७ एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन. जगभरच्या लोकांच्या तब्येतीची आमूलाग्र काळजी वाहणारी जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) ही निरपेक्ष संस्था दरवर्षी ७ एप्रिलला सार्वजनिक आरोग्याच्या संदर्भातली एखादी समस्या, एखादा ज्वलंत विषय हातात घेते आणि त्याबद्दल मोठय़ा प्रमाणात जनजागृती करते. या वर्षी त्यांनी मधुमेहावर आपलं लक्ष केंद्रित केलं आहे. या घडीला मधुमेहाची समस्या इतक्या भीषण पातळीवर पोहोचली आहे की संघटना त्या विषयाकडे वळली नसती तरच आश्चर्य वाटायला हवे.
मधुमेह हा तसा लांब पल्ल्याचा आजार. त्यामुळे तो झाला की बराच काळ, कदाचित आयुष्यभरदेखील, तुम्हाला इलाज करून घ्यावा लागतो. वेळोवेळी कराव्या लागणाऱ्या रक्त तपासण्या, उपचार, त्यातून कुठले इंद्रिय त्याच्या विळख्यात सापडले की त्यासाठी होणारा खर्च या सगळ्याचा हिशेब मांडला तर कित्येक देशांची अर्थव्यवस्था ढासळेल की काय अशी परिस्थिती आहे. शिवाय अपघात सोडले तर सगळ्यात जास्त पाय कापले जातात ते मधुमेहात, डोळे खराब होतात ते याच आजारात. आपल्या देशात याहून गंभीर समस्या आहे. आपल्याला मधुमेह कमी वयात होतो आणि त्यापासून हृदयरोगही ऐन तरुणपणात होतो. ज्याने कमावून कुटुंबाला सांभाळावे तीच व्यक्ती निघून गेली की काय होणार हे वेगळं सांगायला नकोच. एकंदरीत संख्येचा विचार केल्यास आपली छाती दडपून जाईल, अशी भीती वाटते.
ही झाली नकारात्मक बाजू. परंतु एका अत्यंत महत्त्वाच्या बाबीकडे आपलं दुर्लक्ष होतं. हा एक आजार असा आहे की जो टाळताही येऊ शकतो आणि जर त्यावर सुरुवातीलाच नीट नियंत्रण मिळवलं तर तुमचं आयुष्य पुढची कित्येक वर्षे विनासायास, मधुमेहामुळे निर्माण होणाऱ्या कुठल्याही प्रश्नाशिवाय जाऊ शकते. म्हणजेच या आजारात जितके आव्हान आहे, तितकीच संधीही आहे.
केवळ तुम्हाला बरं वाटावे म्हणून असे म्हटलेले नाही. त्यासाठी सज्जड पुरावा उपलब्ध आहे. इंग्लंडच्या काही डॉक्टरांनी केलेल्या एका अभ्यासात ही गोष्ट अधोरेखित झाली की जर तुम्ही मधुमेहाचे निदान झाल्यावर सुरुवातीच्या काळात, त्यावर चोख नियंत्रण ठेवले, पण पुढच्या काही वर्षांत नियंत्रण सैल झाले, तुमची शुगर वाढली तरी मधुमेहामुळे होणारी कॉमप्लिकेशन्स तुम्हाला होत नाहीत. आम्हा डॉक्टर मंडळींना युकेपीडीएस नावाने प्रसिद्ध असलेला हा अभ्यास नेहमीच मैलाचा दगड वाटत आला आहे यावरून काय ते समजावे. वेगळ्या शब्दात सांगायचे म्हणजे तुम्ही तुमची शुगर संभाळलीत तर मधुमेह तुम्हाला काहीच त्रास देणार नाही. झाली की नाही संधी.
यात एक छुपा संदेश आहे. तुम्ही शुगर सांभाळली नाही तर मात्र मोठा धोका आहे. तुमचा खर्च खूप वाढण्याची भीती आहे. कारण अनेक अभ्यासांनी हेदेखील सिद्ध झालेले आहे की एकदा मधुमेहाचे प्रश्न सुरू झाले मग तुमचा खिसा अनेक पटींनी रिकामा व्हायला लागतो. एकप्रकारे तुमचा पुढचा मोठा खर्च वाचवायला तुम्ही सुरुवातीला थोडी काळजी घेतली पाहिजे.
दुर्दैवानं इथंच घोडे पेंड खाते. मधुमेहात दुखत खुपत नाही. त्यामुळं कुणीही डॉक्टरकडे धावत नाही. अनेकदा लक्षणं दिसूनही त्याकडे काणाडोळा करण्याकडे बहुतेकांचा कल असतो. असे करू नका. मुळात वारंवार लघवी होणे, तहान लागणे, व्यवस्थित जेवत असूनही वजन कमी होणे, थकवा जाणवणे अशी मधुमेहाची लक्षणे दिसेपर्यंत थांबू नका. तुमच्या पालकांना मधुमेह असेल तर अगदी विशी-तिशीत रक्त तपासून घ्या. मधुमेह होणार असल्याची सगळ्यात पहिली खूण म्हणजे जेवणानंतरची शुगर १२६ ते १४० दरम्यान येणे. याचा अर्थ तुम्ही मधुमेहाच्या उंबरठय़ावर आहात. त्वरित जीवनशैलीत बदल केला तर शुगर पटकन आटोक्यात येईल.
प्रसंगी औषधांची कास धरावी लागली तरी चालेल, पण शुगर १०० च्या आत राखण्याचा प्रयत्न करा. तपासणीत शुगर नॉर्मल निघाली तरी पालकांकडून ‘विरासत’ म्हणून मधुमेह मिळू नये यासाठी जीवनशैली बदलायला काहीच हरकत नाही. मधुमेह न होणे हीच सगळ्यात चांगली गोष्ट आहे. याला प्रायमरी प्रिव्हेन्शन म्हणायचे.
मधुमेहाचं निदान झाल्यावर अनेकजण निराशेच्या गर्तेत जातात. पण हे सत्य नाही मधुमेह म्हणजे आयुष्याचा शेवट नव्हे, त्यानंतरही खूप चांगलं आयुष्य तुमच्या पुढे वाढून ठेवलेले आहे. हेच तुम्हाला कळावे म्हणूनच कदाचित जागतिक आरोग्य संघटनेने या वर्षी मधुमेहाविषयी जागृती करण्याचा घाट घातला असावा.

नियंत्रण शक्य
समजा दुर्दैवानं शुगर आली तरी खट्ट होण्याचं कारण नाही. आता मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्यंत प्रभावी औषधे उपलब्ध आहेत. त्यासाठी डॉक्टरना भेटा. उगीच कुणीतरी सांगितलं म्हणून पावडरी अथवा चूर्ण घेत बसू नका. सुरुवातीला शुगर नियंत्रणात आणणे महत्त्वाचे असल्याने जे उपचार सिद्ध झाले आहेत, तेच वापरा. सांगोवांगीवर विसंबून राहू नका. सुरुवातीला इंश्युलीन वापरल्याने पुढे काही काळ औषधाशिवाय राहता येते यावर हल्लीच शिक्कामोर्तब झालं आहे. सांगायचा मुद्दा हा की मधुमेहाच्या निदानानंतर वेळ वाया न दवडता तुम्ही जे उपचार करून घ्याल त्याने तुमचा खूप मोठा फायदा होईल. कोणी दुष्परिणामांचा बागुलबुवा उभा करत असेल तर त्याला भीक घालू नका. मधुमेहावरची औषधे अगदी सुरक्षित आहेत. त्यांनी मूत्रपिंड वगैरे निकामी होत नाही. अमुक औषधाने मधुमेह पूर्ण बरा होतो, त्यानंतर तुम्ही साखरही खाऊ शकता असे कुणी म्हणत असेल तर तो खोटे बोलतोय हे लक्षात घ्या. मधुमेहावर नियंत्रण राखता येते, पण तो नाहीसा करता येत नाही. तुम्ही तपासणी करण्यात, वेळेवर औषधे घेण्यात, एखादे लक्षण दिसलेच तर त्याचं निराकरण करून घेण्यात, दिरंगाई केली नाही तर अगदी नॉर्मल माणसाइतके आयुष्य तुम्ही जगू शकता, तेही कुठल्याही प्रश्नाशिवाय.

– डॉ. सतीश नाईक

Story img Loader