पावसाळ्यात शरीरातील वाताचा त्रास वाढतो. सांधेदुखी हे त्याचे प्रमुख लक्षण. ज्यांना मुळातच सांधे दुखण्याचा त्रास आहे त्यांचा त्रास तर वाढतोच, पण निरोगी व्यक्तींनाही त्रास होण्याची शक्यता असते. हे त्रास होऊ नयेत यासाठी आयुर्वेदात ऋतुचर्या सांगितली आहे.
वात म्हणजे काय?
एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेणारा, चलन करणारा तो वात अशी वाताची साधी व्याख्या करता येईल. पृथ्वीवरील वातामुळे (म्हणजे वाऱ्यांमुळे) विविध वातावरणीय घडना घडतात. यातील काही उपकारक असतात, तर काही विध्वंसक. पाऊस देणारा मॉन्सून हा एक प्रकारचा कल्याणकारी वात. पण त्या वाताने पाऊस दिलाच नाही तर तोच विध्वंसकही ठरू शकतो.
हा झाला निसर्गातील वात. पण आपल्या शरीराच्या आतही एक वात असतो. हा वात म्हणजे ‘वात’, ‘पित्त’ आणि ‘कफ’ प्रकृतींमधील एक. शरीरात घडणाऱ्या प्रत्येक ज्ञात-अज्ञात क्रियांचा कर्ता हा वात आहे, असे आयुर्वेद मानतो. हा वात जेव्हा ‘प्राकृत’ असतो, आपले काम योग्य रीतीने करत असतो तेव्हा तो चांगलाच असतो. परंतु तो विकृत किंवा प्रकोपित झाला तर शरीरासाठी त्रासदायक ठरू शकतो.
वातप्रकोप
वात प्रकोपित होण्याची कारणे अनेक आहेत. तिखट, कडू आणि कशाय (तुरट) रसाचे अतिसेवन, अतिव्यायाम, रात्रीचे अतिजागरण, भय, शोक, चिंता ही मानसिक कारणे, शरीरातील अधारणीय वेगांचे धारण तसेच खूप कोरडे व रुक्ष जेवण करणे यामुळे वाताचा त्रास होऊ शकतो. वर्षांऋतूत तर वातप्रकोप होण्यासाठी एक प्रकारे अनुकूलच परिस्थिती तयार झालेली असते.
उन्हाळ्यात शरीराचे बल कमी झालेले असते. त्यातच पावसाळ्यात हवेतील आद्र्रता वाढते आणि गारवा येतो. या दिवसांत पाणी दूषित आणि ‘आम्लपाकी’ असते. त्यामुळे वाताचे त्रास या ऋतूत जास्त प्रमाणात होतात.
सांधेदुखी हे वाताच्या त्रासाचे महत्त्वाचे लक्षण. ज्यांना संधीवाताचा त्रास आहे त्यांचा त्रास वाढतोच, पण आरोग्य चांगले असलेल्या आणि अगदी तरुण मंडळींनाही पाठ, कंबर दुखणे, गुडघे दुखणे हे त्रास होऊ शकतात. ‘सायटिका’ (कमरेपासून टाचेपर्यंत सरळ रेषेत दुखणे), ‘स्लिप डिस्क’ असे त्रासही या दिवसांत वाढतात. या सर्व विकारांमध्ये सांध्यात सूज येऊन तो दुखू लागतो, स्नायूही दुखू लागतात.
दमा हाही वातप्रकोपाचेच लक्षण आहे. पावसाळ्यात हवेतील आद्र्रता वाढते आणि ओलाव्यामुळे भिंतीवर, दमट कपडय़ांवर वाढणाऱ्या बुरशीचे प्रमाणही अधिक असते. बुरशीच्या या कणांमुळेही अनेकांना दम्याचा त्रास होऊ शकतो.
पावसाळ्यातील ऋतुचर्या
पावसाळ्यासाठी म्हणून आयुर्वेदात ऋतुचर्या सुचवण्यात आली आहे. या ऋतुचर्येचे पालन केल्यास वाताचे त्रास दूर ठेवण्यासाठी नक्कीच फायदा होईल. ही ऋतुचर्या बघू या-
- शक्यतो उकळून गार केलेलेच पाणी प्यावे.
- आहारात जुने धान्य खावे. विशेषत: नवीन तांदूळ टाळावा. त्याने त्रास होऊ शकतो.
- स्वयंपाकाच्या नेहमीच्या फोडणीत या दिवसांत सुंठ वापरता येईल किंवा कधीतरी भाज्यांना तूप-सुंठीची फोडणी द्यावी.
- पिंपळी, पिंपळीमूळ, चित्रक नावाच्या एका उष्ण वनस्पतीची मुळे ही द्रव्ये मसाल्याचे पदार्थ म्हणून वापरतात. त्यांचा स्वयंपाकात उपयोग करावा. सौवर्चल मीठ नावाचे एक प्रकारचे खनिज मीठ असते. तेही या दिवसांत वापरता येते. परंतु ते सहज उपलब्ध होत नसल्यामुळे त्याऐवजी सैंधव मीठ वापरून चालू शकेल.
- आपला परिसर नेहमी कोरडा राहील याकडे लक्ष द्यावे. बुरशी टाळण्यासाठी ते गरजेचे आहेच, परंतु पावसाळ्यात डासांपासून पसरणाऱ्या विषाणूजन्य तापांचा प्रादुर्भाव अधिक असतो. डासांची पैदास होऊ नये यासाठी पावसाचे पाणी साठू न देणे महत्त्वाचे.
- अंगावर घालायचे कपडेही कोरडेच असावेत. आयुर्वेदात याबाबत धुरी दिलेले कपडे घालावेत असा उल्लेख सापडतो.
- या दिवसांत अति व्यायाम नको. अति चालणेही नको.
- आहार तीळ, जवस, कारळे या तेलबियांचा जरूर वापर करावा. त्याची चटणी करून रोजच्या जेवणात समाविष्ट करता येईल.
- ओले खोबरे आहारात असू द्यावे.
- पावसाळ्यात आंबट पदार्थ खावेत. सलग पाऊस लागून राहिलेला असताना ‘आम्ललवण’ भोजन घ्यावे असाही उल्लेख सापडतो. पावसाळ्यात मिळणारी ताजी, आंबट फळे किंचित मीठ लावून खावीत. ताकही जरूर प्यावे.
- या दिवसांत शिळे अन्न नको. कडक उपवासही नकोत.
- हरभऱ्यासारखी द्विदल धान्ये शक्यतो टाळावीत. त्यांनी वात वाढतो.
- मधाचे सेवन करावे. विशेषत: दम्याचा त्रास असलेल्यांना त्याचा चांगला फायदा होऊ शकतो.
- अति श्रम टाळावेत.
वैद्य राहुल सराफ
rahsaraf@gmail.com