अॅनिमिया हा भारतीय महिला आणि मुलांमध्ये सर्वाधिक आढळणाऱ्या आजारांपैकी एक आजार आहे. सुमारे ५० टक्के स्त्रिया आणि मुले या विकाराने त्रस्त आहेत.
अॅनिमिया म्हणजे काय?
अॅनिमिया म्हणजे रक्तातल्या लाल पेशी किंवा हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे रक्ताची ऑक्सिजन वहन करण्याची क्षमता कमी होणे. यामुळे पेशींना मिळणारा ऑक्सिजन कमी होतो आणि अवयवांच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होतो.
अॅनिमियाची कारणे
बहुतांश वेळा अॅनिमिया आहारातील लोहाच्या कमतरतेमुळे होतो. जीवनसत्त्वाची कमतरता, अतिरक्तस्राव, लहान मुलांमध्ये जंतांचा प्रादुर्भाव, लाल पेशींचे काही आनुवंशिक आजार (सिकल सेल अॅनिमिया, थॅलासेमिया) तसेच काही दीर्घकालीन आजार ही इतर कारणेही अॅनिमियाला कारणीभूत आहेत. गरोदरपणातील ‘ब’ जीवनसत्त्वाच्या अतिरिक्त गरजेमुळे तसेच प्रसूतीवेळी रक्तस्राव झाल्यानेही स्त्रियांमध्ये अॅनिमियाचे प्रमाण जास्त आढळते. प्रजननक्षम वयातील स्त्रियांमध्ये पाळीत अतिरिक्त रक्तस्राव होत असल्यास त्यांना अॅनिमिया होण्याची शक्यता वाढते. लहान मुलांमध्ये कुपोषण आणि अयोग्य आहार ही अॅनिमियाची प्रमुख कारणे आहेत.
अॅनिमियाची लक्षणे
या आजारात लवकर थकवा येणे, धाप लागणे, काही वेळा शरीर व डोके दुखणे, धडधड होणे, चक्कर येणे, चेहरा फिकट दिसणे अशी लक्षणे दिसून येतात. अॅनिमिया दीर्घकाळ राहिल्यास नखे ठिसूळ होतात. तीव्र स्वरूपाच्या अॅनिमियामध्ये पायाला किंवा सर्वागाला सूज येऊ शकते.
परिणाम
* वेळेत निदान होऊन उपचार न मिळाल्यास अॅनिमियामुळे शरीरावर बरेच दुष्परिणाम होतात.
* हृदयावर व फुप्फुसांवर अतिरिक्त ताण पडून ते निकामी होण्याचा धोका असतो.
* थकव्यामुळे व्यक्तीची कार्यक्षमता अगदी कमी होते.
प्रतिकारशक्तीवर विपरीत परिणाम होतो.
* गर्भवती स्त्रियांमधील अॅनिमियामुळे बाळाची वाढ अपूर्ण राहते, अपुऱ्या दिवसांचे गर्भारपण, कमी वजनाचे बाळ जन्माला येणे, बाळंतपणात गुंतागुंत होणे असे धोके संभवतात.
* लहान मुलांच्या मानसिक आणि शारीरिक वाढीवर दीर्घकालीन दुष्परिणाम होतात.
निदान
लक्षणांवरून व रक्त तपासणीवरून अॅनिमियाचे निदान करता येते. हिमोग्राम करून रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण तपासून अॅनिमिया आहे की नाही, त्याचा प्रकार आणि त्याची तीव्रता, या गोष्टी समजतात. काही रुग्णांमध्ये कारण शोधण्यासाठी इतर तपासण्यांचीसुद्धा गरज भासते.
उपचार
अॅनिमियाचे उपचार करताना लोहाच्या आणि आवश्यक तेव्हा जीवनसत्त्वाच्या गोळ्या दिल्या जातात. तीव्र अॅनिमिया असल्यास लोहाचे इंजेक्शन आणि गरज पडल्यास रक्तही द्यावे लागते. अॅनिमियाचे कारण शोधून त्यानुसार काही विशिष्ट उपचारही केले जातात.
अॅनिमिया कसा टाळाल?
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पौष्टिक आणि समतोल आहार घेणे आणि आहारात लोहयुक्त पदार्थाचा समावेश करणे.
लोहयुक्त पदार्थासाठी भाज्या : हिरव्या पालेभाज्या विशेषत: पालक, तसेच ब्रोकोली, बटाटे , बीट, तोंडली.
फळे : सफरचंद, डाळिंब, केळी, कलिंगड, स्ट्रॉबेरी.
धान्य : सर्व धान्ये, विशेषत: कडधान्ये(छोले, राजमा, मटकी ) आणि डाळी, तांदूळ.
मांसाहारी पदार्थ : अंडी, मासे, चिकन, मटण, विशेषत: लिव्हर.
इतर पदार्थ: गूळ, टोफू, जवस, भोपळ्याच्या बिया, ओट्स, काजू, शेंगदाणे, जर्दाळू या पदार्थामध्येही लोहाचे प्रमाण जास्त असते. आहारातील लोहाचे शरीरात नीट शोषण व्हावे यासाठी आहारात ‘क’ जीवनसत्त्व असलेल्या पदार्थाचा समावेश करावा, तसेच जेवणानंतर लगेच चहा, कॉफी घेऊ नये. स्वयंपाक घरात शक्य ते पदार्थ करण्यासाठी लोखंडी भांडय़ांचा उपयोग केला तर त्यातून शरीराला लोह मिळते. अॅनिमिया होऊ नये म्हणून पौष्टिक आहार घेणे, तसेच वैयक्तिक आणि परिसराची स्वछता राखणे सगळ्यात महत्त्वाचे आहे. अस्वच्छता असली की मुलांमध्ये जंतांसारखे आजार होऊन अॅनिमिया होतो. गरोदर स्त्रिया, पौगंडावस्थेतील मुली, लहान मुले यांना अॅनिमिया होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लोहाच्या गोळ्या देणे गरजेचे असते. लहान मुलांना नियमित अंतराने जंतनाशक औषध देणे आवश्यक आहे.
– डॉ. शीतल श्रीगिरी, स्त्रीरोगतज्ज्ञ
(शब्दांकन – भक्ती बिसुरे)