World Art Day Art and Income Source :उपजीविकेसाठी शिक्षण जरूर घ्या; पण तेवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ यातल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील; पण कलेशी जडलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल, असा मौलिक सल्ला पु. ल. देशपांडे देऊन गेले. प्रत्येकानं आयुष्यात एखाद्या तरी कलेशी मैत्री जरूर करावी. खरं तर कला आयुष्याला समृद्ध करते. कला आयुष्यात रंग भरते. कला ही विविध गोष्टींतून आपल्याला दिसून येत असते. ही कला जोपासण्याचे आणि तिचे अस्तित्व टिकवून ठेवण्याचे काम हे आपणच केले पाहिजे. आता तुम्ही म्हणाल हे सगळं करीत बसलो, तर पोटापाण्याचं काय? तर याची चिंता आता तुम्हाला करावी लागणार नाही. कारण- कलेमुळे तुमच्या करिअरला नवी दिशा मिळू शकते. तुम्हाला अवगत असलेल्या वेगवेगळ्या कलांचा तुम्ही तुमच्या करिअरमध्ये वापर करू शकता आणि तुमच्या करिअरला कलाटणी देऊ शकता. आज १५ एप्रिल जागतिक कला दिवस आहे. त्यानिमित्त कलेमुळे तुमच्या करिअरला कशी नवी दिशा मिळू शकते याबद्दल सविस्तर पाहू या..

कला आणि छंद आपल्याला रोजच्या धावपळीत काही आनंदाचे क्षण देऊन जातात. आपल्या आजूबाजूलाच असे अनेक लोक आहेत की, ज्यांनी त्यांना अवगत असलेल्या कलागुणांच्या बळावर स्वत:च करिअर उभं केलं आहे. मात्र, अजूनही आपल्या समाजात चांगल्या गल्लेगठ्ठ पगाराची नोकरी म्हणजेच चांगलं करिअर, असं मानलं जातं आणि त्यावरून समोरच्याची पात्रता ठरवली जाते. करिअर म्हणजे काहीतरी क्लिष्ट, गुंतागंतीचं किंवा खूप अभ्यास किंवा आयटी कंपन्यांमधील नोकरी किंवा ‘पॅकेज’ म्हणजेच करिअर असतं, असा साचा आपण बनवला आहे आणि पुढच्या पिढीकडेही तो तसाच सोपवला जातोय. त्यामुळे आपल्याला मोठ्या कंपनीत नोकरी नाही किंवा आपलं चांगलं ‘पॅकेज’ नाही, असं तरुण पिढीला वाटत राहतं आणि मग नैराश्य येतं. मात्र, या नैराश्यातून किंवा मानसिक ताणातूनही कलाच आपल्याला बाहेर काढते. त्यासाठी डॉक्टरही ‘कला उपचार’ घेण्याचा सल्ला देतात.

school Annual day function viral video
‘शाळेच्या त्या सोनेरी आठवणी…’ मैदानात सराव, मेकअपसाठी एकच फाउंडेशन अन् बरंच काही; VIRAL VIDEO पाहून आठवेल शाळेतला वार्षिकोत्सव
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Kalgitura play selected at Bharangam International Festival in New Delhi
दिल्लीतील भारंगम आंतरराष्ट्रीय महोत्सवात नाशिकचा ‘कलगीतुरा’
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला मिळेल प्रार्थनेचे फळ तर व्यवसायिकांचा असेल सोन्याचा दिवस, वाचा तुमचे राशिभविष्य
Annual flower exhibition detail update
निसर्गलिपी : फुलांच्या वार्षिक प्रदर्शनांना जाच!
Thane, Chitrarath, Constitution, New Year Swagat Yatra,
ठाणे : यंदाच्या नववर्षे स्वागत यात्रेत ‘संविधान’ विषयावर चित्ररथ
restoration work of Tuljabhavani temple is underway under supervision of Archaeological Department
तुळजाभवानी मंदिराला मिळणार पुरातन झळाळी, जीर्णोध्दाराचे काम पुरातत्व खात्याच्या निगराणीखाली वेगात सुरू
Viral Video Shows Man Sign Birthday Song In Marathi
‘तुझा आहे बर्थडे…’ आता वाढदिवसाला मराठी गाणं गात द्या शुभेच्छा; VIRAL VIDEO पाहून हसाल पोट धरून

कला उपचार म्हणजे काय?

पेंटिंग, चित्रकला, शिल्पकला किंवा कोलाज तयार करणे, नृत्य आदी उपक्रमांमध्ये स्वत:ला गुंतवून घेऊन व्यक्ती तणावातून बाहेर पडू शकते.

तुम्हाला गणितातील काही माहिती नसल्यास फारसं काही बिघडत नाही; पण कलेविषयीची ओढ, जिज्ञासा, कल्पनाशक्ती कामाला येते. ज्यानं ही संपूर्ण सृष्टी रचली, त्याच गणरायाला फक्त कलाकार घडवतो. त्यामुळे या कलेला आणि कल्पकतेला जगभरात कुठेच आव्हान नाही. कोणतीही कला ही आनंद देणारी असते. कलेचा आनंद कलाकाराबरोबरच इतरांनादेखील मिळतो. अशाच काही कलाकारांविषयी आणि त्यांनी त्यांना अवगत असलेल्या कलांचा त्यांच्या आयुष्यात कसा फायदा करून घेतला किंवा त्यांनी कलेचा करिअरमध्ये कसा उपयोग करून घेतला याबद्दल जाणून घेऊ या.

भरतनाट्यम शिक्षिका राधिका कुलकर्णी यांनी त्यांच्या कलेचा उपयोग हा करिअरमध्ये केला. यावेळी “कलाप्रकाराची आवड असणाऱ्यांसाठी भरतनाट्यम नृत्यांगना हे करिअर असू शकते”, असं त्या सांगतात. एकदा तुम्ही नृत्याच्या विशिष्ट प्रकारात योग्य पात्रता व अनुभव प्राप्त केलात आणि शिकवण्याची आवड निर्माण झाली की, तुम्ही निश्चितपणे त्या दृष्टीने करिअरला सुरुवात करू शकता. व्यावसायिक भरतनाट्यम, नर्तक सादरीकरण, अध्यापन, नृत्यदिग्दर्शन व कार्यशाळा यांद्वारे जगू शकता. कौशल्य पातळी, प्रतिष्ठा, मागणी व स्थान यांसारख्या घटकांवर अवलंबून उत्पन्न मोठ्या प्रमाणात बदलू शकते. भरतनाट्यम नृत्यांगना हा करिअरचा पर्याय आहे; पण इतर पारंपरिक करिअरपेक्षा तो खूप वेगळा आहे. अनेक नर्तकांचे स्वतःचे YouTube चॅनेल किंवा ऑनलाइन क्लास आहेत; ज्याद्वारे ते पैसेदेखील कमवू शकतात.” भरतनाट्यमचे फायदे सांगताना राधिका कुलकर्णी सांगतात, “भरतनाट्यम तुम्हाला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या मजबूत बनवते.” तसंच त्यांनी जेव्हा त्यांच्या कलेची प्रोफेशन म्हणून निवड केली त्यावेळी अनेकांनी त्यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. मात्र त्यांनी सातत्य ठेवून हे सुरुच ठेवलं. त्या सध्या शिवमुद्रा नावाचा त्यांचा स्वत:चा क्लास चालवत आहेत.

चित्रकलेच्या शिक्षिका अदिती राणे सांगतात, “कलेची आवड असणाऱ्यांना ती शिकवून येत नाही. ती मुळातच काही मुलांमध्ये असते. आपली आवड कशात आहे, हे जर मुलांनी ओळखलं तर त्यांना त्यांचं करिअर निवडणं सोपं जाईल. चित्र काढण्याची काही मुलांना खूपच आवड असते. तो कोणत्याही गोष्टीचे स्केच सहज तयार करू शकतो. मात्र, त्यासाठी त्यांना लहानपणापासून चित्रकलेचा छंद जोपासण्यास सांगितलं जातं; पण आता तसं राहिलेलं नाही. जर तुम्हाला चित्र काढण्यात रस असेल, तर तुम्ही त्यात करिअर करू शकता. छंद आणि व्यवसाय वा नोकरी एकच असल्यामुळे ते लोक आपलं काम खूप ‘एन्जॉय’ करू शकतात आणि आपल्या कामात चांगलं यशही मिळवू शकतात. अदिती सांगतात, पूर्वी चित्रकलेत फार संधी नव्हत्या मात्र आता कलाकारांना आणि कलेला प्रचंड मागणी आहे. त्यामुळे पूर्वी जो विरोध मला झाला तो आताच्या पिढीला होत नाही कारण तेवढ्या संधी उपलब्ध आहेत.

हेही वाचा >> लग्नाचा बस्ता म्हणजे नेमकं काय? ऐंशी वर्षांची परंपरा अन् काळानुसार बदलेला ट्रेंड; जाणून घ्या इतिहास…

मेकअप आणि मेंदी आर्टिस्ट कोमल गायकवाड यांनी त्यांच्यातील कलेचा करिअरमध्ये कसा उपयोग केला हे त्या सांगतात. “मेकअपकडे तो एक क्रिएटिव्ह आणि आकर्षक करिअर पर्याय म्हणून पाहिले जाते. आपल्यात असलेली कला लोकांपर्यंत पोहोचवणं आणि त्यातून उत्पन्न मिळवणं हा एक चांगला पर्याय आहे. त्याद्वारे आपण स्वत:चा बिझनेसही सुरू करू शकतो. अनेक ब्युटी मेकअप ट्रेनिंग आणि एज्युकेशन अकादमींमधून मूलभूत आणि प्रगत अभ्यासक्रम घेऊन प्रमाणपत्रं मिळवता येतात. त्यामुळे तुम्हाला स्वत:चा स्टार्टअप सुरू करून तुमची ओळख सिद्ध करता येईल. हल्ली मेकअप आणि मेंदीला प्रचंड मागणी आहे. त्यानुसार या बिझनेसमध्ये कधीही मरण नाही. जोपर्यंत लग्न समारंभ सुरू राहणार तोपर्यंत यामध्ये तुमचं करिअर उज्ज्वलच आहे”, असं कोमल सांगतात. तसेच सुरुवातीला घरातून या प्रोफेशनला पाठिंबा नसल्याचं त्या सांगतात मात्र लोकांचा प्रतिसाद पाहिल्यानंतर घरीही या करिअरला सपोर्ट मिळाल्याचं त्या सांगतात.

लग्न पाहावं करून आणि घर पाहावं बांधून याप्रमाणे लग्न व्यवस्थापन हा अतिशय कठीण विषय आहे. त्यात आता पूर्वी व्हायचं तसं लग्न म्हणजे फक्त पारंपरिक रीतीरिवाजानुसार होणारं लग्न राहिलेलं नाही.. बदलत्या काळानुसार अनेक गोष्टी लग्नापूर्वी ते लग्नापर्यंत केल्या जातात; जसे की प्री-वेडिंग शूट, नवरीचे ते हळदीचे फुला-फुलांचे दागिने, रुखवत. रुखवत पूर्वी घरी बनवलं जायचं; मात्र हल्ली रुखवत बनविण्यासाठी बाहेर ऑर्डर दिली जाते. याच मागणीचा विचार करून कित्येक गृहिणींनी त्यांच्या या कलेचं व्यवसायांत रूपांतर केलं आहे. अशाच एक गृहिणी भाग्यश्री शिंदे यांनीही आपल्या कलेचा वापर करिअरमध्ये केलाय. भाग्यश्री शिंदे सांगतात, “हल्ली मुलींना रुखवत बनविण्यासाठी वेळ नसतो. अशा वेळी आकर्षक अशा रुखवताची त्यांची मागणी असते. यावेळी आम्ही त्यांना हव्या तशा थीमनुसार रुखवत बनवून देतो. फक्त लग्नच नाही तर हल्ली बारसं, डोहाळजेवण या कार्यक्रमांसाठीही आकर्षक वस्तूंच्या देखाव्याच्या आर्डर येतात. त्यामुळे घरबसल्या आपल्यामध्ये असलेल्या कलेचा वापर करून आपण उत्पन्न मिळवू शकतो.”

हेही वाचा >> ३८ लाख लग्नं; ४.७४ लाख कोटींचा खर्च, भारतात लग्नसोहळ्यातील प्रचंड खर्चामागची मानसिकता काय?

मागील काही वर्षांपासून फॅशन डिझायनिंगचे क्षेत्र सातत्याने विस्तारत आहे. फॅशन इंडस्ट्रीमध्ये झालेले नवनवीन बदल आणि कामाच्या संधीमुळे तरुणाईचा या क्षेत्राकडे कल वाढत आहे. अशीच एक गृहिणी जिनं शिवणकामापासून सुरुवात करून, आज तिनं फॅशन डिझायनिंग क्षेत्रात स्वत:चं करिअर घडवलं आहे. सेजल मांडवी फॅशन डिझायनिंगमधल्या करिअरबद्दल सांगतात, “कपडे हे अंग झाकण्यापलीकडेही असून, त्याबद्दल अधिक माहिती असणं आणि ती समजून घेणं आवश्यक आहे. कपडे एखाद्या व्यक्तीला आत्मविश्वास देतात. कपड्यांना कलात्मक स्वरूप किंवा प्रतिमेची जोड दिल्यास त्याची किंमत वाढते. आपल्यातली कला कपड्यावर उतरवल्यास, त्यातून तुम्ही त्याची किंमत वाढवू शकता. कलात्मक, वेगळेपण, कठोर मेहनत व उत्साही लोकांसाठी हा उद्योग भरपूर संधी देतो.”

अशा प्रकारे आयुष्य समृद्ध करणाऱ्या कलेमुळे तुमच्या करिअरला नवी दिशा मिळू शकते.

Story img Loader