मी नसताना किंवा माझ्या पश्चात माझ्या स्वमग्न (Autistic) मुलाचं काय होणार, हा एकमेव प्रश्न भारतीय पालकांना सतावत असतो. मात्र, आपलं स्वमग्न मूल स्वतंत्रपणे कसं जगू शकेल, याबाबत जी खबरदारी पालकांनी घ्यायला हवी, ती बहुसंख्य ठिकाणी घेतलीच जात नाही. स्वमग्न मुलांमध्ये नवनवीन कौशल्ये, संवाद-क्षमता, सुसंगत हालचाली, निर्णय क्षमता आणि समस्यांची उकल करण्याची क्षमता विकसित करण्यावर त्यांच्या पालकांनी भर द्यायला हवा. त्यासाठी पालकांनी आपल्या स्वमग्न मुलांशी सतत संवाद साधून त्यांना नि:स्वार्थीपणे भरपूर माहिती, ज्ञान, अनुभव शेअर करायला हवेत” असं मत चाइल्ड रिहॅबिलिटेशन सेंटरचे संस्थापक व वरिष्ठ आक्युपेशनल थेरपिस्ट डा. सुमीत शिंदे यांनी व्यक्त केलं. दोन एप्रिल हा दिवस संपूर्ण जगभरात जागतिक स्वमग्नता जागरूकता दिन म्हणून, तर संपूर्ण एप्रिल महिना हा जागतिक स्वमग्नता जागरुकता महिना म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने शेकडो स्वमग्न मुलांचं आयुष्य सुखकर करणारे डॉ. सुमीत शिंदे यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी पालकांशी शेअर केल्या आहेत.
स्वमग्न मुलं स्वत:चं काम स्वत: करतील किंवा स्वत:च्या गरजांची पूर्तता स्वत: करू शकतील, या गोष्टीला प्राधान्य देण्याची खूप आवश्यकता आहे.’ आटिझम’ म्हणजेच स्वमग्नता या मानसिक स्थितीविषयी समाजात आणि विशेषत: पालकांमध्येच पुरेशी जनजागृती झालेली नाही. अनेकदा पालकच त्यांच्या अज्ञानामुळे किंवा चुकीच्या दृष्टीकोनामुळे स्वमग्न मुलांच्या समस्यांमध्ये भर घालतात. स्वमग्न मुलाने फक्त नीट बोलणंच महत्वाचं नाही, तर त्यांना सामाजिक संवाद साधण्यासाठी सक्षम आणि आत्मविश्वासपूर्ण बनवणं अधिक महत्वाचं आहे. स्वमग्न मुलांनी सामाजिक कार्यक्रमांत सहभागी होण्यासाठी त्यांच्या पालकांनी विशेष परिश्रम घेण्याची गरज आहे, असं मत डॉ. सुमीत शिंदे यांनी व्यक्त केलं.
सर्वसाधारणपणे ६५ पैकी एका मुलात स्वमग्नतेची लक्षणं आढळतात. आपल्या भारतात एकूण १२ लाख लोक स्वमग्न असल्याची आकडेवारी उपलब्ध आहे. स्वमग्नता हा काही रोग किंवा विकास नसून ती एक मनोवस्था आहे. या मनोवस्थेवर कोणतंही थेट औषध नाही. मात्र लहान वयात याचं निदान झाल्यास आक्युपेशनल थेरपीस्ट, स्पीच थेरपीस्ट, मानसोपचारतज्ज्ञ, फिजिकल थेरपीस्ट अशा बहुविद्याशाखीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे अशा मुलांचं आयुष्य अधिक सुखकर बनवता येणे शक्य आहे, असंही डॉ. सुमीत शिंदे यांनी सांगितलं.