World Mosquito Day 2022: दरवर्षी २० ऑगस्ट रोजी ‘जागतिक डास दिवस’ साजरा केला जातो. डासांमुळे होणाऱ्या आजारांबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. मलेरिया हा डासांमुळे पसरणारा आजार आहे. त्यामुळे यावरील घरगुती उपचार माहित असणे आवश्यक आहे. WHO च्या अहवालानुसार मलेरियाचे सर्वाधिक रुग्ण भारतात आहेत. मलेरियाच्या एकूण रुग्णांपैकी तीन टक्के रुग्ण भारतात आहेत. ब्रिटिश सर्जन सर डोनाल्ड रॉस यांनी १८९७ मध्ये डास आणि मलेरिया यांच्यातील संबंध शोधून काढला होता.
जीवघेण्या मलेरियाची लक्षणं आणि त्यावरील घरगुती उपाय समजून घेणं आवश्यक आहे. मलेरिया हा प्रोटोझोआ नावाच्या पॅरासिटीकमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. तो मादी अॅनोफिलीस डासाने चावल्यास पसरतो. मलेरियाचे सामान्य मलेरिया आणि गंभीर मलेरिया असे साधारण दोन प्रकार आहेत. उष्णता जास्त असणाऱ्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना मलेरियाचा सर्वाधिक त्रास होतो, असं म्हटलं जातं. तसेच वेळेवर उपचार न मिळाल्यास रुग्णाचा मृत्यू होण्याची भीती असते. चला जाणून घेऊया काही घरगुती उपाय, ज्यांच्या मदतीने मलेरिया घरबसल्या बरा करता येऊ शकतो.
आले
NCBI मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार मलेरिया झाल्यास आल्याचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. यात अँटी-मायक्रोबियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत. आल्यामुळे मलेरियामुळे होणारी मळमळ आणि उलट्या टाळण्यास मदत होते. एक इंच आल्याचा तुकडा एक किंवा दीड कप पाण्यात उकळवा. नंतर त्यात चवीनुसार मध घाला आणि दररोज या मिश्रणाचे एक ते दोन कप सेवन करा.
हळद
नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिननुसार, हळदीमध्ये आढळणारे कर्क्यूमिन मलेरियावर औषध म्हणून काम करते. हळदीमध्ये अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात, ते प्लाझमोडियम संसर्गामुळे निर्माण होणारे विषारी पदार्थ शरीरातून काढून टाकते. मलेरियामुळे होणारी स्नायू आणि सांधेदुखी कमी करण्यासाठी यात सूज विरोधी गुणधर्म आहेत. एक ग्लास दुधात एक चमचा हळद मिसळून प्यायल्यास फायदा होतो. रोज रात्री झोपण्यापूर्वी याचे सेवन करा.
मेथी
मेथी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास उपयुक्त आहे. त्यात अँटी प्लाझमोडियल गुणधर्म असून ते मलेरियाच्या विषाणुंशी लढण्यास मदत करतात. म्हणूनच डॉक्टर मलेरियाच्या रुग्णांना मेथीचे दाणे खाण्याचा सल्ला देतात. अर्धा चमचा मेथीचे दाणे एका ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. नंतर हे पाणी सकाळी गाळून रिकाम्या पोटी सेवन करा. मलेरिया बरा होईपर्यंत याचे सेवन करता येते.
दालचिनी
मलेरिया झाल्यास दालचिनी प्रभावी उपाय ठरू शकते. त्यात अँटिऑक्सिडेंट, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीबॅक्टीरियल, अँटीसेप्टिक, अँटीव्हायरल आणि अँटीफंगल गुणधर्म तसेच अँटी-पॅरासिटीक गुणधर्म असतात. ते तुम्हाला मलेरियापासून बरं होण्यास मदत करू शकतात. याचे सेवन करण्यासाठी एक चमचा दालचिनी पावडर आणि चिमूटभर काळी मिरी एका ग्लास पाण्यात उकळा, नंतर ते गाळून घ्या. हे मिश्रण तुम्ही दिवसातून एक किंवा दोनदा पिऊ शकता.