सुंठ, आवळा व खडीसाखर यांचे समप्रमाणात एकत्र चूर्ण एक चमचा सकाळ-संध्याकाळ नुसते खावे किंवा कोमट दुधाबरोबर घ्यावे. घशाशी जळजळणे, तोंड आंबट-कडू होणे, आंबट उलटी होणे अशा आम्लपित्ताच्या सर्व तक्रारींवर खूप उपयोगी आहे.
सुंठीची पावडर तुपावर भाजावी आणि खडीसाखरेच्या पाकातून रोज सकाळी घ्यावी. धातू (शुक्र)पुष्टी होण्यासाठी किंवा स्त्रियांच्या श्वेत प्रदरावर (अंगावर पांढरे जाणे) यामध्ये या सुंठीपाकावर कोमट दूध प्यावे.
सुंठ व वेखंडाचे वस्त्रगाळ चूर्ण जाळीदार फडक्यात पुरचुंडी करून वारंवार हुंगावे. अर्धशिशी, सर्दीची डोकेदुखी, डोके जड होऊन चक्कर येणे यामध्ये खूप फायदा होतो.
सुंठीची पावडर एरंडेल तेलात किंचित लालसर होईपर्यंत खरपूस भाजावी. पाव ते अर्धा चमचा दोन्ही जेवणानंतर कोमट पाण्यातून घ्यावी. आमवात, संधिवात, गृध्रसी (सायटिका), पक्षाघात, हर्निया यांसारख्या वातव्याधीत व स्त्रियांच्या कंबर-पाठदुखीत खूपच उपयोग होतो.
संडासला साफ होण्यासाठी रात्री झोपताना सुंठीच्या कोमट पाण्यातून एक चमचा एरंडेल विशेषत: वृद्धांनी रोज घ्यावे.