आपल्या घरी कोणताही प्राणी पाळणे हा एक वेगळा अनुभव आहे. अनेकांना आपल्या घरी आपला आवडता प्राणी हवा असतो. त्या प्राण्याला ते आपल्या घरातील एक सदस्य म्हणूनच घेऊन येत असतात. पण नवीन कुत्रा घरी पाळण्यापूर्वी काही गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे. तुम्ही काही महत्त्वाच्या गोष्टींवरती लक्ष दिल्यास तुम्ही कुत्र्याची योग्य प्रकारची निवड करू शकता. नीट काळजीही घेऊ शकता. कारण निवड चुकली तर त्या प्राण्याला त्रास होऊ शकतो. प्राणी निवडीसाठी काही खास गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. या गोष्टी लक्षात घेऊनच कुत्रा घेतल्यास तुमच्या घरात हा नवीन सदस्य सहजपणे राहू शकेल.
निवड कशावर अवलंबून असते?
“योग्य पाळीव कुत्रा निवडणे आपल्या घराच्या आकारावर, तुमच्या लाइफस्टाइल अशा अनेक गोष्टींवर अवलंबून असते” असे चेन्नईमधील कुत्रा प्रशिक्षणातील अग्रगण्य असलेल्या नायट्रो के९ अकादमीचे मालक शरथ केनी इंडियन एक्सप्रेसशी बोलतांना सांगतात. त्यांच्या म्हणण्यानुसार, लोक पाळलेला कुत्रा सोडून देण्यामागे सर्वात सामान्य कारण आहे. ते कुत्रा निवडताना चुकीची निवड करतात आणि अनेकदा कुत्रा चांगला नाही असं म्हणून त्यालाच दोषही देतात.
आपण आपला पाळीव प्राणी निवडण्यापूर्वी या गोष्टी विचारात घ्या!
१.जागा
जेव्हा आपण कुत्रा घेण्याचा विचार करतो तेव्हा आपल्याकडे जागा किती आहे? हे लक्षात घेणे गरजेचे आहे. वेगवेगळ्या जातींना वेगवेगळ्या जागेची आवश्यकता असते. जर आपण एका लहान घरामध्ये राहत असाल तर आपल्याला शिह तझू, पग, डाचशंद किंवा किंग चार्ल्स स्पॅनियल सारख्या जातीचे कुत्रे योग्य ठरतील. आपल्याकडे मोठे घर असल्यास आपण नेहमीच प्रसिद्ध असलेले लॅब्राडोर किंवा गोल्डन रीट्रिव्हरचा विचार करू शकता.
२. अॅक्टिव्हिटी लेव्हल
बरेच लोक कुत्रा निवडतांना दुर्लक्षित करतात ते म्हणजे त्यांची वेगवेगळ्या लेव्हलची ऊर्जा. जर तुम्ही अशी व्यक्ती असाल जो पलंगावर झोपून राहणे पसंत करतात. तर तुम्हाला पग, फ्रेंच बुलडॉग किंवा अगदी ग्रेट डेनसारखी कुत्रे घेयला हवेत. पण तुम्ही या अगदी विरुद्ध असल्यास तुम्ही बॉर्डर कोल्ली किंवा बेल्जियम मल्लिनिस यासारख्या अधिक अॅथलेटिक कुत्र्यांची निवड करा.
३. स्वभाव
हा भाग कुत्र्यांच्या जातीबद्दल नाही तर त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आहे. तुम्ही संरक्षणासाठी कुत्रा घेऊ इच्छित असल्यास, तुम्ही हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे की कुत्रा न घाबरणारा आहे. जर तुम्ही घरातल्यांच्या सोबतीसाठी म्हणून कुत्रा घेत असाल तर तो कुत्रा माणसांसोबत सहजपणे वावरू,राहू शकतो का? या प्रश्नाचा विचार करावा.