हॉटेलमध्ये जड अन्न पचण्यासाठी, बाहेर पडताना आपण बडीशेप खातो. त्याचे आणखी उपयोग बघू.

* बडीशेप ही गॅस कमी करणारी व उत्तम पाचक आहे. याची १-१ सपाट चमचा पावडर जेवणापूर्वी दोन वेळा मधातून घेतल्यास उत्तम भूक लागते. काळ्या मिठाबरोबर याचे चूर्ण जेवणाअगोदर घेतल्यास अन्नपचन चांगले होते. जेवणानंतर पोट फुगणे, रोज पोटात वायू धरून पोट दुखणे थांबते.

* बडीशेप+साखर चावून खाल्ल्यास ओकारी थांबते.

* तापात अंगाची आग होणे, सारखी तहान लागणे, कोणत्याही विकारात संडास-लघवीची आग, डोळ्यांची जळजळ, हातापायांची आग होत असेल तर धने, जिरे, बडीशेप व खडीसाखर यांचे पाणी उकळवून, गाळून थंड झाल्यावर घ्यावे.

* जुलाब होणे, वारंवार थोडे थोडे पोटात मुरडून, चोथा-पाणी सारखे किंवा आंव मिश्रित शौचास होत असेल तर बडीशेप, खसखस, धने, जिरे, सुंठ ही पाच द्रव्ये चहासारखी पाण्यात उकळवून गाळून ते पाणी सकाळ-संध्याकाळ घ्यावे. अजीर्णामुळे होणाऱ्या आंव-जुलाबावर अप्रतिम औषध आहे.

* एक ग्रॅम बडीशेप चूर्ण एक चमचा मधात मुलांना दररोज सकाळी चाखावे. उत्तम बुद्धिवर्धक योग आहे.

chart

वैद्य राजीव कानिटकर