बाहेर रिमझिम पावसाच्या सरी बरसत असताना घराच्या खिडकीत आरामात बसून आल्याचा गरमागरम चहा पिण्याची कल्पनाच न्यारी! राज्याच्या सर्व भागांत पावसाळ्याचा ‘फील’ देणारा पाऊस सुरू झालेला नाही, परंतु अधूनमधून दाटून येणारे ढगाळ वातावरण आणि रात्री जाणवणारा गारवा मात्र जवळपास सगळीकडे आहे. हवामान बदलामुळे होणारा सर्दी-खोकला, तापाची कणकण या तक्रारी अशा वातावरणात हटकून दिसतात. या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी घशाला चांगला शेक देणारी गरम पेये केव्हाही उत्तम.
पावसाळी वातावरणात गरम पेये घशाला सुखावतात आणि शरीरात ऊबही निर्माण करतात. रोजच्या चहा आणि कॉफीच्या पलीकडे जाऊन इतरही नानाविध गरम पेये आपण घरच्या घरी करू शकतो. यातील काही पेये तर अनेक घरांमध्ये अगदी आजी-पणजीच्या काळापासून केली जात असतील. पावसाळ्याच्या निमित्ताने अशीच काही पूर्वीपासून केली जाणारी पेये आठवूया आणि त्यात काही नवीन पेयांचीही भर घालूया.
चहा पावडर न वापरलेला ‘हर्बल चहा’!
चहा पावडर न वापरलेला चहा.. नावच गमतीदार आहे! चहासारखे गरमागरम प्यायचे पेय म्हणून याला खरे तर काढाही म्हणता येईल. पण काढा म्हटले की अनेक जण नाक मुरडतात. हा ‘हर्बल चहा’ मात्र नाक मुरडण्यासारखा नाही. सध्याच्या पावसाळी वातावरणात आपली रोगप्रतिकारशक्ती थोडी कमी झालेली असते. त्यात सर्दी, खोकला, कफ, ताप, पोटाचे विकार, गॅसेस यांसारख्या आजारांना दूर ठेवण्यासाठी हे पेय चांगले.
‘हर्बल चहा’साठी १ ग्लास पाण्यात गवती चहाची एक कांडी, आल्याचा छोटा तुकडा, वेलदोडा, जायफळ आणि काळी मिरी यांची प्रत्येकी चिमूटभर पूड, प्रत्येकी अर्धा-अर्धा चमचा बडीशेप व ओवा आणि पुदिन्याची ५ ते ६ पाने घालून उकळवावे आणि गाळून गरमच प्यावे. या साहित्यात एक मोठा कप ‘हर्बल चहा’ तयार होईल. याचा वास आणि चव चांगली लागते. आवडत असेल तर हा चहा पिताना त्यात हलकेसे काळे मीठ घालून लिंबूही पिळता येईल. मधुमेह नसेल तर गोडीसाठी त्यात मधही घालून घेता येईल, तर मधुमेही व्यक्ती स्टिव्हिया वनस्पतीपासून बनवलेली कृत्रिम साखर या चहात घालू शकतील. बडीशेप व ओव्यामुळे पोटात पाचक द्रव्यांचे स्त्रवण होण्यास मदत होते आणि अपचनाच्या तक्रारी टाळण्यासाठी त्याचा फायदा होतो.
सूप
सूप पातळ असो किंवा थोडे दाटसर. पावसाळ्यात गरमागरम सूप म्हणजे उत्तम ‘कम्फर्ट फूड’! या दिवसांत नेहमीच्या ‘सूप्स’पेक्षा वेगळे ‘थाई’ चवीचे सूप करून बघता येईल. झुकिनी, ब्रोकोली, मशरूम, गाजर, मटार, कोबी अशा भाज्यांचे मोठे-मोठे तुकडे करून ते उकळत्या पाण्यात किंवा ‘व्हेजिटेबल स्टॉक’मध्ये उकळवून घ्यावेत. दुसरीकडे गवती चहा (लेमन ग्रास) व आले किंवा ‘गलंगल’ (आल्यासारख्याच थाई प्रकार) यांचे बारीक काप करून पाण्यात उकळवा आणि त्या पाण्यात भाज्यांचे तुकडे घालून थोडे उकळून झाकून ठेवा. या सूपमध्ये मीठ व काळी मिरी पूड टाकावी व थंड झाल्यावर ‘अ‍ॅपल सीडर व्हिनेगर’ वा लिंबू रस घालावा.
अशी विविध सूप शोधून काढता येतील. टोमॅटो, बीट, गाजर आणि दुधी भोपळ्याचे सूप चवीला छान लागतेच, शिवाय वजन कमी करणाऱ्यांसाठीही ते चांगले. यात दुधी भोपळ्याचा एक छोटा तुकडा, एक टोमॅटो, अर्धे बीट व अर्धे गाजर जाड चिरून त्यात पाणी घालून कुकरमध्ये शिजण्यास ठेवा. शिजतानाच काळी मिरी घाला. नंतर ‘हँड मिक्सर’ने वाटून घ्या व न गाळता गरम सूप प्या. आवडत असल्यास यात काळे मीठ वापरता येते. झटपट होणाऱ्या या सूपमधून ‘बीटा कॅरोटिन’ आणि ‘व्हिटॅमिन ए’ मिळते. दुधीमुळे सूप दाटसर होते. बीट व गाजरामुळे गोडसरपणा येतो आणि टोमॅटोचा आंबटपणा येतो. हे सूप टोमॅटो सूपसारखेच दिसत असल्यामुळे भाज्या न खाणाऱ्या लहान मुलांना त्यातून बेमालूमपणे भाज्या देता येतात.
टोमॅटोचे रस्सम
टोमॅटो, चिंचेचा कोळ आणि शिजवलेल्या डाळीपासून बनवलेले पातळ आणि ‘टँगी’ रश्शासारखे गरम रस्सम पावसाळ्यासाठी चांगले. यात लवंग, काळी मिरीचा तयार रस्सम मसाला घालता येईल. पावसाळी हवेत चटपटीत खावेसे वाटते त्यासाठीही ते उत्तम, शिवाय पचनाच्या तक्रारी टाळण्यासाठी त्याचा उपयोग होतो.
बेसनाची लापशी
कुणाला सर्दी-खोकला झाल्यानंतर अनेक घरांत पेज किंवा लापशीसारखे पदार्थ होतात. त्यात ही बेसनाची सोपी लापशी करून पाहता येईल. दोन चमचे बेसन साजूक तुपात भाजावे व त्यात पाणी घालून पातळ लापशी करावी. त्यात गूळ, वेलदोडा पूड आणि जायफळ पूड घालावी. दूध घालू नये. चिमूटभर सुंठ टाकल्यास त्यामुळेही घशाला आराम वाटेल.
घरगुती ‘प्रोटिन ड्रिंक’
लहान किंवा वाढीच्या वयातील मुलांना पावसाळी वातावरणात घरगुती आणि गरम ‘प्रोटिन ड्रिंक’ नक्कीच आवडेल. यासाठी काजू, बदाम, अक्रोड व पिस्ता हे प्रत्येकी २० ग्रॅम घेऊन हलके भाजून सगळ्याची एकत्र पूड करा. पूड करताना त्यात १०० ग्रॅम राजगिऱ्याच्या लाह्य़ा, थोडे केशर, वेलची, जायफळ पूड, गोडासाठी ५० ग्रॅम खारीक पूड तसेच मखाणे भाजून त्याचीही पूड करून घाला. ही प्रथिनयुक्त पेयाची पावडर करून ठेवून देता येईल व आयत्या वेळी गरम दुधात घालून घेता येईल. शिजवण्याची आवश्यकता नाही. खारकेमुळे पेय गोडही लागते. यातून चांगली प्रथिने मिळतात, पोट भरते, शिवाय कॅल्शियम, लोह व जीवनसत्त्वेही मिळतात.
दुधाचा ‘उकाळा’
कपाच्या हिशोबाने अर्धे दूध व अर्धे पाणी घेऊन त्यात सुंठ पूड, हळद, एखादी काळी मिरी, १-२ लवंगा (किंवा त्याची चिमूटभर पूड), अर्धा चमचा खसखस पूड घालावी व दूध गरम करावे. उकाळ्यात चालत असेल तर साखर किंवा खाली उतरवल्यावर उकाळ्यात गूळ किंवा मधही घालता येतो. गरम दुधात मात्र गूळ वा मध घातल्यास दूध फाटू शकते.
कढी
नेहमी जेवणात भाताबरोबर ओरपायची कढी पावसाळी हवेसाठी एक उत्तम सूपसारखे पेय होऊ शकते. ही कढी बेसन, आले, हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालून बनवलेली मसालेदार नसलेली व पातळ अशी असावी. सर्दी- खोकल्यासारख्या आजारांमध्ये या कढीने घशाला आराम मिळतो.
कोणतेही गरम पेय प्यायल्यावर एक मात्र लक्षात ठेवावे, त्यावर लगेच गार पाणी पिऊ नये. नाहीतर त्रास होण्याची शक्यता असते.
– कांचन पटवर्धन, आहारतज्ज्ञ
(शब्दांकन- संपदा सोवनी)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा