डॉ. संजीवनी राजवाडे
उपवास सहसा दोन प्रकारचे असतात. धार्मिक कारणांसाठी केले जाणारे उपवास आणि व्याधी निवारणासाठी ठरवून केले जाणारे उपवास. धार्मिक उपवासांसाठी त्या-त्या प्रदेशानुसार वेगवेगळे पदार्थ चालणारे किंवा न चालणारे असतात. प्रकृतीच्या कारणास्तव मुद्दाम केल्या जाणाऱ्या उपवासांसाठी मात्र मूगडाळीची खिचडी, भाताची पेज, मुगाचे कढण असे पोटाला हलके असे पदार्थ खाता येतात.
आणखी वाचा
धार्मिक उपवासांच्या काळात काही पथ्ये-
- उपवासांसाठी जड पदार्थ कमी करून राजगिरा, शिंगाडा, वरी हे घटक वापरून पदार्थ करता येतील. गोड पदार्थामध्ये गूळ वापरता येईल. साबुदाणा शक्यतो भाजून घेऊन वापरलेला चांगला. त्यामुळे आम्लपित्त व गॅसेसचा त्रास टाळण्यासाठी मदत होईल. उपवासाच्या दिवशी पोटभरीच्या दृष्टीने उपवासाच्या भाजणीचे थालिपीठ चांगले. त्यासाठी शिंगाडा, साबुदाणा, राजगिरा व वरी भाजून जिरे, तिखट, मीठ घालून भाजणी तयार करावी. हे थालिपीठ लिंबाच्या लोणच्याबरोबर खावे. म्हणजे पचनालाही फायदा होईल.
- उपवासाच्या दिवशी जर्दाळू वा कोकमाचे सरबत घेतल्यास आम्लपित्ताचा त्रास कमी होण्यास मदत होते. कोकमाची सोलकढीही करता येईल. परंतु ज्यांना कोलेस्टेरॉल वाढल्याचा त्रास आहे, त्यांनी सोलकढी आपल्या तब्येतीचा विचार करून घ्यावी.
- सुकामेवा उपवासाला चालतो. एका वेळी मुठीत मावेल एवढाच एकत्र केलेला सुकामेवा खावा. त्यातून ऊर्जा मिळते.
- धार्मिक उपवासांना सहसा लोक सुंठ व जायफळ वापरत नाहीत. परंतु उपवासाचे पदार्थ खाऊन त्रास होणे टाळण्यासाठी सुंठ व जायफळाचा वापर करता येतो. त्यासाठी उपवासाच्या गोड पदार्थामध्ये जायफळ व तिखट पदार्थामध्ये सुंठ वापरता येईल.
- फळे, ताक, दही हेही उपवासाला चालणारे व चांगले पदार्थ.
- वरी, शिंगाडा, साबुदाण्यातून तंतुमय पदार्थ विशेष मिळत नाहीत. त्यामुळे उपवासाच्या दुसऱ्या दिवशी अनेकांना बद्धकोष्ठाचा त्रास होतो. त्यासाठी उपवासाच्या इतर पदार्थाबरोबर फळे, काकडी, लाल भोपळा हे पदार्थ घ्यावेत. बटाटय़ाऐवजी रताळे वापरावे. तसेच थोडय़ा प्रमाणात शेंगदाणेही वापरावेत. या पदार्थामधून काही प्रमाणात तंतुमय पदार्थ मिळतात.
- काहींकडे उपवास म्हटले की उपवासाच्या खास पदार्थाची रेलचेल असते. साबुदाणा वडे, बटाटा चिवडा असे तळलेले पदार्थ, पेढे, बर्फी, बासुंदी असे आटीव दुधाचे पदार्थ, साखरेचा पाक करून केलेले रताळ्याच्या गोड चकत्यांसारखे पदार्थ कमीच खाल्लेले किंवा टाळलेले बरे.
प्रकृतीसाठीचे उपवास का करतात?
- मुद्दाम ठरवून केल्या जाणाऱ्या उपवासांमध्ये शरीराचे ‘डीटॉक्सिफिकेशन’ व्हावे हा हेतू असतो. सामान्य व्यक्ती साधारणत: २ ते ३ दिवस न खाता, विविध द्रवपदार्थ घेऊन उपवास करू शकते. या उपवासांमध्ये शरीरात साठवलेली अधिकची साखर वापरली जाते आणि मग साठलेल्या चरबीतून ऊर्जा मिळवण्याचा प्रयत्न शरीर करते. म्हणजेच चरबी जाळली जाते. यात स्नायू (मसल मास) कमी होत नाहीत. अशा उपवासांच्या काळात ‘एन्डॉर्फिन’ नावाच्या संप्रेरकाचे शरीरात स्रवण होऊ लागते. या संप्रेरकास ‘फील गुड हॉर्मोन’ असेही म्हणतात. बरे व ताजेतवाने वाटण्याची भावना त्यामुळे निर्माण होते. आठवडय़ातून एक दिवस पोटाला विश्रांती दिल्याने पचनयंत्रणेला विश्रांती मिळते, तसेच ‘डीटॉक्सिफिकेशन’ होण्यास मदत होते. पुन्हा कामाला लागण्यासाठी ताजेतवाने वाटते.
- प्रकृतीसाठी उपवास करताना दिवसात एकदा कोणताही हलका व आरोग्यदायी पदार्थ पोटभर खाता येईल. इतर वेळी गरम पाणी वा द्रवपदार्थ घ्यावेत किंवा फळे खावीत. बद्धकोष्ठाचा त्रास असलेल्यांनी प्रकृतीसाठी उपवास करताना रात्री झोपताना एक ग्लास गरम दुधात १ चमचा साजुक तूप घालून प्यावे. त्याने रात्रीच्या वेळी पोटही भरते.
- चांगल्या आरोग्यासाठी केल्या जाणाऱ्या उपवासांसाठी ताक, सूप, ज्यूस, भाताची पेज, डाळींचे कढण, शिंगाडय़ाच्या किंवा साबुदाण्याच्या पिठाची ताक, जिरे व मीठ घालून केलेली आंबील असे द्रवपदार्थ घेता येतील. कफाचा त्रास असलेल्यांनी दूध टाळलेले बरे.
- काही लोक वजन कमी व्हावे यासाठी उपाशी राहण्याचा अतिरेक करतात. अशा वेळी शरीरातील पाणी कमी होऊन ‘डिहायड्रेशन’ होऊ शकते. त्यामुळे थकवा जाणवतो, शरीराला पोषण मिळत नाही, हातापायात गोळे येतात, तसेच झोप लागत नाही. खाण्याची इच्छा वारंवार होत असल्याने अन्नाच्या वासानेही पोटात आम्लाचे स्रवण होऊ लागते. त्यामुळेही आम्लपित्त होऊ शकते. अतिरेकी उपवासांमध्ये डोकेदुखी व ताणतणावांचाही त्रास होऊ शकतो. त्यामुळे ते टाळावे.
- आयुर्वेदात प्रकृतीनुसार कुणी कसे उपवास किंवा लंघन करावे, ते सांगण्यात आले आहे. कफ प्रवृत्तीच्या व्यक्ती मुळात बलवान असतात. त्यांना उपवास मानवू शकतात. पित्त व वात प्रकृतीच्या व्यक्तींना मात्र उपवास फारसे सहन होत नाहीत. त्यातही वात प्रकृतीच्या व्यक्तींना त्रास लगेच होऊ शकतो. त्यामुळे उपवास वा लंघन करण्यापूर्वी आपल्या प्रकृतीस ते झेपतील का, याचा विचार करायला हवा. न खाता केवळ द्रवपदार्थ घेऊन किंवा कमी खाऊन उपवास करायचे असतील तर व्यक्तीचे वय, वजन किती आहे, तिला मधुमेह, टीबीसारखे काही आजार आहेत का, नुकतीच शस्त्रक्रिया वगैरे झाली आहे का, गरोदरपण आहे का, या गोष्टींचा विचार करावा लागतो. त्यामुळे या व्यक्तींनी उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.
- आयुर्वेदात कोणताही रोग झाल्यास आधी लंघन करा असे सांगितले आहे. पण काहीही न खाता लंघन करणे आजच्या काळात शक्य होत नाही. त्यामुळे लंघन करण्यापूर्वीही आपली प्रकृती लक्षात घेणे गरजेचे.