World No-Tobacco Day 2023: दरवर्षी ३१ मे रोजी जगभरात ‘तंबाखू विरोधी दिन’ साजरा केला जातो. लोकांना या व्यसनाच्या दृष्परिणामांची माहिती देण्यासाठी आणि तंबाखूमुळे होणाऱ्या आजारांविषयी लोकांना जागरूक करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना (WHO) या आंतरराष्ट्रीय स्तरावरील संघटनेने काही वर्षांपूर्वी तंबाखूविरुद्ध लढा देण्यासाठी ३१ मे रोजी ‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’ साजरा करायला सुरुवात केली.
या संघटनेच्या अहवालानुसार, दरवर्षी तंबाखूमुळे झालेल्या आजारांमुळे जगभरातील ८० लाख लोक मृत्युमुखी पडत आहेत. कर्करोगासारखा महाभयंकर आजार हा तंबाखूच्या सेवनामुळे होत असतो. धूम्रपानासह अन्य काही गोष्टींमार्फत शरीरामध्ये तंबाखू पोहचत असतो. तंबाखूचे सेवन करणाऱ्या बहुतांश लोकांना त्याचे दृष्परिणाम ठाऊक असतात. पण तरीही त्यांची व्यसन करायची सवय सुटत नाही. तंबाखूमुळे शरीराला अपाय होतोय माहीत असल्याने काही जण व्यसन सोडण्यासाठी प्रयत्न करत असतात. पण त्यातील अनेकांना या प्रयत्नांमध्ये नेहमी अपयश मिळते. अशा वेळी त्यामध्ये असे काय आहे की, ज्याने आपण मरू शकतो हे ठाऊक असूनही लोक तंबाखूचे व्यसन का करतात, असा प्रश्न पडतो.
तंबाखूचे व्यसन लवकर का सुटत नाही?
तंबाखूमध्ये निकोटिन नावाचा एक घटक असतो. या घटकामुळे शरीराला अपाय होत असतो. निकोटिनच्या प्रभावामुळे असंख्य गंभीर आजार संभवतात. जेव्हा एखादी व्यक्ती धूम्रपान करीत असते, तेव्हा त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये निकोटिन जात असते. हे निकोटिन स्टिम्युलेट आणि सेडेटिव्ह स्वरूपात काम करते. शरीरात निकोटिन गेल्यावर मेंदूमध्ये डोपामाइन नावाचे द्रव्य रिलीज होते. डोपामाइन हे हॅपी हार्मोन आहे. याच्या प्रभावामुळे मूड सुधारण्यास मदत होते. म्हणून जेव्हा लोक तणावामध्ये असतात, तेव्हा धूम्रपान करतात. सिगारेट ओढल्याने त्यांचा ताण काही क्षणांसाठी दूर होतो. यामुळे मानसिक त्रास सहन करणारे बहुतांश लोक धूम्रपान करताना दिसतात. याच कारणामुळे तंबाखूचे व्यसन लागते आणि ते लवकर सुटत नाही.
तंबाखूच्या सेवनामुळे संभवतात गंभीर आजार
तंबाखूमधील निकोटिन मानवी शरीरामध्ये गेल्यास त्याचा शरीरावर वाईट परिणाम होतो. निकोटिनमुळे फुफ्फुसांचा कर्करोग होण्यांची शक्यता असते. जे लोक धूम्रपान करतात, त्यांना हा आजार होऊ शकतो. या व्यतिरिक्त मूत्राशय, यकृत, मूत्रपिंड, स्वादुपिंड असे अवयव प्रभावित होतात. हृदयाशी संबंधित आजार, मधुमेह असलेल्या रुग्णाने धूम्रपान केल्याने मृत्यू होऊ शकतो.