सातवीमध्ये शिकणारा राजेश फटाके उडवताना भाजला आणि दिवाळीच्या संध्यकाळी रुग्णालयात आला. नेहमी भाजल्यावर करतात तीच चूक राजेशच्या आई-वडिलांनी केली होती. घरात असणारी शाई त्यांनी भाजलेल्या त्वचेवर टाकली होती. रडत, कण्हत आलेल्या राजेशला आधी ड्रेसिंग रूममध्ये पाठवून आई-वडिलांना याविषयी समजावून सांगणे गरजेचे होते. ‘‘बघा, लक्षात ठेवा की, भाजलेल्या त्वचेवर कधीच कुठलीही गोष्ट टाकायची नाही. शाई, टूथपेस्टपासून घरातील अनेक गोष्टी यासाठी लोक वापरतात. पण त्यामुळे भाजलेल्या जागी होणारी जखम जास्त चिघळते. त्याऐवजी फक्त नळाचे पाणी हे भाजलेल्या जागेसाठी घरात प्रथमोपचार म्हणून चांगले असते. वाहत्या पाण्याखाली दोन-तीन मिनिटे भाजलेली जागा धरून त्या नंतर थेट डॉक्टरकडे धाव घ्यावी.’’ राजेशच्या आईला चूक लक्षत आली म्हणून त्यावर तिला फार बोलण्यात अर्थ नव्हता. ‘‘फार तर तुम्ही प्रथमोपचार म्हणून सिल्वर सल्फाडायाझिन हे क्रीम नेहमी घरात ठेवू शकता. भाजल्यावर जखम पाण्याखाली धुऊन लगेच हात स्वच्छ करून त्याने हे क्रीम घरीच भाजलेल्या जागेवर लावू शकता.’’
माझे बोलणे होईपर्यंत राजेशची पट्टी सुरू झाली होती. हात पुढून मागून भाजल्याने भाजलेला भाग तसा मोठा होता. मी आई-वडिलांना समजावून सांगितले, ‘‘राजेशला आपण दोन-तीन दिवस रुग्णालयात दाखल केले तर खूप बरे होईल. कारण भाजलेला भाग जरा जास्त आहे.’’
आई-वडील लगेच तयार झाले, ‘‘पण डॉक्टर अॅडमिट करायचे म्हणजे काही काळजी करण्यासारखे आहे का?’’
‘‘बघा, भाजल्यावर मुख्यत: दोन गोष्टींची चिंता असते. पहिली गोष्ट म्हणजे जखमेला जंतुसंसर्ग होण्याचा आणि दुसरा म्हणजे रक्तदाब कमी होण्याचा धोका. रुग्णालयात दाखल केल्याने सलाइन व व्हेनमधून प्रतिजैविके म्हणजे अँटिबायोटिक देता येतील. शिवाय रुग्णालयात रक्तदाबावर लक्षही ठेवता येईल.’’
‘‘चालेल डॉक्टर, तुम्ही राजेशला अॅडमिट करा, पण आम्ही काय काळजी घ्यावी?’’ आईने विचारले.
‘‘सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे भेटायला येणाऱ्या नातेवाईकांना कोणालाही राजेशच्या रूममध्ये येऊ देऊ नका. माझा असा अनुभव आहे की, भाजलेल्या रुग्णाला जंतुसंसर्गाचा सगळ्यात मोठा धोका हा भेटायला येणाऱ्यांकडून असतो. तुम्ही निवडक लोकच राजेशच्या रूम मध्ये येत जा. कारण भाजलेल्या रुग्णाला निर्जंतुक केलेल्या रूममध्येच ठेवावे लागते. जे राजेशच्या रूममध्ये येतील, त्यांनी आल्यावर हात धुवावे, तसेच घरी गेल्यावरही जखम बरी होईपर्यंत राजेशजवळ कोणाला येऊ देऊ नका. त्याची खोली रोज फिनेल टाकलेल्या पाण्याने पुसून घ्यावी.’’
‘‘डॉक्टर राजेशला आहार काय द्यावा? भाजलेल्या रुग्णाला जखम बरी होण्यासाठी वाढीव प्रोटीन्स म्हणजे प्रथिने आवश्यक असतात. जर तुम्ही अंडी खात असाल तर रोज एक ते दोन अंडी द्यायला हरकत नाही, जर खात नसाल तर मोड आलेली कडधान्ये, सोयाबीन, राजमा, पनीर, भिजवलेल्या डाळी, ताक, दही असे अन्न रोज द्यायला हरकत नाही.’’
ड्रेसिंग करत असताना राजेशला बराच त्रास होत होता. त्यामुळे घरच्यांना अजून काळजी वाटणे सहाजिक होते. ‘‘डॉक्टर ड्रेसिंग कधीपर्यंत आवश्यक आहे?’’
‘‘पहिले चार ते पाच दिवस रोज आणि नंतर एक दिवसाआड असे १५ ते २० दिवस तरी ड्रेसिंग आवश्यक आहे.’’
राजेशच्या काकांना ही एक काळजी वाटत होती. ‘‘डॉक्टर बऱ्याचदा आम्ही बघतो, भाजल्यानंतर त्वचा काळी पडते किंवा भाजलेल्या भागातील अंग एकमेकांना चिटकतात.’’
‘‘ही त्वचा पूर्ववत होण्यासाठी नंतर काही दिवस त्याला साधे तेल लावले तरी फरक पडतो आणि नवीन त्वचा आल्यानंतर हा काळसरपणा कमी होतो. अंग चिटकण्याचे प्रमाण हे सांध्यांच्या जागी जास्त असते. त्यासाठी आपण उद्यापासून रोज भाजलेल्या भागातील सांध्यांचे व्यायाम सुरू करणार आहोत.’’
डॉ. अमोल अन्नदाते amolannadate@yahoo.co.in