आज ११ जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिवस २०२२ साजरा केला जात आहे. हा दिवस दरवर्षी ११ जुलै रोजी साजरा केला जातो. वर्ल्डोमीटरनुसार, या वर्षी जगाची लोकसंख्या सुमारे ८ अब्जांवर पोहोचली आहे. गेल्या वर्षी ती साडेसात अब्जांपेक्षा जास्त होती. पूर्वी हा दिवस सण आणि उत्सव म्हणून साजरा केला जात होता आणि यावेळी निरंतर विकासाची प्रार्थना केली जात होती. मात्र, सतत वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे हा दिवस चिंता व्यक्त करण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी एक निमित्त बनला आहे.
यंदाच्या जागतिक लोकसंख्या दिनाची थीमही यावरच आधारित आहे. या दिवशी जगभरातील लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी विविध उपायांचा परिचय करून दिला जातो. याशिवाय कुटुंब नियोजनाचा मुद्दाही चर्चिला जातो. या दिवशी ठिकठिकाणी लोकसंख्या नियंत्रण कार्यक्रम राबवले जातात आणि त्या कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकांना जागरूक करण्याचा प्रयत्न केला जातो, जेणेकरून वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवता येईल.
मिठाच्या पाण्याने अंघोळ केल्यास दूर होईल ताण-तणाव; जाणून घ्या शरीराला होणारे इतर फायदे
या वर्षीची थीम
या वर्षीच्या जागतिक लोकसंख्या दिनाची थीम ‘८ अब्ज लोकांचे जग: सर्वांसाठी एक लवचिक भविष्य, संधी, हक्क आणि निवड सुनिश्चित करणे’ अशी आहे. या थीमवरून हे स्पष्ट होते की जगाची लोकसंख्या आठ अब्जांच्या चिंताजनक पातळीवर पोहोचली आहे, परंतु ती हक्क आणि संधीच्या समानतेपासून दूर आहे.
जागतिक लोकसंख्या दिन २०२१ ची थीम ‘कोविड-१९ महामारीचा प्रजननक्षमतेवर परिणाम’ अशी होती. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP) च्या गव्हर्निंग कौन्सिलने १९८९ मध्ये जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यास सुरुवात केली.
जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्याची प्रेरणा ‘फाइव्ह बिलियन डे’ मधून मिळाली. ११ जुलै १९८७ रोजी पाच अब्ज दिवस साजरा करण्यात आला. तेव्हा जगाची लोकसंख्या पाच अब्जांच्या पुढे गेली होती. त्यानंतर संयुक्त राष्ट्राने पहिल्यांदाच यावर चिंता व्यक्त केली होती. तेव्हापासून, संयुक्त राष्ट्र संघाने जागतिक लोकसंख्या दिवस साजरा करण्यास सुरुवात केली, जगातील वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यास सुरुवात केली आणि कुटुंब नियोजनाबद्दल लोकांमध्ये जागरूकता पसरवली.
Health Tips : सकाळी नाही, तर रात्री झोपण्यापूर्वी प्या गरम पाणी; मिळतील ‘हे’ चार आश्चर्यकारक फायदे
हा दिवस का साजरा केला जातो?
वास्तविक, दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या हा संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय आहे. पूर्वी ते वरदान होते, पण आता ते शाप बनले आहे. त्यामुळे बेरोजगारी, उपासमार, निरक्षरता या समस्यांनी उग्र रूप धारण केले आहे. त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवण्याला आता सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. जगभरात या दिवशी कुटुंब नियोजन, गरिबी, स्त्री-पुरुष समानता, निरक्षरता, नागरी हक्क, माता आणि बालकांचे आरोग्य, गर्भनिरोधक औषधांचा वापर अशा अनेक पैलूंवर विचारमंथन केले जाते.
२०५७ मध्ये लोकसंख्या १० अब्जाचा आकडा पार करू शकते
संयुक्त राष्ट्रांच्या ताज्या अंदाजानुसार, जुलै २०२२ पर्यंत, जगाची लोकसंख्या ७.९६ अब्जांपेक्षा जास्त होईल. २०३७ मध्ये ती ९ अब्ज आणि २०५७ पर्यंत १० अब्जचा टप्पा ओलांडू शकते.
जागतिक लोकसंख्या दिवसाचे महत्त्व
दरवर्षी या दिवशी लोकसंख्या नियंत्रण उपायांवर चर्चा केली जाते. वाढत्या लोकसंख्येमुळे आपल्याला भेडसावणाऱ्या समस्यांबद्दल जाणीव करून देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. चीननंतर भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा लोकसंख्या असलेला देश आहे. लोकसंख्येतील ही वाढ प्रजननक्षम वयापर्यंत पोहोचणाऱ्या व्यक्तींची संख्या जास्त असल्यामुळे होते. एवढ्या लोकसंख्येसाठी संसाधने नाहीत, त्यामुळे लोकसंख्या नियंत्रण आवश्यक आहे.