* विडय़ाचे पान उष्ण असल्यामुळे वात व कफ विकारांमध्ये ते उपयोगी आहे. डोके जड होणे, दुखणे, सतत शिंका येऊन सारखे नाक गळणे अशा सर्दीमध्ये पाती चहाच्या काढय़ात धने, आले, मिरे यांबरोबर विडय़ाची दोन पानेही टाकावी.
* तोंडात दरुगधी येत असेल तर कंकोळ, जायपत्री, कापूर, वेलची व बडीशेप घालून दोन्ही जेवणानंतर विडा खावा.
* विडय़ाची पक्की पाने देठासकट खावीत. याने पोट साफ होते.
* घशामध्ये कफ साठून आवाज खरखरतो किंवा बसतो. अशा वेळी ज्येष्ठमध पावडर, कंकोळ, मिरी, कात घातलेले विडय़ाची पाने बराच वेळ चावून चघळून खावीत. त्यामुळे घसा, कंठ साफ होतो.
* सतत सुक्या खोकल्याची ढास लागत असेल तर पानांमध्ये ज्येष्ठमध आणि थोडा कात टाकून चघळावे. ढास थांबते.
* कोणताही विषारी प्राणी, कीटक चावला किंवा अंगावर चिरडला तर त्याचा विखार शरीरामध्ये पसरू नये म्हणून लगेच त्या ठिकाणी विडय़ाच्या पानाचा रस चोळावा.
* सूज कमी होण्यासाठी, गळू फुटण्यासाठी विडय़ाची पाने वाटून त्यामध्ये तूप व हळद घालून ते गरम करून त्याचे पोटीस बांधावे.
* सुपारी, चुना, कात, हिरवी पत्ती घालून केलेला विडा, दोन्ही जेवणानंतर खावा. हा उत्तम बलवर्धक आहे.
– वैद्य राजीव कानिटकर