इंजिनीअरिंग केल्यानंतर रुक्मिणी जॉबला लागली. वयाच्या २५ व्या वर्षी तिला नोकरी लागली. नोकरीची पहिली काही वर्ष तिला आयुष्यात आपल्याला नक्की काय करायचं आहे हे समजण्यातच गेली. तोवर घरच्यांनी तिच्याकडे लग्नाचा विषय काढला. रुक्मिणी याबाबतही संभ्रमात होती की तिला खरंच लग्न करायचं आहे की नाही. एकीकडे दररोज फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर मित्र- मैत्रिणींच्या लग्नाचे, साखरपुड्याचे, प्री- वेडिंगचे फोटो पाहून ती वैतागली होती. आपल्या आयुष्यातही एखादा मुलगा असावा असं तिलाही वाटायचं. पण आपण त्या जबाबदाऱ्या घ्यायला खरंच सक्षम आहोत का असा प्रश्नही ती स्वतःलाच विचारायची. दुसरीकडे ती स्वतःचीच कंपनी एन्जॉय करत होती. नवीन नोकरी, नवीन मित्र- मैत्रिणी, हिंडणं- फिरणं ती एन्जॉय करत होती. त्यामुळे सध्या तरी लग्नासाठीचा जोडीदार हवा असा कोणताही विचार तिच्या डोक्यात नव्हता. पण हे तिच्या घरच्यांना पटणं अशक्यच होतं.
अनेकदा २७ आणि २८ व्या वर्षी मुलींवर लग्न करण्याचा एवढा दबाव टाकला जातो की, त्यांच्या आयुष्यात लग्नाशिवाय दुसरं काही महत्त्वाचं नाहीच असा विचार घरच्यांप्रमाणेच त्या मुलीही करु लागतात. पण रुक्मिणीचं तसं नव्हतं. तिच्यासमोर तिचं करिअर होतं, जे तिला इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा प्रिय होतं. त्यात तिने कोणतीच तडजोड केली नव्हती वा भविष्यात करण्याचीही तिची तयारी नव्हती. खूप काम करावं, भटकंती करावी, मित्र- मैत्रिणींमध्ये रहावं एवढीच तिची आयुष्याकडून माफक अपेक्षा होती. पण तिच्या या अपेक्षा या समाजासाठी नातेवाईकांसाठी नुसता थिल्लरपणा होता. वयाच्या २७ व्या वर्षीही रुक्मिणीच्या आयुष्यात महत्त्वपूर्ण असणाऱ्या गोष्टींमध्ये लग्न कुठेच नाही याचे तिच्या घरच्यांना आश्चर्य वाटायचे.
रुक्मिणीला कधीच लग्न करायचे नव्हते असे नाही. पण तिला सध्या तरी लग्नाची कोणतीच घाई नव्हती. एखादी नोकरी बदलावी, चांगला पगार घ्यावा एखादी प्रॉपर्टी खरेदी करावी याचाच विचार ती करत होती. तिने तिचे भविष्याचे नियोजन घरच्यांना सांगितलं. घरच्यांनीही याचं स्वागत केलं. पण प्रत्येक स्वप्नात त्यांनी लग्न जोडलं. म्हणजे लग्नानंतरही नोकरी बदलू शकते… लग्नानंतरही पगार वाढेल…. लग्नानंतरही स्वतःचं घर घेऊ शकते… त्यात नवऱ्याच्या पगाराचीही मदत होईलच. तिच्या प्रत्येक स्वप्नात कळत- नकळत लग्न येतच होतं.
काही झाले तरी रुक्मिणीनेही आपली सगळी स्वप्न साकार झाल्याशिवाय लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. पण अनेकदा निर्णय घेणं सोपं असतं पण त्या निर्णयावर चालणं कठीण. ती एकटी विरुद्ध कुटुंब आणि समाज असा झगडा तिला करावा लागत आहे. लग्न न करणं याकडे आपल्या समाजात आजही भुवया उंचावूनच बघितलं जातं याची तिला पूर्ण कल्पना आहे. पण रुक्मिणीने घरच्यांकडे वेळ मागितला आहे. पण तो देण्याची तयारी तिच्या घरच्यांची नाही. घरच्यांनी लव्ह मॅरेजलाही परवानगी दिली आहे. पण तिलाच इतक्यात लग्न करायचे नाही. रुक्मिणीला फक्त घरच्यांचा किंवा नातेवाईकांचाच सामना करावा लागतो असे नाही तर ऑफिसमध्येही यावर्षी तरी लग्नाचा बार उडणार का? असे प्रश्न विचारले जातात. २६ वर्षानंंतर ते ३० पर्यंत कुटुंबाकडून आणि समाजाकडून लग्न करण्यासाठी केली जाणारी जबरदस्ती किती भयंकर असते हे रुक्मिणी फक्त ऐकत आली होती. आता ती ते अनुभवत आहे.
स्वप्न साकार करण्याच्या प्रवासात तिला लग्नाचा अडथळा नकोय. ती आतापर्यंत तिचं आयुष्य खुलेपणाने जगत आली आहे आणि पुढेही तिला याच पद्धतीने जगायचे आहे. मनमोकळ्या पद्धतीने आयुष्य जगताना आयुष्याच्या एका वळणार जर तो भेटला तर त्याचं ती नक्कीच स्वागत करेल. त्याच्यासोबतच ती भविष्याची स्वप्नही रंगवेल. पण २७ वय झालंय म्हणून ठरवून तो शोधण्याचा अट्टाहास तिला करायचा नाही. तुमच्याही दिसण्यात अशी कोणी रुक्मिणी आहे का जी २७ वर्षांची आहे पण तिला इतक्यात लग्न करायचं नाही? अशी कोणी रुक्मिणी असल्यास आम्हाला नक्की सांगा…
मधुरा नेरुरकर
madhura.nerurkar@loksatta.com