हल्ली उठसूट सर्वाच्या तोंडात आणि घरात ‘अ‍ॅलोवेरा’ हे नाव नको एवढे स्तोम माजवून बसले आहे. अमका घेतो, तमक्याला याचा खूप रोगांवर फायदा झाला म्हणून मी घेतो, असे सध्या चालू आहे. कोरफड ही उष्ण आणि कडू आहे. त्यामुळे पित्त प्रकृतीच्या व्यक्तीने घ्यायची झाल्यास कमी मात्रेत व खडीसाखर घालून घ्यावी. कोरफड तव्यावर शेकवून किंवा कुकरमध्ये शिजवून घेऊन, दोन्ही बाजूच्या पात्या काढून टाकून, आतल्या गराचा किंवा त्याच्या रसाचा अनेक विकारांमध्ये उपयोग केला जातो. कोरफडने भूक वाढते, पचन सुधारते. अनेक कफ विकारांवर ते रामबाण औषध आहे. लहान मुलांचे आजार, स्त्रियांचे आजार यात कोरफडीचा उपयोग होतो. कोरफडीचा शरीराच्या बाहेरूनही उपयोग होतो. एवढेच नव्हे तर, पाऱ्याची शुद्धी करणे, शंखभस्म, अभ्रक भस्म, कपार्दिक भस्म अशा औषधी निर्माणामध्येही कोरफडीचा वापर केला जातो. याचे विशिष्ट उपयोग पुढील भागात पाहू.
– वैद्य राजीव कानिटकर