World Diabetes Day 2022 : रक्तात साखरेचे प्रमाण वाढल्याने मधुमेह ही स्थिती निर्माण होते. मधुमेह होण्याला दोन कारणे जबाबदार असतात. स्वादुपिंड पुरेसे इन्सुलिन तयार करू शकत नसेल (टाईप वन) किंवा तयार झालेल्या इन्सुलिनला पेशींकडून प्रतिसाद मिळत (टाईप टू) नसल्यास पेशींमध्ये ग्लुकोज शोषणाच्या क्रियेत अडथळा निर्माण होतो, परिणाम रक्तात साखरेचे प्रमाण वाढून मधुमेहाची समस्या उद्भवते. पौष्टिक आहाराचा अभाव आणि अयोग्य जीवनशैली या आजारासाठी कारणीभूत मानली जाते.
साखरेचे प्रमाण अधिक असलेल्या पदार्थांचे सेवन, धुम्रपान, मद्यपान हे मधुमेह वाढवण्यासाठी जबाबदार धरले जातात. या वस्तू शरीराची ग्लुकोज पचवण्याची क्षमता कमकुवत करतात. याने मुत्रपिंड आणि मज्जातंतूला नुकसान होण्याचा धोका बळावतो. डीएनएच्या अहवालानुसार, दिल्ली येथील डायबेटोलॉजिस्ट डॉ. अशोक झिंगन यांच्या मते, मधुमेहाच्या लक्षणांबाबत वेळीच माहिती मिळाल्यास या आजाराला नियंत्रणात आणण्यास मदत होऊ शकते. यासाठी शारीरिक तपासणी आणि काही चाचण्या जसे की ग्लुकोज मॉनिटरिंग, लघ्वी, रक्त आणि इतर चाचण्या करणे गरजेचे आहे. लोकांना मधुमेहाच्या सर्व लक्षणांविषयी माहिती असायलाच हवी, असे त्यांचे म्हणणे आहे.
ही लक्षणे किडणीवर परिणाम होत असल्याचे संकेत
- चेहरा, हात आणि पायांना सूज
- उच्च रक्तदाब
- रक्तात पोटॅशियमचे अधिक प्रमाण
- फुफ्फुसांमध्ये द्रव (पल्मोनरी इडिमा)
- हृदयाचे आजार
- डायलिसिस किंवा मुत्रपिंड ट्रान्सप्लांट करण्याची स्थिती
हे आहेत मज्जातंतूशी संबंधित संकेत
- कमी रक्तदाबाविषयी (हायपोग्लायसिमिया) जागरुकतेचा अभाव
- मुत्रमार्गात संक्रमण आणि लघवीवरील नियंत्रण गमवणे.
- रक्तदाबात तीव्र घट
- पचनात समस्या
- लैंगिक निष्क्रियता
जागरुकता कशी वाढवावी?
मधुमेहाबद्दल जागरुकता वाढवण्यासाठी आरोग्य सेवा प्रदाते आणि रुग्ण यांच्यामध्ये अधिक संवाद असणे गरजेचे आहे. त्यांनी मधुमेह नियंत्रणावर लक्ष देणे गरजेचे आहे, त्याचबरोबर, निरोगी आहाराचे सेवन करावे आणि शारीरिक क्रियाकलाप वाढवावे, रक्तातील साखरेचे नियमित निरीक्षण करावे. मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी इतर आरोग्यविषयक समस्या कमी करणे, भावनिक बाजूवर मात करणे आणि सर्वांगीण आरोग्य आणि दर्जेदार जीवनशैली जगणे गरजेचे आहे.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)