जागतिक एड्स दिनाच्या पाश्र्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने ‘एचआयव्ही’ग्रस्तांसाठी स्वयंचाचणीची नवी मार्गदर्शिका जाहीर केली आहे. त्यामुळे या आजाराचे निदान होऊन औषधोपचार वेळेवर घेणे अधिक सोपे होणार आहे. जागतिक आरोग्य संस्थेच्या नव्या अहवालानुसार एचआयव्हीचे निदान वेळेवर न होणे हाच या आजारावरील उपचार वेळेवर सुरू होण्यातला मुख्य अडथळा आहे. एचआयव्हीची बाधा झालेल्या प्रत्येकाने एंटीरेट्रोवायरलथेरपी करावी, असे जागतिक आरोग्य संस्थेने सुचविले आहे. जगभरातील १८ लाख ‘एचआयव्ही’ग्रस्त लोक एंटीरेट्रोवायरलथेरपी करवून घेत असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. तर काही रुग्णांना ही उपचारपद्धती उपलब्ध होत नाही. तर बऱ्याच जणांना एचआयव्हीची स्थिती ठाऊक नाही. जगभरातील एकूण ४० टक्के लोकांना एचआयव्हीच्या स्थितीची माहिती नाही. त्यातील बऱ्याच एचआयव्हीग्रस्तांना उच्च पातळीवरील धोका आहे. मात्र, चाचणी पद्धत उपलब्ध नसणे हीच महत्त्वाची अडचण आहे.
लाखो एचआयव्हीग्रस्तांना प्राण वाचण्यासाठी आवश्यक उपचार मिळत नाहीत. त्यामुळेच त्यांच्यापर्यंत एंटीरेट्रोवायरलथेरपीसारखी नवी उपचारपद्धती पोहोचणे आवश्यक असल्याचे जागतिक आरोग्य संस्थेचे अध्यक्ष डॉ. मार्गारेट चान यांनी सांगितले. एचआयव्हीग्रस्तांसाठी स्वयंचाचणीचे द्वार खुले झाल्यामुळे जगभरातील लाखो लोकांना आजाराची स्थिती जाणून त्यानुसार उपचार घेणे शक्य होणार असल्याचे चान म्हणाले. ‘ओराल फ्युइड’ किंवा ‘ब्लड फिंगरस्टिक’ अशा स्वयंचाचणी पद्धतींद्वारे एचआयव्हीची स्थिती जाणून घेणे शक्य आहे. तसेच, या चाचणी पद्धतींमध्ये केवळ २० मिनिटांमध्ये निकाल मिळविता येतो. मात्र, हा निकाल स्थानिक रुग्णालयांमध्ये दाखवून सल्ला घेणे आवश्यक आहे. योग्य सल्ला घेतल्यावरच त्यावर उपचार घेणे आवश्यक असल्याचे जागतिक आरोग्य संस्थेने स्पष्ट केले आहे.
एचआयव्ही स्वयंचाचणी हा अनेक एचआयव्हीग्रस्तांपर्यंत पोहोचविता येणारा आणि पोहोचणारा सोपा मार्ग असून उपचार मिळवून देण्यास सोपा आहे. एचआयव्हीच्या कालबाह्य़ चाचण्यांचा वापर करणाऱ्या रुग्णांसाठी हा मार्ग सोपा आहे. २००५ ते २०१५ या कालावधीत एचआयव्ही एड्सची माहिती घेणाऱ्या नागरिकांमध्ये १२ टक्क्यांपासून ६० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे, तर एचआयव्ही चाचणी करणारे ८० टक्के लोक आहेत.
(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)