्या दिशेनं चालू लागली.
‘हा मॅडम बोलो क्या करना है?’
‘अपरलिप्स, चिन’
ब्युटिशीअननं एक तुच्छ कटाक्ष तिच्याकडे टाकला.
‘अरे मॅडम आप तो पिछलेही हफ्ते आयी थी ना. इतनी जल्दी बढ गये बाल’
‘हा’ दाढी मिशीतल्या मुलीला तर मेल्याहून मेल्यासारखं झालं.
थ्रेड फिरवत, ‘हाय कितने मोटे, सक्त हे ये बाल, जान निकल जाती है निकालते निकालते’
‘अगं बाई तुझ्यापेक्षा माझा जीव जातो, शिवाय हुप्प्यासारखं पुढचे दोन तीन तास तोंड लाल होतं ते वेगळंच. तुला काय माझं दु:ख माहिती’ ती पुटपुटली. .
‘मॅडम अगली बार आप आओगे तो वॅक्स करना. दो हफ्ते तक छुटकारा मिलेगा’
‘ hmm, म्हणजे ७० रुपयांची फोडणी तर, त्यातून महिन्यातून तीनदा म्हणजे २१० रुपये झाले.” तिनं हिशोब मांडला.
पाच सहा दिवस नको असलेल्या केसांपासून दाढी मिशीतल्या मुलीनं पिच्छा सोडवून घेतला असला तरी सातव्या दिवशी त्यांनी पुन्हा डोकं वर काढायला सुरूवात केली होती. आता तर ओठांवर हलकीशी निळसर काळसर रेषही आली होती. आईला डॉक्टरकडे घेऊन जायचं आहे तिला आठवलं.
‘आधी पार्लरमध्ये जाऊन मग डॉक्टरकडे जाऊयात का?’ उगाच तिच्या मनात विचार आला.
पण ती थांबली. ‘कशाला उगाच? डॉक्टर थोडीच मला बघणार आहे.’
ती डॉक्टरकडे गेली, नशीबानं समोरची डॉक्टर महिला असल्यानं तिला हायसं वाटलं. आईची तपासणी झाल्यानंतर त्या डॉक्टरनं दोघींकडे पाहिलं.
‘ही तुमची मुलगी का?’
‘हो’ आईनं हसून उत्तर दिलं.
‘मुलगी छान आहे तुमची दिसायला, उजळही आहे. तुमच्यापेक्षाही छान दिसते पण…’
‘पण काय?’
‘हिला जरा जास्तच मिश्या आहेत नाही का वाटतं तुम्हाला?, म्हणजे इतकं सगळं सुंदर आणि तेवढंच जरा खटकतं.’
‘हो, ना. आमच्या घरात हिलाच जरा जास्त..’ आई काही बोलणार एवढ्यात दाढी मिशीतल्या मुलीनं आईकडे रागानं एक कटाक्ष टाकला. विषय तिथेच थांबला.
दाढी मिशीतल्या मुलीचा वाढदिवस होता, कट्ट्यावर मिशीतल्या त्या सुंदर मुलीला गिफ्ट काय द्यायंचं अशी चर्चा रंगली. त्यात कोणीतरी म्हणालं फार डोक्याला ताण का देताय? अरे रेझर, शेव्हिंग क्रिम द्या. तिचा पार्लरचा खर्च तरी वाचेल, मित्रांची चर्चा ऐकून दाढी मिशीतल्या मुलीला ओशाळल्यागतच झालं. कॉलेजच्या कट्ट्यावर अशा चर्चा आणि होणारी हेटाळणी काही दाढी मिशीतल्या मुलीला नवीन नव्हती. एकदातर कट्ट्यावरच्या ‘ट्रुथ आणि डेअर’ खेळात एका मुलानं तुला खरंच मिश्या येतात का? असा प्रश्न तिला विचारला होतं. कट्ट्यावर सगळेच किती खो खो हसले होते तिच्यावर तिला आठवलं. त्यानंतर मुलांशी जाऊन बोलण्याचा प्रयत्नही तिनं केला नाही. देव जाणे उगाचच कोणाचं तरी लक्ष ओठांवर जायचं आणि कोणीतरी त्याचवरून प्रश्न विचारायचं. तिला तर कल्पनाच करुन भयंकर भीती वाटू लागली.
‘तू एक काम कर ना पार्लरमध्ये नेहमी नेहमी जाण्यापेक्षा गुगलवर ‘how to remove unwanted facial hair’ टाकून बघ म्हणजे तुला ना उपाय सापडतील. ती कुरळ्या केसांची बाई आहे ना तिचे उपाय एकदम बेस्ट असतात.बघ लगेच जातील ते’
मिशीतल्या मुलीनं लगेच गुगल केलं. दहा पंधरा उपाय सापडले, मिशीतल्या मुलीचा चेहरा खुलला.
‘ऐ तू कांदा खूप खातेस का?’
‘काय संबंध? ‘
‘कांदा खाल्ला किंवा … मटण खाल्लं की केस येतात म्हणे’
‘ई काहीतरी काय..? मिशीतल्या मुलीचा चेहरा लगेच पडला.’
‘बरं ते जाऊ दे. तुला पाहायला आलेल्या त्या मुलाचं काय झालं ?’
‘काही नाही अगं त्यादिवशी आम्ही भेटलो, फोटो पाहिल्यावर आवडली त्याला, पण ज्यादिवशी भेटलो त्यादिवशी नेमका मला अपरलिप्स करायला वेळ मिळाला नाही त्यानं माझ्याकडे पाहिलं अन् मग नकार कळवला. काय तर म्हणे मुलीला मिशा आहेत. जसं काय मला पुरुषांसारख्याच गच्च मिश्याच येतात असंच तो बोलत होता.’
असो मिशीतल्या मुलीनं पुन्हा एकदा मोबाइलची स्क्रिन ओठांजवळ नेली आणि आपल्या मिसुरड्यांकडे पाहिलं. चेहऱ्यावरचे ते केस सोडले तर आपण किती सुंदर दिसतो. बाकी कोणी काहीही म्हणो. तिनं स्वत:लाच शाबासकी दिली. येत असतील एखाद्या बाईच्या चेहऱ्यावर पुरुषांप्रमाणे केस, त्यानं काय बिघडतं? म्हणून का ती बाई होत नाही असं थोडीच होतं. प्रत्येक बाईचं वेगळेपण असतं, कदाचित या मिशाच आपल्याला इतरांपासून वेगळं ठरवत असतील तिच्या मनात नकळत विचार आला आणि तिला तिचाच अभिमान वाटू लागला.
प्रतीक्षा चौकेकर
pratiksha.choukekar@loksatta.com