आपल्या सर्वाच्या परिचयातील धोत्रा ही एक रानटी वनस्पती आहे. गणेश चतुर्थीला गणपतीला अनेकविध पत्री वाहून स्थापना करण्याचा प्रघात आहे. त्या २१ पत्रीत धोत्र्याच्या पांढऱ्याशुभ्र फुलाला मोठाच मान आहे. धोत्रा ही वनस्पती विष वर्गातील आहे. या वनस्पतीमुळे प्रारंभी मद उत्पन्न होतो, त्यानंतर कैफ येतो. त्यामुळे डोळय़ातील बाहुलीचे विकसन होते. या वर्गातील खुरासनी ओवा, सूची आणि धोत्रा यात एकधर्मी द्रव्य आहेत. तंबाखूतील मदकारी द्रव्य मात्र वेगळे असते.

धोत्र्यात तीन जाती आहेत. पांढरा, निळसर काळा आणि राजधोत्रा. पांढरा आणि काळा धोत्रा सर्वत्र असतो. त्यांचे पंचांग औषधात वापरतात. याशिवाय एक पिवळा धोत्रा नावाची रानटी जात रानोमाळ सर्वत्र आढळते. ती आफ्रिकेतून आली असावी, असे म्हणतात. त्याचा औषधी वा अन्य उपयोग अजिबात नाही. काळा, पांढरा आणि राजधोत्रा ही झाडे बहुतेक सारखी दिसतात, मात्र बाह्य़स्वरूपात थोडा फरक आहे. पांढरा आणि काळा धोत्रा सर्वत्र मोठय़ा प्रमाणावर उगवतो. त्यांचे पंचांग औषधात वापरतात. धोत्र्याच्या पानात खुरासनी ओव्यात असलेले द्रव्य पाच टक्के असते. मात्र धोत्र्याच्या बियांमध्ये हेच द्रव्य मोठय़ा प्रमाणात असते आणि सूची या वनस्पतीतील द्रव्य अल्प प्रमाणात असते. राजधोत्र्याच्या पानात सूचीतील द्रव्य जास्त प्रमाणात असून अजवायनमधील द्रव्य लहान प्रमाणात असते. धोत्र्याच्या बियांची आणि पानांची मात्रा देण्यास कठीण पडते आणि ती लवकर नासतान. त्याकरिता त्यांचा अर्क काढून वापरण्याचा प्रघात आहे.

राजधोत्रा हे क्षुप पिशाच फल म्हणून ओळखले जाते. हे क्षुप हिमालयाच्या मध्यावर, सिक्किम, सिमला, अफगाणिस्तान आणि इराण या प्रदेशात होते. धोत्र्याला श्री चरक संहितेमध्ये ‘कनक’ या नावाने संबोधले आहे. याबद्दलही टीकाकारांमध्ये वाद आहे. मात्र श्री सुश्रुताचार्यानी धोत्र्याचा उपयोग कुत्र्याच्या विषवत दंशावर सांगितला आहे. हरित संहितेत कफवात प्रधान मूळव्याधीसाठी धोत्र्याच्या लेपगोळीचा काळजीपूर्वक वापर करावयाचा सल्ला दिला आहे.

‘गृहधूमं च सिद्धार्थ धुस्तूरकदलानि च’

आयुर्वेदीय विविध औषधांमध्ये नऊ उपविषांचा वापर केला जातो. धोत्रा हे त्यातील एक आहे. आपल्या समाजात दमा या व्याधीने खूप मोठय़ा संख्येने रुग्णमित्र पछाडलेले असतात. दमा हा अतीहट्टी विकार आहे. हट्टी मुलांना गोड बोलून त्यांचे मन नक्कीच वळवता येते. त्याप्रमाणे दम्याकरिता लगेचच धोत्र्यापासून बनवलेल्या कनकासव यांसारख्या औषधाची अजिबात गरज नसते. माझ्या ४८ वर्षांच्या चिकित्साकालात मी एकाही रुग्णाला दम्याकरिता कटाक्षाने कनकासव दिलेले नाही. धोत्र्याच्या अतीवापराने शरीराला उन्माद अवस्था येते आणि डोळय़ावरही खूप वाईट परिणाम होऊ शकतो, हे लक्षात असावे.

त्रिभुवनकीर्ति या तापावरच्या प्रसिद्ध औषधात आणि सुवर्णसूतशेखर मात्रेमध्ये अनुक्रमे धोत्र्याच्या बियांच्या चूर्णाचा आणि धोत्र्याच्या पानांच्या रसाचा भावना देण्यासाठी वापर केला जातो. धोत्र्याच्या बिया आणि पानाच्या अती तीक्ष्ण आणि उष्ण गुणांमुळे शरीरातून खूप घाम बाहेर येऊन तात्काळ ताप उतरण्यास मदत होते. राजनिघंटूकारांनी श्वेत, नील, कृष्ण, रक्त आणि पित्त असे पाच धोत्र्याचे भेद सांगितले आहेत. असे जरी विविध प्रकार असले तरी ज्वरावर आणि हट्टी कफावर मात करण्यासाठी काळय़ा धोत्र्याचीच पाने आणि बिया वापराव्यात. दोन्हींच्या बिया सारख्याच दिसतात.