सध्याचे धावपळीचे जीवन आणि वाढणारे आजार पाहता प्रत्येकानेच दिवसातील काही वेळ व्यायामासाठी राखून ठेवणे गरजेचे आहे. आजकाल अनेकजण जिममध्ये जाऊन व्यायाम करतात. यासाठी शरीरात स्टॅमिना आणि ऊर्जा असणे अत्यंत आवश्यक आहे. हाच स्टॅमिना आणि ऊर्जा आपल्याला आपल्या आहारातून मिळतो. म्हणूनच वर्कआऊट करण्याआधी आणि त्यानंतर आपला आहार कसा असावा याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.

जे लोक खूप काळापासून वर्कआऊट करत आहेत किंवा जे यातील तज्ज्ञ आहेत ते आपल्या आहाराबाबत जागरूक असतात. मात्र जे लोक बिगनर्स आहेत त्यांना याबाबत पुरेशी माहिती नसते. जिममध्ये वर्कआऊट करण्याआधी आणि वर्कआऊट केल्यानंतरच्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश असावा याबाबत त्यांना कल्पना नसते. मात्र आता चिंता करण्याची गरज नाही. आज आपण जिममध्ये वर्कआऊट करण्याआधी आणि वर्कआऊट केल्यानंतरचा आहार कसा असावा याबाबत माहिती जाणून घेणार आहोत.

अनेक अभ्यासांमध्ये असे आढळून आले आहे की वर्कआऊट करण्याआधी योग्य आहार केल्यास तुमच्या शरीरातील ऊर्जा वाढते आणि तुम्हाला लवकर थकवा येत नाही. या आहारात कोणकोणत्या पदार्थांचा समावेश असावा हे पाहुयात.

Health News : ‘या’ पाच कारणांमुळे येऊ शकतात हातापायांना मुंग्या; असू शकते गंभीर आजारांचे संकेत

जेव्हा तुम्ही जिममध्ये व्यायाम करायला जाता तेव्हा तुम्हाला एक तास आधी काही तरी खाणे गरजेचे असते. यालाच प्री-वर्कआऊट मील असे म्हणतात. प्रत्येक व्यक्तीच्या गरजेनुसार या आहारातील पदार्थ वेगवेगळे असू शकतात.

तुमचा व्यायामाआधीचा आहार कसा असावा?

व्यायामाच्या एक तास आधी तुम्ही प्रथिने आणि कर्बोदकांचे सेवन केले पाहिजे. मात्र या जेवणात फॅट्सचे सेवन करण्याची अजिबात घेण्याची गरज नाही, कारण फॅटमुळे तुमची शोषण प्रक्रिया मंदावते. प्रथिनांमध्ये अनेक एमिनो अ‍ॅसिड असतात जे स्नायू तुटण्यास प्रतिबंध करतात. वर्कआऊट दरम्यान आपले शरीर अ‍ॅनाबॉलिक राहावेत आणि स्नायू तुटू नयेत म्हणून आहारात प्रथिनांचा समावेश असावा.

या आहारात तुम्ही अंड्यामधील पांढऱ्या भागाचा समावेश करू शकता. यामध्ये असलेली प्रथिने वर्कआऊट दरम्यान तुमचे स्नायू तुटण्यापासून प्रतिबंध करतील. तसेच, यामध्ये असलेली कर्बोदके तुम्हाला एक ते दोन तासांसाठी ऊर्जा प्रदान करतात. तुम्हाला वर्कआउट्स दरम्यान आवश्यक असलेले ग्लुकोज आणि एमिनो अ‍ॅसिड प्रोटीनमधून मिळतील, त्यामुळे तुम्हाला फॅट्सची गरज भासणार नाही. प्री-वर्कआऊट मीलमध्ये तुम्ही तीन अंड्याचा पांढरा भाग आणि एक केळे यांचा समावेश करू शकता. मात्र हे अन्न पचायला वेळ लागतो म्हणून एक ते दीड तास आधी हा आहार घेणे उत्तम.

Health News : रात्री उशिरा जेवल्यामुळे खरंच वजन वाढतं? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात

व्यायामानंतरचा आहार कसा असावा?

व्यायामानंतरचा आहार शरीरासाठी अतिशय आवश्यक असतो. मात्र अनेकजण हा आहार टाळतात. व्यायामादरम्यान तुमचे स्नायू तुटतात, त्यामुळे हे स्नायू दुरुस्त करण्यासाठी शरीराला एमिनो अ‍ॅसिड आणि प्रथिनांची आवश्यकता असते. व्यायामानंतरच्या आहारात तुम्ही व्हे प्रोटीन, अंड्याचा पांढरा इत्यादीचा समावेश करू शकता. तसेच वर्कआऊट दरम्यान पोषणाची कमतरता पूर्ण करण्यासाठी तुम्ही फळे, ग्लुकोज यांचेदेखील सेवन करू शकता.

वर्कआउटच्या एक तासानंतर तुम्हाला पूर्ण जेवण म्हणजे कार्ब, प्रोटीन आणि फॅट घ्यावे लागेल. यामध्ये तुम्ही ब्राऊन राइस, पनीर, चपाती, चिकन, भाजी, मासे, रताळे, कोशिंबीर इत्यादींचे सेवन करू शकता.

प्री-वर्कआऊट आणि पोस्ट-वर्कआऊट मील हे व्यायामाच्या एक तास आधी आणि एक तास नंतर घ्यावे. तसेच, तुमचे शरीर योग्य आकारात आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी तुमच्या दिवसभराच्या जेवणाचे योग्य संतुलन राखणे अतिशय आवश्यक आहे. असे केले तरच तुम्हाला योग्य पोषण मिळेल.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता कृपया आरोग्य तज्ञ किंवा तुमच्या फिटनेस ट्रेनरचा सल्ला घ्यावा.)

Story img Loader