टाटा रुग्णालयाचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांचा इशारा; चुकीच्या समजुतीमुळे अनेक अयोग्य, अनावश्यक गोष्टींना बळी
आपल्या देशात शहरी भागात कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. अमेरिकेच्या तुलनेत ते एकतृतीयांश असले तरी चुकीच्या समजुतींमुळे आपण अनेक अयोग्य व अनावश्यक गोष्टींना बळी पडत आहोत. त्यातून कर्करोगाचे प्रमाण वाढते आहे, असा इशारा टाटा कॅन्सर रुग्णालयाचे संचालक व कर्करोग शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र बडवे यांनी दिला.
ब्राह्मण सभेतर्फे वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांना धन्वंतरी व भीषग्वर्य पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन सोमवारी येथील ब्राह्मण सभागृहात करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बडवे बोलत होते. यंदाचा धन्वंतरी पुरस्कार स्त्रीरोगतज्ज्ञ व प्रसुतीशास्त्र तज्ज्ञ डॉ. एस. कृष्णकुमार यांना तर भीषग्वर्य पुरस्कार बालरोगतज्ज्ञ डॉ. गिरिश भिरुड यांना प्रदान करण्यात आला.
बडवे पुढे म्हणाले, बाजाराधिष्ठित अर्थव्यवस्थेमुळे नसलेल्या गरजा समाजात निर्माण होत आहेत. याशिवाय अमेरिका वा अन्य प्रगत देशांतून आलेले सर्वच चांगले अशी एक समजूत आपल्याकडे बळावू लागली आहे. अशा चुकीच्या समजुतींमुळे आपण अनेक अयोग्य व अनावश्यक गोष्टींना बळी पडू लागलो आहोत. त्यामुळे कर्करोग व विविध व्याधींचे प्रमाण वाढू लागले आहे. चुकीची जीवनशैली तसेच यामुळे उद्भवणारे स्थूलत्व, तंबाखू सेवनासारखी घातक व्यसने, व्यायामाचा अभाव अशा अनेक कारणांमुळे भारतात या रोगाचे प्रमाण वाढत आहे. अमेरिकेच्या तुलनेत हे प्रमाण एकतृतीयांश इतकेच आहे. त्यातील साधारण ७० टक्के कर्करोग हे टाळता येण्यासारखे आहेत. त्यातही ४० टक्के कर्करोग हे तंबाखू सेवनाने होतात असेही त्यांनी सांगितले.
डॉ. कोल्हटकर यांनी वैद्यक क्षेत्रातील विविध आधुनिक संशोधने परत परत सिद्ध केली. आरोग्याची त्रिमूर्ती म्हणजे योग्य आहार, योग्य विहार व सदाचार. यावर आधारित जीवनशैली ही जवळ जवळ सर्व व्याधी विकारांकरिता उत्तम प्रतिबंधक म्हणून काम करते, असे अध्यक्षीय भाषण करताना सांगितले. यावेळी ब्राह्मणसभेच्या अध्यक्षा प्रतिभा बिवलकर, विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ. उल्हास कोल्हटकर, गजानन जोशी, विश्राम परांजपे, प्रकाश ओक आदी मान्यवर उपस्थित होते.

Story img Loader