दरवर्षी ७ जुलैला जागतिक चॉकलेट दिन साजरा केला जातो. चॉकलेट हा असा प्रकार आहे की क्वचितच कोणाला आवडत नाही असे असेल. चॉकलेट प्रत्येकाच्या जीवनात महत्वाची भूमिका बजावतात असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण आपल्या प्रिय व्यक्तीसाठी भेट म्हणून हमखास चॉकलेट दिले जाते. भारतात चॉकलेटचं नातं एखाद्या चांगल्या गोष्टीशी किंवा साजरा करायच्या क्षणासोबत जोडलेलं आहे. छोट्या पासून मोठ्या सेलिब्रेशनला, आनंदाच्या क्षणाला चॉकलेटची हजेरी असते. चॉकलेटमुळे अनेकांचे मूडही काही मिनिटांत ठीक होतात. चॉकलेट हा फक्त गोड पदार्थ नाहीये तर त्याचे वेगवेगळे प्रकार आरोग्यासाठी फायदे देणारेही आहेत.
चॉकलेट दिनाचा इतिहास काय?
सुरुवातीला चॉकलेट विशिष्ट प्रदेश आणि देशांपुरते मर्यादित होते. १५५० साली युरोपमध्ये पहिल्यांदा चॉकलेटचा शोध लागला आणि हळू हळू चॉकलेट सगळीकडेच परिचयाचे झाले. जिथे जिथे चॉकलेट पोहोचले तिथे ते लोकांचे आवडते बनले. १५१९ साली स्पॅनिश एक्सप्लोरर हर्नन कोर्टीस यांना अॅझटेक सम्राट माँटेझुमा यांनी ‘झोकोल्टल’ नावाचे चॉकलेट आधारित पेय दिले असे म्हणतात. हर्नन कोर्टीस यांनी त्याच्याबरोबर पेय परत स्पेनला घेऊन जाऊन चव सुधारण्यासाठी त्याला व्हॅनिला, साखर आणि दालचिनीची जोड दिली. स्पॅनिश आक्रमणानंतर १६०० च्या दशकात या पेयाला इंग्लंड आणि फ्रान्समध्ये लोकप्रियता मिळाली. खाता येतील अशी सॉलिड चॉकलेट केवळ १८०० च्या दशकात तयार करायला सुरवात झाली. हळूहळू बर्याच चॉकलेट आधारित रेसिपी जगभरात रूप घेऊ लागल्या आणि चॉकलेटचे विविध प्रकारचे पदार्थ बनू लागले.
चॉकलेटबद्दल रंजक गोष्टी!
१. अॅझटेक (Aztec) संस्कृतीत चॉकलेट केवळ एक चवदार, कडू पेय नव्हते तर त्याचा वापर चलन म्हणून केला जात असे.
२. जगातील तब्बल ३०% कोको आफ्रिकेत पिकवला जातो. कोको हा चॉकलेटमधला सर्वात प्रमुख घटक आहे.
३. व्हाइट चॉकलेट डे (२२ सप्टेंबर), मिल्क चॉकलेट डे (२ जुलै), चॉकलेट कव्हर्ड एनिथिंग डे (१६ डिसेंबर), बिटरस्वीट चॉकलेट डे (१० जानेवारी) असेही चॉकलेटसाठीचे इतर दिवस आहेत.
४.एक पौंड चॉकलेट तयार करण्यासाठी ४०० कोको बीन्स लागतात आणि प्रत्येक कोकाऊ झाडावर एका वेळी अंदाजे २५०० बीन्स तयार होतात.