डॉ. संदीप सेवलीकर
स्तनांचा कर्करोग, मौखिक कर्करोग, त्वचेचा कर्करोग, प्रोस्टेट कर्करोग, रक्ताचा कर्करोग आणि फुप्फुसांचा कर्करोग आपल्याला माहीत आहे, पण आपल्या सगळ्यांनाच कदाचित माहीत नसेल, की जगभरात फुप्फुसांच्या कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण सर्वाधिक आहे. दरवर्षी जगभरात १.७६ मिलियन्स लोकांचा फुप्फुसांच्या कर्करोगामुळे मृत्यू होतो आणि याचा अर्थ दर मिनिटाला तीन लोकांचा या आजारामुळे मृत्यू होतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतात दर वर्षाला अंदाजे ६८ हजार फुप्फुसांच्या कर्करोगाच्या नव्या केसेस नोंदवल्या जातात. नियमितपणे ध्रूमपान करणाऱ्यांना फुप्फुसांचा कर्करोग होतो असा आपल्यापैकी अनेकांना वाचते, जे चुकीचे आहे. मात्र, फुप्फुसांचा कर्करोग होणाऱ्यांपैकी १५ टक्के लोकांनी आयुष्यात कधीच धूम्रपान केलेले नसते हे ऐकल्यावर तुमचा हा गैरसमज दूर होईल.

धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीने सिगारेट ओढताना सोडलेला उश्वास तसेच जळत्या सिगारेटमधून निघणारा धूर शरीरात घेण्यामुळेही त्रास होऊ शकतो. म्हणूनच धूम्रपानविरहीत ठिकाणे किंवा जिथे बरेच लोक एकत्रितपणे धूम्रपान करत असतात अशी ठिकाणे टाळणे आवश्यक आहे. यामुळेच हा आजार होण्याच्या शक्यता निर्माण करणाऱ्या घटकांपासून दूर राहाणे अवघड आहे. फुप्फुसांच्या कर्करोगाचे वेळेवर निदान झाल्यास आणि प्राथमिक टप्प्यावर त्याचे निदान झाल्यास या आजारातून वाचण्याचे जगभरातील प्रमाण ५५ टक्के आहे, तर पुढच्या टप्प्यांवर असताना निदान झाल्यास जगण्याचे प्रमाण केवळ पाच टक्के आहे.

मात्र, दुर्देवाने फुप्फुसांच्या कर्करोगाच्या भारतातील ७५-८० टक्के रूग्णांचे निदान पुढील टप्प्यांवर होते आणि तेव्हा शस्त्रक्रिया करणे शक्य नसते. यामुळे ग्रस्त रूग्णाची या आजारास बळी पडण्याची शक्यता वाढते. त्याशिवाय उपचार प्रक्रिया दीर्घकालीन असल्यामुळे त्या व्यक्तीच्याच नव्हे, तर त्यांच्या घरच्यांच्या आयुष्यातही बरीच उलथापालथ होते. प्रगत टप्प्यावर असलेल्या कर्करोगाच्या उपचारांचा खर्च प्राथमिक टप्प्यांच्या तुलनेत बराच जास्त आहे. यामुळे ग्रस्त व्यक्ती किंवा त्याच्या/तिच्या कुटुंबावर आर्थिक खर्चाचा मोठा बोजा पडतो व पर्यायाने सर्वांच्याच भविष्यकालीन स्वास्थ्यावरही ताण येतो.

भारतातील फुप्फुसांचा कर्करोग झालेल्या रूग्णांपैकी ३५ टक्के रूग्ण ५० वर्षांच्या आतील, तर १५ टक्के रूग्ण ४० वर्षाच्या आतील आहेत. याचा अर्थ काम करण्याच्या वयोगटातील किंवा आयुष्यातल्या सक्रिय असण्याच्या टप्प्यातील रूग्णांचे प्रमाण जास्त आहे. बऱ्याच केसेसमध्ये जर कुटुंबातील अर्थाजन करणाऱ्या व्यक्तीस या आजाराचे निदान झाल्यास संपूर्ण कुटुंबावर आर्थिक ताण येतो. म्हणूनच वेळेवर निदान होणे आणि पर्यायाने वेळेवर उपचार सुरू करता येणे हे प्रत्येकाच्या हिताचे असते.

फुप्फुसांच्या कर्करोगासारख्या आजाराची लक्षणे ओळखण्याचे आणि त्याचे जलद निदान होण्याचे महत्त्व खूप आहे. प्रत्येक ग्रस्त व्यक्तीमध्ये खोकल्यासारखी लक्षणे दिसतात असे नाही आणि खोकला झालेल्या प्रत्येक व्यक्तीस हा आजार असेलच असे नाही. मात्र, फुप्फुसांच्या कर्करोगाच्या काही लक्षणांमध्ये सर्दी, खोकला, रक्ताची उबळ येणे, धाप लागणे ही लक्षणे जास्त प्रमाणात दिसून येतात.

सारांश सांगायचा झाल्यास,असे म्हणता येईल, की भारत हा अजूनही एक विकसनशील देश आहे, जिथे वैद्यकीय सुविधा मोठ्या प्रमाणावर विशेषतः ग्रामीण भागात अप्रगत आहेत. त्याशिवाय जर आर्थित स्थिती आणि आरोग्य विम्याचे कवच याबाबतीत बऱ्याचदा अपुरे असते. म्हणूनच लक्षणांकडे वेळीच लक्ष देणे आणि लगेच निदान करून घेणे तसेच त्यावर उपचार सुरू करणे हे फुप्फुसांच्या कर्करोगाच्या प्राथमिक टप्प्यात अतिशय आवश्यक आहे.

(लेखक रोशे डायग्नोस्टिक्स इंडियामध्ये कार्यरत आहेत)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World cancer day 2019 lung cancer and importance of timely diagnosis