डॉ. वैशाली जोशी, आहारतज्ज्ञ

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करून पाहतात. यात सर्वप्रथम आहारात बदल केले जातात. झटपट वजन उतरवणारा कुठला तरी ‘डाएट’ दर काही दिवसांनी लोकप्रिय होतो. पण यातील बहुतांश ‘डाएट’ ही ‘फॅड डाएट’ असतात. केवळ ठरावीक पदार्थच खाऊन राहणे, जेवणाऐवजी कॉफी पिऊन राहणे, स्निग्ध पदार्थ पूर्ण बंद करणे किंवा आहारात प्रथिने खूप वाढवणे अशा कितीतरी गोष्टी स्वत:च्या मनाने आणि इंटरनेटचा आधाराने केल्या जातात. त्याने अनेकदा तेवढय़ापुरते वजन कमी होतेही. पण शरीरासाठी ही ‘फॅड डाएट’ बरी नाहीत.

कीटो डाएट

व्यायामशाळेत जाणाऱ्यांमध्ये ‘कीटो’ आहार लोकप्रिय आहे. यात खूप प्रमाणात चरबी व प्रथिने खायला सांगतात. चरबीत क्रीम, चीज, लोणी, तर प्रथिनांसाठी मांसाहार, नटस् (सुकामेवा) खाल्ला जातो. पिष्टमय धान्ये, साखर खाल्ली जात नाही. भाज्या व फळेही अगदीच अत्यल्प प्रमाणात घेतात. फार काळ असा आहार घेणे योग्य नाही. पहिले काही दिवस व्यक्तीला त्यामुळे काही झाले नाही, तरी नंतर वजन मोठय़ा प्रमाणावर वाढू शकते. मधुमेही व्यक्तींनी असा आहार टाळावा. मधुमेह्य़ांना त्यामुळे ‘कीटो अ‍ॅसिडोसिस’ होऊ शकतो आणि ते हानीकारक ठरू शकते.

बुलेट फ्री कॉफी

वजन कमी करण्यासाठी ‘बुलेट फ्री कॉफी’ पिणे हे सध्या प्रचंड लोकप्रिय होत आहे. यात एक किंवा दोन वेळच्या पूर्ण आहाराऐवजी कॉफी पितात. ही कॉफी वेगळ्या प्रकारे बनवतात. मीठ न घातलेले पांढरे लोणी किंवा ‘ग्रास स्प्रेड’ (लोण्याचाच एक प्रकार) अथवा नारळाचे तेल घालून ही कॉफी करतात. या कॉफीनेच ऊर्जा मिळते असे या लोकांचे म्हणणे असते. कॉफी, लोणी किंवा नारळाचे तेल हे पदार्थ वाईट नाहीत. योग्य प्रमाणात खाल्ले तर ते चांगले. पण जेवणाऐवजी कॉफी पीत राहणे योग्य नाही. त्यामुळे जीवनसत्त्वे, खनिजे व इतर पोषणमूल्यांची कमतरता राहते. लोणी व खोबरेल तेल हे दोन्ही संपृक्त चरबीचे प्रकार आहेत. त्यामुळे ते प्रमाणाबाहेर घेतल्यास त्यामुळे कोलेस्टेरॉल वाढू शकते. या कॉफीतून प्रथिने अत्यल्प मिळतात, तर तंतुमय पदार्थ मिळतच नाहीत. त्यामुळे क्वचित कधीतरी अशा प्रकारची कॉफी पिणे वेगळे, रोजच्या जेवणाऐवजी मात्र असा प्रयोग न केलेलाच बरा.

ज्यूस व ब्रॉथ डाएट

यात दिवसभर ज्यूस आणि चिकन वा भाज्या उकळलेले पाणी घेतले जाते. पण त्याव्यतिरिक्त उपास घडल्याने चक्कर येणे, पोषणमूल्यांची कमतरता राहणे, अशक्तपणा येणे अशा गोष्टी होऊ शकतात. उपाशी राहिल्यामुळे चयापचयाचा दर कमी होऊ शकतो.

कॅबेज डाएट

या ‘डाएट’मध्ये सात दिवस दिवसातून ३ ते ४ वेळा कोबीचे सूप पितात आणि त्याबरोबरीने केळं, ‘बेक’ केलेला बटाटा किंवा ‘स्किम मिल्क’ यांपैकी काही घेतले जाते. यात आहारात उष्मांक कमी जातात, तंतुमय पदार्थ व पाणी मिळते पण प्रथिने अजिबात मिळत नाहीत. शरीरातील स्नायूंना बळकटी मिळण्यासाठी प्रथिने गरजेची असून ती आहाराचा भाग असायलाच हवीत. शिवाय कोबीमुळे काही जणांना पोटात वायू धरणे किंवा पोट बिघडण्यासारखा त्रास होऊ शकतो. सात दिवसांत जे वजन घटते ते शरीरातील पाणी व स्नायूंचे प्रमाण कमी झाल्यामुळे घटते ही यातली महत्त्वाची गोष्ट. त्यामुळे जेव्हा नेहमीसारखा आहार सुरू केला जातो तेव्हा वजन पुन्हा वाढते.

कोणतेही ‘फॅड डाएट’ फार दिवस करणे शक्य नसते. अल्पावधीतच तेच-तेच खाऊन कंटाळा येतो आणि संकल्प मोडतो. अर्थात फार काळ ‘फॅड डाएट’ करणे योग्य नाहीच.

  • अशा प्रकारच्या आहाराने कमी झालेले वजन कमी राहत नाही. पुन्हा वाढते.
  • ‘फॅड डाएट’मध्ये अनेक आवश्यक पोषणमूल्ये शरीराला मिळत नाहीत.
  • अनेकांना खूप अशक्तपणा येतो. त्वचेचा तजेला जातो, शरीरातून पाणी जात असल्याने चक्कर येऊ शकते.
  • खूप प्रथिने असलेला आहार घेतल्याने काहींना मूतखडा होऊ शकतो. ‘युरिक अ‍ॅसिड’देखील वाढू शकते.
  • मधुमेही व्यक्ती फार काळ उपाशी राहिल्या किंवा पिष्टमय पदार्थ खूप कमी केले तर ‘डायबेटिक कीटो अ‍ॅसिडोसिस’चा त्रास होऊ शकतो.

आइस्क्रीम डाएट

हे देखील एक विचित्र, पण आकर्षक वाटणारे ‘डाएट’ आहे. दिवसभर कमी उष्मांक असलेला आहार घ्यायचा आणि दिवसाला एक स्कूप भरून आइस्क्रीम खायचे असा आहार यात लोक घेतात. कमी उष्मांकाच्या आहारात प्रामुख्याने फळे व भाज्या घेतल्या जातात. यामुळे वजन कमी झाले तरी ते फसवे आहे. नेहमीचा आहार सुरू केल्यानंतर यातही वजन पुन्हा पूर्वीसारखे होणार आहे. आइस्क्रीमने वजन उतरले असे म्हणणे तर चुकीचेच.

ग्रीन टी’, ‘ग्रीन कॉफी’, ‘अ‍ॅपल सायडर व्हिनेगर

‘ग्रीन टी’ व ‘ग्रीन कॉफी’ या गोष्टींची हल्ली वजन कमी करण्याबाबत मोठी चर्चा आहे, तसेच अनेक जण वजन कमी करण्यासाठी रोज सकाळी पाण्यातून थोडे ‘अ‍ॅपल सायडर व्हिनेगर’ घेतात. पण या सर्व गोष्टींच्या बरोबरीने कमी उष्मांक असलेला आहार घेण्याकडे कल असतो आणि वजन उतरण्यासाठी कमी उष्मांक मिळणे हे कारणीभूत ठरते. आहार नेहमीसारखा सुरू केल्यावर वजन वाढतेच.

ग्रीन टी’, ‘ग्रीन कॉफी’, ‘अ‍ॅपल सायडर व्हिनेगर

‘ग्रीन टी’ व ‘ग्रीन कॉफी’ या गोष्टींची हल्ली वजन कमी करण्याबाबत मोठी चर्चा आहे, तसेच अनेक जण वजन कमी करण्यासाठी रोज सकाळी पाण्यातून थोडे ‘अ‍ॅपल सायडर व्हिनेगर’ घेतात. पण या सर्व गोष्टींच्या बरोबरीने कमी उष्मांक असलेला आहार घेण्याकडे कल असतो आणि वजन उतरण्यासाठी कमी उष्मांक मिळणे हे कारणीभूत ठरते. आहार नेहमीसारखा सुरू केल्यावर वजन वाढतेच.

ग्रेप फ्रूट डाएट

हे ‘डाएट’ सध्या लोक मोठय़ा प्रमाणावर करतात. ‘ग्रेप फ्रूट’ म्हणजे पपनस. यात संपूर्ण दिवस केवळ पपनस खाल्ला जातो. पपनस खरे तर आरोग्यासाठी चांगला. त्यात जीवनसत्त्वांचे- विशेषत: ‘क’ जीवनसत्त्वाचे प्रमाण चांगले असते आणि उष्मांक कमी असतात. पण म्हणून पपनसामुळे वजन उतरते असे म्हणणे योग्य ठरणार नाही. केवळ पपनस खाताना इतर कोणताही अन्नपदार्थ पोटात जात नसतो आणि उष्मांक खूप कमी मिळाल्याने वजन कमी होते. या डाएटमध्ये कबरेदके, प्रथिने आणि बाकीची पोषणमूल्ये अजिबात मिळत नसून ते योग्य नव्हे, हे लक्षात घ्यायला हवे.

या व्यतिरिक्त ठरावीक दिवशी ठरावीक पदार्थच खायचे अशी ‘डाएट’ अनेक जण पाळतात. पण कोणताही आवश्यक अन्नघटक आहारातून हद्दपार करणे योग्य नाही हे नेहमी लक्षात ठेवायला हवे. सर्व पोषणमूल्ये आहारातून मिळणे आणि चांगल्या आहाराबरोबर योग्य व्यायामाचीही जोड मिळणे हाच वजन कमी करण्यासाठीचा चांगला मार्ग आहे.

मराठीतील सर्व लोकआरोग्य बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diet issue fad diet dietitian advice