डेंग्यूचा ताप सध्या राज्यभरात ठिकठिकाणी नागरिकांना चांगलाच ‘ताप’ देतो आहे. हा ताप आल्यावर एकीकडे शरीरातील पाणी कमी होतेच, शिवाय ताप उतरताना रक्तातील ‘प्लेटलेट’देखील कमी होतात, अशक्तपणाही जाणवतो. डेंग्यूवर वैद्यकीय उपचार घेणे गरजेचेच, पण त्यातून बरे होताना ‘डीहायड्रेशन’ टाळणारा, पचायला हलका आणि पोषक आहार घेतल्यास लवकर आराम पडण्यास नक्कीच मदत होईल.
डेंग्यूच्या तापाची सुरुवात पाण्यापासून होते आणि तापात बचावही एक प्रकारे पाणीच करते.. वाचून आश्चर्य वाटले ना? डेंग्यू हा काही जलजन्य आजार नाही, पण स्वच्छ पाण्यातच त्याचे वाहक असलेले डास वाढत असल्यामुळे साठलेल्या पाण्यापासून त्याची सुरुवात होते असे म्हणता येईल. शिवाय पुढे तापात शरीरातील पाणी कमी होऊन ‘डीहायड्रेशन’चा जो त्रास संभवतो त्यापासून दूर राहणे गरजेचे ठरते. शरीरातील पाणी कमी होऊ नये यासाठी रुग्णाने अधिक पाणी पिणे किंवा जास्तीत जास्त पातळ पदार्थ घ्यायला हवेत. कारण पाण्याबरोबर शरीराला पोषण मिळणेही आवश्यक असते.
- घटणारे प्लेटलेटस् नैसर्गिकरित्या वाढण्यास मदत व्हावी आणि रोगप्रतिकारशक्तीही वाढावी यासाठी मदत करणारा आहार या काळात सुचवला जातो. अन्न पचायला हलके तर हवेच, पण त्याच वेळी पोषक प्रथिनेही महत्त्वाची. प्रथिने ही खरे तर पचायला जड असतात. मग डेंग्यूतून बरे होताना त्याचा कसा उपयोग करता येईल, असा प्रश्न पडणे साहजिक आहे. पण त्यासाठीही काही पर्याय आहेत. दलिया, मूगडाळ व भाज्या घातलेला मसालेदार नसलेली खिचडी, डाळ-तांदळाची पातळसर खिचडी, डाळींचे पाणी, चिकन क्लिअर सूप, घरी केलेले गाईच्या दुधाचे ताजे पनीर आणि मटारची फिकी ग्रेव्हीसारखी भाजी या गोष्टींमधून चांगली प्रथिने आणि हलका आहार या दोन्हीचीही गरज पूर्ण होऊ शकते.
- पातळसर पदार्थामध्ये तांदळाची पेज किंवा नाचणीची पेज, टोमॅटोचे सार किंवा सूप, मूगडाळ आणि पालकाची पातळ भाजी, अळूची पातळ भाजी, अळूचे वरण किंवा विविध भाज्यांची डाळी घालून केलेली पातळसर सूप देता येतील. गाजर, बीट व पालकाचे सूपही चांगले. त्यातून अँटीऑक्सिडंटस् आणि ‘के’ जीवनसत्त्व देखील मिळते.
- खरे तर सर्व प्रकारच्या भाज्या आहारात घेण्यास हरकत नसावी, पण त्या मसालेदार मात्र नसाव्यात. अर्थात एखाद्याला एखाद्या विशिष्ट पदार्थाची अॅलर्जी असेल तर त्या दृष्टीने काळजी घ्यायला हवी.
- ‘डीहायड्रेशन’ टाळण्यासाठी नारळाचे पाणी हा एक चांगला उपाय आहे. त्यातून इलेक्ट्रोलाइटस् मिळतात. दिवसभरात मधूनमधून २ ते ३ ग्लास नारळपाणी पिता येईल. कोणत्याही तापातून बरे होताना फळे चांगलीच. पण नुसते फळ खाण्यापेक्षा घरी काढलेला ताज्या फळांचा रस घेण्यास प्राधान्य द्यावे. डाळिंब, सफरचंद अशा फळांचा रस दिवसांत दोन वेळा नक्कीच घेता येईल. उसाचा रसही चालू शकतो, पण त्याच्या स्वच्छतेची खात्री असायला हवी.
- रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी ‘क’ जीवनसत्त्व मदत करते. ताजा आवळा किंवा मोरावळ्यातून ते चांगले मिळते. मोरावळ्यात गूळ किंवा साखरही असल्यामुळे थोडासा मोरावळाही उष्मांक आणि ऊर्जा देणारा ठरतो. आवळा, लिंबू वा कोकमाचे घरगुती सरबतही चांगले.
- कलिंगड, टरबूज, स्ट्रॉबेरी, चेरी अशी फळेही उत्तम. पपईत ‘अ’ जीवनसत्त्व आणि ‘पेपेन’ हा घटक असतो. तो पचनाला चालना देतो. त्यामुळे काही प्रमाणात पपईही खाता येईल.
- पपईच्या कोवळी व ताज्या पानांचा रस काढता येतो आणि इतर आहाराबरोबर प्लेटलेटची संख्या वाढवण्यासाठी तो मदत करतो. पपईच्या पानांचा एक ग्लास रस काढून तो दिवसभरात १-१ चमचा प्यायला तरी चालतो. हा रस सर्वसाधारणपणे सर्वाना चालतो, परंतु तरीही प्रत्येकाची प्रकृती वेगवेगळी असल्यामुळे त्याबद्दल आपल्या आहारतज्ज्ञांशी जरूर बोलून घ्यावे.
- अनेक रुग्णांना काहीतरी गोड खावेसे वाटते. त्यांना रव्याची खीर, दूध-गूळ घातलेली दलियाची खीर, घरच्या पनीरचा रसगुल्ला, फळांचे कस्टर्ड थोडे- थोडे देता येईल. खिरींमध्ये काळा खजूर घालता येईल. तसेच खजूर आणि बदाम, काजू असा सुकामेवा एकत्र करून मधल्या वेळी त्याची एखादी वडी तोंडात टाकता येईल.
- बिस्किटे व मैद्यापासून बनवलेले बेकरीचे पदार्थ, ‘कॅफिन’ असलेल्या चहा-कॉफीसारख्या पेयांचे अतिसेवन, फास्ट फूड व जंक फूड मात्र या काळात टाळावे.
– कांचन पटवर्धन, आहारतज्ज्ञ.