डॉ. चंद्रशेखर मेश्राम, मेंदूरोगतज्ज्ञ

रेबीज हा उष्ण रक्ताचे प्राणी (जसे कुत्रा, ससा, माकड, मांजर इत्यादी) चावल्यानंतर किंवा प्राण्यांमधील विषाणूंमुळे होणारा गंभीर आजार आहे. परंतु या प्राण्यांमध्ये रेबीजच्या विषाणूंचे संक्रमण असावे लागते. हा प्राणघातक असला तरी त्यावर प्रतिबंधात्मक लस उपलब्ध आहे आणि त्यातून रुग्ण बरा होऊ शकतो.

रेबीज विषाणूग्रस्त कुत्रा, मांजर, माकड, लांडगा, कोल्हा, वटवाघुळ, मुंगुस व इतर काही प्राण्यांनी दंश केल्यास त्याच्या लाळेमध्ये असलेले विषाणू जखमेतून माणसाच्या शरीरात प्रवेश करतात. रोगाची लक्षणे दंश झालेली (विषाणूबाधित) जागा व मेंदूपासून किती अंतरावर आहे यावर अवलंबून असते. मेंदू व बाधित जागेतील अंतर जेवढे कमी तेवढी रोगाची लक्षणे लवकर दिसतात. एका ठिकाणी चावा घेतल्यापेक्षा दोन-तीन ठिकाणी चावा घेतलेल्या माणसात रोगाची लक्षणे लवकर व अधिक तीव्रतेने दिसू शकतात. चावल्यानंतर साधारणपणे २० ते ३० दिवसांत रोगाची लक्षणे दिसतात. परंतु काही वेळा यापेक्षाही अधिक काळ म्हणजे काही महिने ते वर्ष लागतात. रेबीजच्या एकूण रुग्णांपैकी ९५ टक्के नागरिकांना हा आजार रेबीज विषाणूने ग्रस्त कुत्र्याने चावा घेतल्यामुळे होतो. रेबीजचे क्लासिकल आणि पॅरॅलिटिक रेबीज असे दोन प्रकार आहेत. एकूण रुग्णांत ८० टक्के रुग्ण हे क्लासिकल रेबीजचे असतात. पॅरॅलिटिक रेबीजमध्ये रुग्णाला पाण्याची भीती वाटत नाही, परंतु ताप, डोकेदुखी, पायांमध्ये कमजोरी, जखम खाजवणे, जखमेची आग होणे आदी त्रास होतो. या रुग्णाला पक्षाघात आणि हृदयविकार संभवतो. जगातील विविध देशाच्या तुलनेत रेबीजने भारतात सर्वाधिक नागरिकांचा मृत्यू होतो.

लक्षणे

  • तीव्र स्वरूपाची डोकेदुखी
  • ओकारी आल्यासारखी वाटते
  • नाका-डोळ्यातून पाणी वाहते
  • विषाणू मेंदूत शिरल्यावर
  • झटके येणे
  • मानसिक त्रास, निद्रानाश,
  • भास होणे
  • पाण्याची भीती वाटणे
  • घसा पूर्णपणे खरवडून निघणे
  • आवाजात बदल

प्रतिबंधात्मक उपाय

  • प्राणी चावल्यास किंवा त्याने नखाने ओरबडल्यास जखम साबण व स्वच्छ पाण्याने धुवावी (जंतू कमी होतात)
  • शक्य असल्यास त्यावर अँटिसेफ्टिक मलम लावावे
  • जखम हाताळताना वेळोवेळी हात स्वच्छ धुवावेत
  • जखमेतून रक्त जास्त वाहत असल्यास त्यावर पट्टी बांधा
  • चावलेल्या कुत्र्याला
  • प्रतिबंधक लस दिली काय?
  • याची माहिती घेणे
  • त्वरित जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
  • प्रतिबंधात्मक लस घेणे
  • कुत्र्यांपासून सुरक्षित
  • अंतर राखा

पाळीव कुत्र्यांचा आजार टाळण्यासाठी

  • दर सहा महिन्यांनी आपल्या कुत्र्याला रेबीजची लस द्या
  • भटक्या कुत्र्यांच्या संपर्कात येऊ देऊ नका
  • कुत्र्यात वेगळेपण जाणवल्यास पशुवैद्यांशी त्वरित संपर्क साधा
  • इतर प्राण्यांपासून आपल्या कुत्र्याला दूर ठेवावे