कापूस ज्याला इंग्रजीमध्ये कॉटन असेही म्हटले जाते. कापूस हा आपल्या रोजच्या वापरात असणारी महत्त्वाची गोष्ट आहे. कापसाचे अनेक फायदे आहेत आणि अजूनही त्याचे नवनवीन फायदे समोर येत असतात. दरवर्षी जागतिक कापूस दिन (World Cotton Day) ७ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. यंदा हा दिवस शनिवारी साजरा केला जाणार आहे.
कापूस हा पाच खंडांमधील ७५ पेक्षा जास्त देशांमध्ये पिकवली जाणारी जागतिक वस्तू आहे आणि याचा जगभरात व्यापार केला जातो. ग्रामीण भागात कापूस तयार करण्याच्या प्रक्रियेमुळे अनेकांना रोजगार मिळतो. कापूस उत्पादक देशांमध्ये, विशेषतः अल्प-विकसित देशांमध्ये (LDCs) रोजगार आणि आर्थिक स्थिरता निर्माण करते. कापसाच्या उत्पादनाचे दीर्घकाळ टिकणारे मार्ग निर्माण करण्यासाठी चालना देणे आणि विकसनशील देशांना सक्षम करणे हा या दिवस साजरा करण्यामागील मुख्य उद्देश आहे. त्यामुळे कापसाचे फायदे जाणून घेणे आणि त्याबाबत जागरुकता निर्माण करणे महत्त्वाचे आहे.
World Cotton Day 2023: इतिहास
आफ्रिकेतील उप-सहारान भागातील बेनिन (Benin) बुर्किना फासो (Burkina Faso) चाड (Chad) and माली (Mali) या मुख्य कापूस उत्पादकांना २०१२ साली World Cotton Day साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला. जागतिक व्यापार संघटनेसमोर (WTO) हा प्रस्ताव मांडण्यात आला. बेनिन (Benin) बुर्किना फासो (Burkina Faso) चाड (Chad) and माली (Mali) यांच्या प्रस्तावानंतर २०१९ मध्ये जागतिक व्यापार संघटनेद्वारे पहिल्यांदाच जागतिक कापूस दिन आयोजित करण्यात आला होता. संयुक्त राष्ट्र अन्न आणि कृषी संघटना (FAO), आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समिती (ICAC), संयुक्त राष्ट्र व्यापार आणि विकास परिषद (UNCTAD) यांचाही यामध्ये समावेश होता. संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेमध्ये ७ ऑक्टोबर २०२१ रोजी जागतिक कापूस दिन जाहीर करण्यात आला.
हेही वाचा – ‘एचडीएल’ किंवा ‘चांगले कोलेस्ट्रॉल’ कसे वाढवायचे? डॉक्टरांकडून जाणून घ्या सोपे उपाय
World Cotton Day 2023: महत्त्व
जागतिक व्यापार संघटनेच्या जागतिक कापूस दिन साजरा करण्यासाठी यंदाची थीम आहे ‘शेतीपासून फॅशनपर्यंत सर्वांसाठी कापूस योग्य आणि टिकाऊ बनवणे.’ ”युनायटेड नेशन्सला आर्थिक विकास, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि दारिद्र्य निर्मूलनामध्ये कापसाच्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल जागरूकता निर्माण करायची आहे. तसेच दीर्घकाळ टिकणारे, समाजातील सर्व घटकांना सामावून घेणारी, सातत्याने आर्थिक विकास करण्यासाठी, गुणवत्ता असलेला रोजगार निर्माण करणे हे या दिवस साजरा करण्यामागील ध्येय आहे”, असे जागतिक व्यापार संघटनेच्या अधिकृत वेबसाईटवर सांगितले आहे. या दिवशी कापसाचे महत्त्व, कापूस क्षेत्राचा विकास आणि आर्थिक विकासात त्याची महत्त्वपूर्ण भूमिका कशी आहे याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध संघटना एकत्र येतात.
World Cotton Day 2023: कापूसबाबत रजंक गोष्टी
- कापूस हा वनस्पतीपासून तयार होणारा नैसर्गिक फायबर आहे, जो मुळत: उष्णकटिबंधीय किंवा उप उष्णकटिबंधीय भागामध्ये पिकवला जातो. भारतात ते खरीप पीक म्हणून घेतले जाते.
- कॉटन हा शब्द अरेबिक शब्द ‘quton पासून निर्माण झाला आहे. असे असले तरीही कापसाचे सर्वात प्रथम उत्पादन हे भारतात झाले होते आणि आजही भारत कापसाच्या उत्पादनामध्ये जगात आघाडीवर आहे.
- नूतनीकरण योग्य (renewable) आणि जैविक घटकांमुळे त्याचे विघटन सहज होत (biodegradable) असल्याने कापड उद्योगासाठी इतर कृत्रिम पर्यायांच्या तुलनेत कापूस हा सर्वात पर्यावरणास अनुकूल कच्चा माल आहे.
- कापसाच्या रोपांच्या वाढीचा कालावधी मोठा असतो, जो २०० दिवसांपर्यंत वाढू शकतो. डिसेंबर ते मार्चदरम्यान कापसाची लागवड सुरू होते. या वनस्पतींना या कालावधीच्या तुलनेने उच्च तापमानाची आवश्यकता असते.
- कापूस उत्पादनासाठी भरपूर पाण्याची आवश्यकता नाही; ते कोरड्या आणि उष्ण वातावरणातही वाढू शकते.
- जगातील केवळ तीन टक्के जमीन कापूस पिकवण्यासाठी वापरली जाते. तरीही ते जगातील कापडाची २७ टक्के मागणी पूर्ण करते.
हेही वाचा – World Smile Day केव्हा साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व
World Cotton Day 2023: कापसाचे फायदे
- मऊ कापडाशिवाय कापसाच्या बियांपासून तेल निर्मितीही केली जाते. हे तेल स्वयंपाक तयार करण्यासाठी, साबण आणि सौंदर्य उत्पादने तयार करण्यासाठी वापरले जाऊ शकते. शेतकरीदेखील प्राण्यांच्या आहारामध्ये आणि खत म्हणून कापसाच्या बिया वापरतात.
- कपड्यांशिवाय कापसाचा वापर घरगुती आणि औद्योगिक उत्पादनांच्या निर्मितीसाठी केला जातो. माश्यांसाठी जाळी, तंबू, कॉफी फिल्टर, बूक बायंडिंग, आर्काइव्हल पेपर तयार करण्यासाठी कापसाचा वापर केला जातो.
- जिनिंग ही कापसाच्या बोंडापासून सरकी व कापूस वेगळा करण्याची यांत्रिक प्रक्रिया आहे. जिनिंग नंतर कापसाच्या बियांवर लिंटर नावाचे छोटे तंतू आढळतात. ज्याचा उपयोग पट्टी, बँक नोट्स, स्वॅब्स, कॉटन बड्स आणि एक्स-रे बनवण्यासाठी केला जातो.
- कापूस हे वापरासाठी नैसर्गिक, मुलायम आणि आरामदायी पर्याय आहे.
- कापूस हा नैसर्गिक फायबरपासून तयार केला जात असल्यामुळे त्वचेला आरामदायी असतो. ज्यामध्ये हवा खेळती राहते, जे मानव निर्मित पॉलिस्टर, नायलॉनसारख्या कापडांमध्ये होत नाही.
- सिल्कपेक्षा कापसापासून निर्माण होणारे कापड हे जास्त काळ टिकणारे आणि चांगल्या गुणवत्तेचे आहे.
- कापसापासून निर्मित कापड धुणेदेखील सोयीस्कर ठरते.