मानवता हे आपलं मूलभूत कर्तव्य आहे. याच मूल्याचा आणि हे मूल्य खऱ्या अर्थाने अंगीकारणाऱ्या प्रत्येकाचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी १९ ऑगस्ट हा जागतिक मानवतावादी दिवस म्हणून साजरा केला जातो. गरजू आणि असहाय्य लोकांच्या सेवेसाठी मनोभावे, अखंड आणि अविरतपणे तत्पर असणाऱ्या मानवतावादी लोकांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो. गरजू लोकांना योग्यवेळी योग्य ते सहाय्य मिळालं पाहिजे हा या दिवसाचा खरा संदेश आहे. ज्यांनी जागतिक स्तरावर मानवतावादी कारणास्तव आपले प्राण गमावले आहे त्यांचं या दिवशी स्मरण केलं जातं. या दिवशीच्या सोहळ्यात जे विविध कार्यक्रम व उपक्रम राबवले जातात त्यात सेवा करणारे आणि सेवांचा लाभ मिळणारे असे दोघेही समाविष्ट केले जातात.
जागतिक मानवतावादी दिवस का आणि कधी साजरा केला जातो?
१९ ऑगस्ट २००३ रोजी इराकची राजधानी असलेल्या बगदाद येथील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयावर हल्ला झाला होता. या हल्ल्यात संयुक्त राष्ट्रांचे २२ सहयोगी ठार झाले होते. त्यात सजिर्यो व्हिएरो डिमेलो या राष्ट्रकुलाच्या उच्चाधिकाऱ्याचा देखील समावेश होता. तेव्हापासून हा दिवस जागतिक मानवता दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. बगदाद दुर्घटनेनंतर ४ हजारांहून अधिक मदत कार्यकर्त्यांना लक्ष्य करण्यात आलं होतं. अनेकांचा मृत्यू झाला, अनेक जण जखमी झाले, तर अनेकांना अटक करण्यात आली.
संयुक्त राष्ट्राच्या स्टीफन ओब्रायन यांच्या मते, “हा दिवस ज्यांनी संकट आणि निराशेच्या काळादरम्यान गरजूंना जीव वाचवण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी आपलं आयुष्य धोक्यात घातलं त्यांचा गौरव करण्याचा आहे. तसेच प्रत्येकाला मानवतावादी मूल्यांची आठवण करून देण्यासह जगभर मानवतावादी कार्य करत असताना आपले प्राण गमावलेल्या हजारो कार्यकर्त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा हा दिवस आहे.”
दहशत आणि हिंसाचाराच्या वातावरणात हे मोठं आव्हान
संयुक्त राष्ट्रांच्या मते, दिवसेंदिवस दहशत आणि हिंसाचाराच्या वाढत्या जागतिक धोक्यात मानवतावादी कार्यकर्त्यांचं कार्य अत्यंत महत्त्वाचं आहे. सीरिया ते दक्षिण सुदान आणि मालदीव ते आफ्रिकेच्या भूकमारी असलेल्या प्रदेशांपर्यंत, मानवतावादी कार्यकर्त्यांचं काम खूप महत्त्वाचं आहे. दहशत आणि हिंसाचाराच्या संकटाच्या दरम्यान जगभरातील लोकांना अन्न, पाणी, आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत गरजा मिळण्यासाठी लाखो लोक दररोज संघर्ष करत आहेत. इतकंच नव्हे तर एड्ससारख्या रोगांना बळी पडलेल्यांची सेवा करणारी मंडळी तसेच कुपोषण, रोगराई, नैसर्गिक आपत्तीग्रस्त लोकं व त्यांच्या पुर्नवसनासाठी आयोजित केलेल्या कार्याची दखल देखील ह्यात घेतली गेली. या लोकांना मदत करण्यासाठी आणि त्यांना नवीन दिशा देण्यासाठी जागतिक मानवतावादी दिनासारख्या कार्यक्रमांचं महत्त्व वाढतं.
मानवतावादी कार्यकर्ते काय करतात?
मानवतावादी मिशन हे दया, सहानुभूती, निष्पक्षता, तटस्थता आणि स्वातंत्र्यासह अनेक संस्थापक तत्त्वांवर आधारित आहे. मानवतावादी मदत कार्यकर्ते हे राष्ट्रीयता, सामाजिक गट, धर्म, लिंग, वंश किंवा इतर कोणत्याही आधारावर भेदभाव न करता आपत्तीग्रस्त गटांचे आयुष्य वाचवण्यासाठी त्याचप्रमाणे त्यांचं दीर्घकालीन पुनर्वसन करण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न करतात. मानवतावादी मदत कार्यकर्त्यांचा आदर केलाच पाहिजे असा संदेशही या माध्यमातून दिला जातो.