थॅलसेमिया हे नाव आपण ऐकलेले असते पण हा आजार म्हणजे नेमके काय याबाबत आपल्याला पुरेशी माहिती नसते. मात्र त्याबाबत योग्य ती माहिती घेणे आवश्यक आहे. या रोगात शरीरातील (हिमोग्लोबीन) रक्त निर्माण होणाच्या प्रक्रियेत अडथळा येतो. ज्यामुळे शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होते. अशावेळी रुग्णांच्या शरीरात लाल रक्तपेशींची संख्या १२० दिवसांऐवजी कमी दिवस पुरेल इतकी खाली येते. त्याचा परिणाम सरळ शरीरातील हिमोग्लोबीनवर होतो. हा आजार जन्मत: होत असल्याने लहान मुलांना वारंवार बाहेरुन रक्त देण्याची आवश्यकता भासते. देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत ३ ते ४ टक्के रुग्ण हे थॅलसेमियाचे वाहक असतात. २५ लोकांमधून थॅलसेमियाचा एक मेजर रुग्ण आढळून येतो. वर्षाला साधारण थॅलसेमिया मेजर १२ हजार बाळ जन्माला येतात. आज ८ मे रोजी पाळल्या जाणाऱ्या जागतिक थॅलसेमिया दिनानिमित्त या आजाराची माहिती करुन घेणे आणि त्याच्या उपचारपद्धतीची माहिती घेणे आवश्यक आहे.
लक्षणे
* बाळाचे वजन अचानक घटू लागते.
* पोटात अन्न, दूध राहत नाही, वारंवार उलट्या होतात.
* मुलांना कमालीचा थकवा जाणवतो, थोड्या हालचाली केल्या तरी धाप लागते.
* रक्त देण्याला विलंब झाल्यास मुले निस्तेज होतात.
* ठराविक कालावधीत रक्त न मिळाल्यास अॅनिमियाचा धोका असतो.
* थॅलसेमिया असणाऱ्या रुग्णांना जंतुसंसर्ग होण्याचा धोका.
उपचार
* बिटा थॅलसेमिया व्याधीग्रस्तांना जगण्यासाठी नियमित रक्त देण्याची गरज असते. दर ४ ते ६ आठवडय़ांनी त्यांना रक्त मिळायलाच हवे.
* कोणताही जंतुसंसर्ग होणार नाही याची काळजी घ्यायला हवी.
* आहाराबाबत डॉक्टरांशी योग्य सल्लामसलत करुन योग्य तो आहार द्यायला हवा.
* औषधोपचार आणि इतर उपचार वेळच्या वेळी आणि योग्य पद्धतीने होणे आवश्यक आहे.
* काविळीसारखे आजार होऊ नयेत म्हणून काळजी घेण्याची गरज.
* व्याधीमुक्त होण्यासाठी बोन मॅरो ट्रान्सप्लांट हा उपाय आहे.
* थोडाही त्रास झाल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
* लग्नापूर्वी युवक-युवतीच्या रक्ताची चाचणी करणे.
* गर्भवती माता थॅलसेमिया रुग्ण असल्यास वेळोवेळी तज्ज्ञ डॉक्टरांकडे तपासणी करावी.