डॉ. अभिजित जोशी, अस्थिरोगतज्ज्ञ
आणखी वाचा
मधुमेही व्यक्तींच्या पावलांना जखम होऊ नये म्हणून जपावे लागते. रोज काही साध्या गोष्टी पाळल्यास मधुमेहींना पाय जखमविरहित आणि निरोगी ठेवण्यासाठी मदत होऊ शकेल. पावलांना जखम असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य, परंतु जखम वा संसर्ग नसताना पावलांची काळजी घेण्यासाठीच्या या टिप्स उपयुक्त ठरतील.
- रात्री झोपण्यापूर्वी हातात छोटय़ा आकाराचा स्वच्छ आरसा घेऊन दोन्ही पावले नीट तपासा. कुठे जखम झालेली किंवा कापलेले नाही ना, पावलांच्या त्वचेला कुठे लालसर रंग आलेला नाही ना, ते पाहा. जखम वा कापलेले आढळले तर पाय धुऊ नका. लगेच तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
- पावलांना जखम नसेल तर बाथरूममध्ये छोटय़ा स्टुलावर बसून एखादा सौम्य साबण व पाण्याने पाय हळुवार धुवा.
- एक बादली साध्या पाण्याने अर्धी भरा. बादलीत पाय बुडवल्यानंतर घोटय़ांच्या वर आणि गुडघ्याच्या खाली पाणी येईल, एवढी बादली भरलेली हवी. गरम पाणी वापरू नका. पाण्यात ३ ते ४ टोपणे भरून ‘डेटॉल’सारखे जंतुनाशक द्रावण घाला, किंवा पाण्याला हलका गुलाबी रंग येईल इतके ‘पोटॅशियम परमँगनेट’ घाला. पोटॅशियम परमँगनेट घातल्यास पाण्याचा रंग गडद गुलाबी नको. जंतुनाशक किंवा पोटॅशियम परमँगनेट काहीच नसेल तर साधे पाणी वापरा. या पाण्यात ३-४ मिनिटे पाय बुडवून बसा. तीन-चार मिनिटे झाल्यावर पाय बाहेर घेऊन अधिकचे पाणी तिथल्या तिथे हळूच झटकून टाका. पाय टॉवेलने पुसू नका.
- पावले तशीच थोडी कोरडी झाली की त्यावर खोबरेल तेल वा एखादे चांगल्या प्रतीचे किंवा तुमच्या डॉक्टरांनी सुचवलेले ‘मॉईश्चरायझर’ लावा. हलक्या हाताने पावलांना मसाज करत मॉईश्चरायझर लावलेले चांगले. त्यानंतर केवळ पायाच्या बोटांच्या मधला व खालचा भाग हलक्या हाताने टिपून घेण्यास हरकत नाही. पायांच्या बोटांच्या बेचक्यात थोडी बुरशीनाशक (अँटी फंगल) पावडर लावा.
- यानंतर कॉटनचे मोजे घालून झोपा.
- ही प्रक्रिया आठवडय़ात पाच वेळा केली तर पावलांना होणारी जखम टाळण्यासाठी त्याची निश्चित मदत होईल.
- त्वचेला चटका बसल्याचे समजणे मधुमेहात कमी होऊ शकते. त्यामुळे मधुमेहींनी गरम होणारी ‘इलेक्ट्रिक पॅडस्’ किंवा गरम पाण्याच्या पिशव्यांनी पावलांना शेकणे टाळावे. अनवाणी पायांनी फिरू नये. मऊ आणि आतून ‘मायक्रो सेल्युलर रबर’चे (एमसीआर) सोल असलेली पादत्राणे वापरलेली चांगली.