मानसिक स्वास्थ्याच्या महत्त्वावर आपण आता कुठे खुलेपणाने बोलू लागलो आहोत. सध्याच्या आपल्या लाइफस्टाइलमुळे आपल्याला येणाऱ्या मानसिक तणावात दिवसेंदिवस भरच पडत आहे. हा ताण कधी कामाचा आणि आपल्या भविष्याचा असतो, तर कधी त्यामागे कौटुंबिक कारणं असतात, कधी भूतकाळात रमल्याने आपला हा ताण वाढतो, तर कधी चिघळलेले नातेसंबंध आपली काळजी वाढवत राहतात. त्यात गेल्या वर्षभराहून अधिक काळात करोनाने आणखी भर टाकली.

खरंतर आपला हा मानसिक ताण नेहमीच ‘खलनायक’ नसतो. अनेकदा तो आपल्याला मोठी मदत करू शकतो. पण ह्यातही २ प्रकार आहेत ते म्हणजे शॉर्ट टर्म स्ट्रेस आणि लॉंग टर्म स्ट्रेस. त्यातला, लॉंग टर्म स्ट्रेस हा प्रकार आपल्या मानसिक आणि शारीरिक स्वाथ्यावर मोठे नकारात्मक परिणाम करू शकतो. ते परिणाम नेमके कोणते? शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म स्ट्रेस कसे ओळखावेत? आणि मुख्य म्हणजे त्यावर मात कशी करावी याच सगळ्याबाबत आता जाणून घेऊया.

थेरपिस्ट आणि कौन्सिलर सरला टोटला आपल्या एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हणतात की, “सर्व प्रकारचे ताणतणाव वाईट नसतात. कारण त्यामुळे आव्हानात्मक परिस्थितीत आपली कार्यक्षमता आणि बळ वाढवण्यास मदत होते.” उदाहरणार्थ, परीक्षेच्या किंवा एखाद्या मुलाखतीच्या ५ मिनिटांपूर्वी आपण घेतलेला ताण हा तेवढ्यापुरता असतो. ह्यातील एक प्रकारच्या पॉझिटिव्ह ताणामुळे आपल्याला एखादं उत्तर त्वरित देणं किंवा समोर असलेल्या परिस्थितीला सामोरं जाण्याची हिंमत मिळते. एकदा आपण ती विशिष्ट परिस्थिती निभावून नेली की आपण रिलॅक्स होतो. हा ताण संपतो. ह्यालाच शॉर्ट टर्म स्ट्रेस असं म्हणतात.

दुसरीकडे मात्र, एखाद्या कारणामुळे अनेक दिवसांसाठी किंवा अनेक आठवड्यांपर्यंत कायम राहणारा तणाव हा लॉंग टर्म स्ट्रेस मानला जातो. मोठा काळ तणावात राहिल्याने संबंधित व्यक्तीच्या मनाला किंवा शरीराला आवश्यक ते रिलॅक्सेशन मिळणं प्रचंड अवघड होतं. थेरपिस्टच्या म्हणण्यानुसार, या पद्धतीचा ताण संबंधित उर्जा कमी करू शकतो. यामुळे त्या व्यक्तीला अनेक मानसिक किंवा शारीरिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

लॉंग टर्म स्ट्रेसमुळे कोणकोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो ?

  • वेदना
  • थकवा येणं आणि कोणतीही प्रेरणा शिल्लक न राहणं
  • झोप लागण्यास त्रास
  • विचार करण्यास तसेच एकाग्रतेने कोणतेही काम करण्यास अडचणी
  • परिस्थिती नियंत्रणाबाहेर असल्याची किंवा असहाय्य असल्याची भावना
  • सतत आजारपण
  • चिडचिड
  • सततची चिंता
  • खाण्याच्या वेळांमध्ये मोठे बदल
(Photo: Pixabay)

 ताण कसा टाळता येईल ?

  • सर्वात पहिल्यांदा तुमचा स्ट्रेस शॉर्ट टर्म आहे कि लॉंग टर्म ? हे ओळखा
  • तुमच्या तणावाचं मूळ कारण काय असू शकेल ? हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. भावनिक, व्यवसायिक, वैयक्तिक अशी अनेक कारणं यामागे असू शकतात.
  • तुम्ही लॉंग टर्म स्ट्रेसमध्ये असल्यास ह्यातून रिलॅक्स होण्याचे, सामना करण्याचे मार्ग शोधा, शिका. तुम्हाला शांतता देणारी, आनंद देणारी कोणतीही गोष्ट करा.
  • चांगल्या थेरपिस्ट किंवा कौन्सिलरचा सल्ला घ्या.

Story img Loader