बाळाच्या जन्मानंतर त्याला आईचे दूध पाजले जाते. दूध हे आरोग्यासाठी आणि शरीराच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. दुधामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, व्हिटॅमिन्स यांसारखे असंख्य पोषक घटक असतात. दुधाच्या सेवनामुळे शरीराला खूप फायदा होतो. विविध आजारांपासून दूर राहण्यासाठी याची मदत होते. शारीरिक आणि बौद्धिक वाढ व्हावी यासाठी लहान मुलांना नियमितपणे दूध प्यायला दिले जाते. दुधामध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम असते. कॅल्शियम दातांसाठी आवश्यक असते. शरीर निरोगी ठेवण्यासाठी पोषक तत्वांची मुबलक प्रमाणात आवश्यकता असते आणि पोषक तत्वांची गरज भागवण्यासाठी सकस आहार घेणे आवश्यक आहे, ज्यामध्ये दुधाचा समावेश आहे.
बहुतेक लोकांना रात्री दूध प्यायला आवडते. तर काही जण हे नाश्ता करताना दोद्ध पितात. दुधामध्ये कॅल्शियम, प्रथिने, व्हिटॅमिन ए, बी6, डी, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि आयोडीन यांसारखे पोषक घटक आढळतात. दुध हे पौष्टिकतेचे उत्तम स्रोत मानले जाते, परंतु काही पदार्थांसोबत त्याचे सेवन टाळावे. आज आपण अशा काही पदार्थांबाबत जाणून घेणार आहोत ज्याचे सेवन दुधासह करू नये.
हेही वाचा : नाश्ता करताना टाळा ‘हे’ पाच पदार्थ! नाहीतर वाढेल वजन, होतील पोटाचे आजार
दही
आयुर्वेदानुसार दुधासह दह्याचे सेवन कधीही करू नये. तसेच दूध प्यायल्यानंतर देखील दही खाऊ नये. कारण आरोग्यासाठी ते हानिकारक ठरू शकते. यामुळे तुम्हाला पोटाच्या समस्या होण्याची शक्यता असते.
आंबट फळे
दुधाबरोबर आंबट फळांचे सेवन करणे टाळावे. दूध आणि आंबट फळांचे एकत्रितपणे सेवन केल्यास पोटदुखी आणि उलट्या होऊ शकतात. आंबट फळांचे सेवन केले असल्यास किमान २ तासांनी दुधाचे सेवन करावे.
गूळ
अनेक जण दुधात गोडपणा यावा म्हणून गुळाचा वापर करतात. गूळ आरोग्यासाठी फायदेशीर आहे यात शन्का नाही. मात्र दूध आणि गुळाचे एकत्रितपणे सेवन करणे हानिकारक मानले आहे. यामुळे तुमचे पोट खराब होऊ शकते.
मासे
मासे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात.मात्र यांचे दुधासह सेवन करणे टाळावे. यामुळे, तुम्हाला पचनाशी संबंधित समस्या जसे की पोटदुखी आणि अन्न विषबाधा एवढेच नाही तर तुम्हाला त्वचेशी संबंधित समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते.
चटपटीत खाणे
अनेकांना दुधासह मसालेदार पदार्थ खाण्याची आवड असते किंवा सवय असते. तर शक्यतो दुधासह मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. नाहीतर तुम्हाला अॅसिड रिफ्लक्सचा धोका तसेच अपचनाचा त्रास होऊ शकतो.
सॉल्टेड स्नॅक्स
चिप्ससारख्या खारट स्नॅक्ससोबत दूध पिण्याची चूक करू नये. त्यात मिठाचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइटचे संतुलन बिघडू शकते.
प्रोटीनयुक्त पदार्थ
दुधामध्ये प्रथिनांचे प्रमाण मुबलक प्रमाणात आढळते. तुम्ही जर का दुधासह प्रथिनेयुक्त पदार्थांचे सेवन केल्यास तर तुमच्या तुमच्या पचनसंस्थेवरचा भार वाढू शकतो. पचनाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणून दुधासह प्रथिनेयुक्त पदार्थांचे सेवन करणे टाळावे.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे. वरील माहितीचे अनुसरण करण्यापूर्वी तज्ज्ञांशी तसेच डॉक्टरांशी चर्चा करावी.)