‘स्पॉँडिलायसिस’ हा शब्द आधुनिक शास्त्राचा, आज मात्र प्रत्येक घरात ऐकू येणारा आहे. त्याची कारणे अनेक आहेत. व्यायामाचा अभाव, आहाराचा असमतोल, विहारातील सवयी आणि निश्चित-नेमक्या पदार्थाचा अभाव. आयुर्वेदशास्त्रामध्ये या व्याधीशी जुळणारी व्याधी वर्णन केली आहे आणि त्याचे पथ्य-अपथ्य व्यक्तीला यापासून दूर ठेवण्यासाठी असल्यास त्यावर नियंत्रण ठेवून आनंदी आयुष्य जगण्यासाठी मदत होते. मणक्यांचा विकार वाताच्या असहय्य अवस्थेमुळे होते हा मुद्दा लक्षात घ्यावा..

काय खावे?

स्पाँडिलायसिसच्या रुग्णांनी सतत गरम पाणीच प्यावे. कामावर असताना गरम पाणी शक्य नसल्यास साधे पाणी तहान भागेल एवढे घ्यावे. घरातून सुंठीने सिद्ध केलेले पाणी प्यावे. या पाण्याचा चांगला फायदा होतो. कृश व्यक्तींनी तूप, लोणी, खवा जास्त प्रमाणात सेवन करावा. जेवणाच्या पहिल्या घासाबरोबर सुंठ व तूप सेवन केल्यास फायदा संभवतो. स्थूल व्यक्तींनी ओवायुक्त तूप आहाराच्या सुरुवातीला घेऊन त्यावर गरम पाणी प्यावे. दुधाचे सेवन या व्याधीची लक्षणे कमी करण्यास मदत करतात. स्थूल व्यक्तींमध्ये या व्याधीमुळे मांडय़ा व खांदे जखडलेले असताना ताकात ओवा, लसूण टाकून आहारात घ्यावे. दह्य़ाच्या पाण्यात हिंग टाकून सेवन केल्यासही गुणकारक ठरते. या त्रासाच्या व्यक्तीच्या आहारात आले, हळद, लसूण, कांदा जास्त असावे. सलाडमध्ये केवळ गाजर, कोवळा मुळा, स्त्रियांनी विशेष करून बीट सेवन करावे. स्पाँडिलायसिसचा त्रास असणाऱ्यांनी एरंडेल तेल पावसाळ्याच्या आधीपासून घ्यायला सुरुवात करावी. ढोबळमानाने कृश व्यक्तींनी दुधातून एरंडेल तेल सप्ताहातून दोन वेळा रात्री झोपताना घ्यावे तर स्थूल व्यक्तींनी आठवडय़ातून तीन वेळा गरम पाण्यातून एरंडेल तेल घ्यावे. ज्यांना मलप्रवृत्तीचा त्रास संपवतो त्यांनी गोमूत्रातून एरंडेल तेल सेवन केल्यास फायदा होताना दिसतो व शरीरातील जडत्वही कमी होते. कृश व्यक्तींनी नारळाच्या पाण्यात आल्याचा रस टाकून सेवन करावे तर स्थूल व्यक्तींनी आहाराऐवजी नारळाचे पाणी व वरील उल्लेखलेले ताक जुन्या तांदळाबरोब घ्यावे. जेवणात वेगळा तळलेला लसूण खाल्ल्यास खूप फायदा होतो. परंतु भोजनोत्तर गरम पाणी घेणे आवश्यक ठरते.

स्पाँडिलायसिस पथ्य

स्पाँडिलायसिस या शब्दाचा आयुर्वेदीय ग्रंथात उल्लेख नाही. परंतु सध्याच्या काळात या विकाराने अगदी लहान वयातील व्यक्तींपासून आजी-आजोबांपर्यंत त्रस्त झालेले दिसतात. या विकारामधील लक्षणांशी साधर्म्य असलेला आयुर्वेदातील वातप्रकार लक्षात घेता याचे पथ्य उल्लेखित आहेत.

स्पाँडिलायसिसमध्ये अस्थी, मांस व मज्जेच्या विकृतीचा अंतर्भाव असून विकृत झालेला वात यामध्ये अवयवात्मक विकृती निर्माण करतो. साधारणत: या अवस्थांमध्ये क्षय दिसत असल्याने त्याप्रमाणे वाताचा क्षय कमी करणे, मांसपेशीमध्ये शैथिल्य निर्माण करून वात नाडय़ांचे पोषण करणे या दृष्टीने आहार योजल्यास चिकित्सेला मदत होऊ शकते. ही व्याधी असताना स्थूल व्यक्तींनी नाचणी, सातू, वरीचे तांदूळ, सर्व जुनी धान्ये तसेच कृश व्यक्तींनी गहू, तांबडी साळ, साळीचे तांदूळ जास्त प्रमाणात सेवन करावे. शेवया, पालक, वांगी, कारली, पडवळ, बांबूच्या कोंबाची भाजी जास्त प्रमाणात सेवनात घ्यावे. त्याचबरोबर ज्या व्यक्ती बारीक व वयस्कर आहेत, त्यांनी दुधी भोपळ्याची भाजी, दुधी हलवा आदी दुधीचे पदार्थ जास्त प्रमाणात सेवन करावेत. डाळींमध्ये तूर, मूग, मसूर व कुळीथ यांचा फायदा चांगला होतो. ज्या कृश व्यक्ती वयोवृद्ध स्त्रिया आहेत व ज्यांना पित्ताचा त्रास नाही, त्यांनी उडदाचे पाणी, उडदाचे पदार्थ जास्त सेवन करावेत. स्थूल व्यक्तींनी स्नेह कमी असलेले किंवा नसलेले मांस, मांसरस घ्यावे तर कृश व्यक्तींनी कोंबडी, बोकड यांचे मास, मांसरस घेतल्यास फायदा होतो.

काय खाऊ नये?

पावसाचा जोर वाढला की, व्याधीची लक्षणे वाढणार हे गृहीत धरावे. म्हणूनच पथ्य-अपथ्यांचा विचार पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच मनोभावे केल्यास गुणकारक ठरते. काही व्यक्तींना वाटते की, खाण्यातील पदार्थानी त्याची लक्षणे वाढलीच कशी, परंतु, अपथ्यकर पदार्थानी व्याधी वाढते हे पदार्थ कळल्यावर सहज लक्षात येते. मका व बाजरीचे पदार्थ स्पॉँडिलायसिसची लक्षणे वाढविताना दिसून येतात तर गव्हाचे जड पदार्थसुद्धा कृश, स्थूल व्यक्तींमध्ये आजार वाढविताना दिसतात. वाल, पांढरे व काळे वाटाणे, चवळी या उसळी तसेच मटकी व उडदाचे जड पदार्थ, तर मुगाचे घट्ट वरणसुद्धा वात वाढवून लक्षणांमध्ये भर पाडण्यास हातभार लावते. हरबऱ्याचे सालींसह उकडलेले चणे पोटातील गॅस वाढवितात तर शरीरस्थ वात वाढविण्यास मदत करतात. म्हणून या सर्वाचा मोह या व्यक्तींनी टाळलेला बरा. स्पॉँडिलायसिसमध्ये जखडणे हे लक्षण असताना पालेभाज्या, भेंडी, मुळा हे टाळावे. तर या व्यक्तींची कारली, पडवळ हे टाळणे हितकारक ठरते. कोणत्याही प्रकृतीच्या स्पॉँडिलायसिसमध्ये रताळे, साबुदाणे, बटाटे हे पिष्टमय पदार्थ टाळलेले बरे. कारण, लक्षणे वाढणार यात शंका नाही. उसाचा रस, थंड पेय, फ्रिजमधील पदार्थ सर्व ऋतूंत खाण्याची प्रथा शहरांमध्ये विशेषत: उष्ण शहरांमध्ये दिसून येते. हे पदार्थ लक्षणे वाढवणारे ठरतात. तर उन्हाळ्यात या पदार्थाचे सेवन केल्यास जखडणे, दुखणे, सूज येणे ही लक्षणे दिसून येतात. शिळे अन्न, तळलेल्या पदार्थाचे अतिसेवन ही व्याधी निर्माण करू शकतात. अतिथंड पाणी, स्वभावत: थंड असलेले पाणी लक्षणे वाढवितात.

व्यायाम आणि विहार

स्पॉँडिलायसिसच्या व्यक्तींनी फॅनखाली सरळ रेषेत झोपणे वा बसणे टाळावे. गळ्याभोवती, कमरेला मफलर किंवा उबदार वस्त्र सतत घालून राहावे. गार हवेत फिरताना किंवा पावसाळा, थंडीतील गारवा असताना ही विशेष काळजी घेणे आवश्यक असते. या व्यक्तींनी पाण्यात सुंठ टाकून पाणी उकळून घ्यावे. दिवसभर हेच सेवन करावे. व्याधीची तीव्र अवस्था असताना तेल गरम करून लावून नंतरच शेकणे. व्यक्ती प्रकृती, अवस्थानुसार तेलांचे वैविध्य असले तरी तिळाचे तेल, नारायण तेल, बला तेल, अश्वगंधा तेल यांचा उपयोग होताना दिसून येतो. मेथीदाण्यांसह पाणी सेवन केल्याने फायदा झाल्याचे दिसून आले आहे. काढण्याची वाफ घेणे, बस्ती, मृदू अभ्यंगस्नान करण्याने व्याधीची लक्षणे कमी होताना दिसतात. परंतु, व्याधीच्या प्रकारांमध्ये विविधता असल्याने वैद्यकीय सल्ल्याने हे उपाय स्वत:हून करण्याचा प्रयत्न असावा. जोराने चोळणे, मान मोडणे, चुकीचे व्यायाम शक्यतो करू नये. काही प्रकारांमध्ये मांडी घालून बसणेच अपथ्याचे असल्याने बसलेली योगासने टाळावी लागतात. मणक्यांच्या अवस्थेनुसार सपाट ठिकाणी झोपावे. परंतु, झोपताना गार हवा लागणार नाही याची काळजी घ्यावी. अन्यथा स्तंभता वाढून वेदना वाढण्याची शक्यता अधिक. या व्याधींचे हे सामान्य उपाय समजावे, परंतु, तज्ज्ञांचा सल्ला आवश्यकच.