इडली म्हणजे स्वादिष्ट, करायला-पचायला सोपा आणि पौष्टिक नाश्ता. पण रोजची इडली जरा वेगळ्या पद्धतीनं करुन पाहायची आहे तर मग इडलीच्या या झटपट होणाऱ्या रेसिपी नक्की ट्राय करून पाहा.
इडली मंचुरियन
साहित्य :
१०-१२ नग तयार इडल्या
तीन चमचे कॉर्नफ्लोअर
दोन टेबलस्पून मैदा
एक चमचा आले-लसणाची पेस्ट
तीन चमचे लाल मिरचीचे तिखट
बारीक चिरलेली एक सिमला मिरची
एक चमचा आल्याचा कीस
बारीक चिरलेल्या ३-४ लसणाच्या पाकळ्या
पाव चमचा सोया सॉस
दोन टेबलस्पून टोमॅटो सॉस
पाव चमचा काळी मिरीची पूड
एक बारीक चिरलेला कांदा
एक टेबलस्पून बारीक चिरलेली कांदापात
चवीनुसार मीठ.
पाककृती
तयार इडल्या अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवा व अर्ध्या तासाने फ्रिजमधून काढून त्यांचे छोटे छोटे चौकोनी तुकडे कापून ठेवा.
एका बाऊलमध्ये कॉर्नफ्लोअर, मैदा, आले-लसणाची पेस्ट, लाल तिखट एकत्र करा.
मिश्रणात पाणी घालून फेटून घेऊन दाट पेस्ट बनवा.
गॅसवर पॅनमध्ये तेल गरम करा.
तयार केलेल्या पेस्टमध्ये इडलीचे तुकडे बुडवून ते तेलात गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्या.
एका प्लेटमध्ये टिश्यू पेपर पसरून त्यात हे टोस्ट केलेले इडल्यांचे तुकडे ठेवा.
आता गॅसवर एका फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून घ्या.
त्यात किसलेले आले, बारीक चिरलेला लसूण व कांदा घालून 3-4 मिनिटे मध्यम आचेवर कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परता.
मग त्यात चिरलेली सिमला मिरची घालून परता.
सिमला मिरची शिजून मऊ झाली की त्यात सोया सॉस, टोमॅटो सॉस, कॉर्नफ्लोअरचे मिश्रण आणि मीठ घालून एकजीव करा व परतत रहा.
थोडेसे पाणी घालून ढवळत रहा.
जेव्हा मंचूरियन सॉसमध्ये उकळी येईल तेव्हा त्यात इडली व काळी मिरीची पूड घालून एकजीव करून घ्या आणि आणखी २-३ मिनिटे शिजवून घेऊन गॅस बंद करा. गरम इडली मंचूरियन फ्राइड राईससोबत सर्व्ह करा.
सौजन्य : अभिजित पेंढारकर
मसाला इडली
साहित्य
२ वाट्या उकडा तांदूळ
१ वाटी उडीद डाळ
अर्धी वाटी चणा डाळ
पाव चमचा हिंग
१ चमचा काळी मिरी
१ टी. स्पून जीरे
थोडे आले किसून
थोडा कढीलिंब
थोडे काजूचे तुकडे
चवीनुसार मीठ
पाककृती
तांदूळ, उडदाची डाळ, चणा डाळ रात्री भिजत घालावे.
सकाळी वाटून पीठ आंबायला ठेवावे.
पिठात जिरे व मिरे जाड कुटून, हिंग, मीठ घाला.
थोडे तेल गरम करुन काजू तुकडे व कढीलिंब तळून तेलासकट पिठात घाला.
आले किसून घालून पीठ खूप फेटावे.
पीठ फेटून इडली स्टॅंडवर इडल्या वाफवून घ्याव्यात.
चटणीबरोबर सर्व्ह कराव्यात.
सौजन्य : अभिजित पेंढारकर
केळ्याची इडली
साहित्य
२ वाट्या बारीक रवा
२ चमचे तूप
एक वाटी पिकलेल्या केळ्याचा पल्प
एक वाटी गूळ
एक वाटी खवलेला नारळ
चवीपुरते मीठ
वेलची पूड
पाककृती
दोन वाट्या बारीक रवा दोन चमचे तुपावर भाजून घ्यावा.
त्यात एक वाटी केळ्याचा पल्प, एक वाटी गूळ पातळ करून, एक वाटी खवलेल्या नारळाची पेस्ट घालावी.
थोडे मीठ घालावे. त्यात पाणी घालून चव पाहावी. चव गोड असली पाहिजे.
वेलची पूड मिसळावी. इडलीच्या पिठापेक्षा थोडे पातळ पीठ ठेवावे. इडली पात्राला तूप लावावे आणि त्यात हे पीठ घालावे. साधारण अर्धा तास वाफेवर शिजवावे.