नारळाचा भारतात सर्वाधिक वापर धार्मिक विधींसाठी केला जातो. पूजेमध्ये नारळाला फार महत्त्व आहे. नारळ हा सर्वगुण संपन्न आहे. नारळाच्या पाण्यापासून ते सुक्या खोबऱ्याच्या वाटय़ांपर्यंत त्याचा वापर या ना त्या प्रत्येक गोष्टीत केला जातो. आजच्या जागतिक नारळ दिनानिमित्त आपण याच नाराळाचा वापर करुन तयार केल्या जाणाऱ्या दोन गोड पदार्थ्यांच्या रेसिपी पाहणार आहोत.
नारळाची बर्फी (लेखक : अभिजित पेंढारकर)
साहित्य : एक मध्यम आकाराचा नारळ, पाव लिटर दूध, पाव किलो साखर, अर्धा चमचा वेलची पावडर, एक लहान चमचा पिस्त्याचे काप, चारोळी
कृती :
नारळ खोवून घ्यावा.
खोबरे, साखर व दूध एकत्र शिजत ठेवावे.
शिजत असतांना सारखे हलवावे.
गोळा झाल्यावर त्यात वेलचीची पूड घालून एकत्र करावे.
ताटाला तूप लावून त्यावर गोळा थापावा.
पिस्त्याचे काप, चारोळी टाकून हलक्या हाताने थापावे.
गार झाल्यावर वड्या कापाव्यात.
पाककृतीसाठी लागणारा वेळ : ३० मिनिटे
पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : १० मिनिटे
एकूण वेळ : ४० मिनिटे
नारळी भात (लेखिका : अलका फडणीस)
साहित्य : बासमती तांदूळ १ वाटी, नारळाचे दूध अडीच ते ३ वाटय़ा, गूळ दीड वाटी बारीक चिरलेला, साजूक तूप २ मोठा चमचा, वेलची पूड १ चमचा, बदाम ५-६ तुकडे केलेले, अख्खी वेलची १-२, बेदाणे ८-१०.
कृती :
तांदूळ धुऊन चाळणीत निथळत ठेवा.
पातेल्यात १ मोठा चमचा तूप घाला आणि त्यावर वेलची फोडून टाका.
लगेच धुतलेले तांदूळ टाकून चांगले परता.
त्यावर नारळाचे दूध घालून नीट मिक्स करा.
मंद गॅसवर भात शिजवून घ्या.
नंतर त्यात गूळ घाला आणि हलक्या हाताने हलवत राहा.
गूळ विरघळल्यावर १ चमचा साजूक तूप घाला, वेलची पूड, बदाम आणि बेदाणे टाका आणि वाफ आणा.
गरम गरम नारळी भात खाण्यासाठी तयार.
पाककृतीसाठी लागणारा वेळ : ३० मिनिटे
पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : १० मिनिटे
एकूण वेळ : ४० मिनिटे