चित्रपट चाहत्यांच्या मनावर चांदनी म्हणून अधिराज्य गाजवलेल्या श्रीदेवी यांचा मृत्यू त्यांच्या सगळ्याच चाहत्यांना चटका लावून गेला. त्यांचं निधन झालं आणि त्यानंतर ते नेमकं कशामुळे झालं असावं याविषयीच्या चर्चाना उधाण आलं. हृदयविकारामुळे त्यांचं निधन झालं, पाण्याच्या टबमध्ये बुडून मृत्यू आला की सौंदर्य अबाधित राखण्यासाठी केलेल्या असंख्य उपचारांमुळे त्या गेल्या याविषयी सोशल मीडियावर हिरिरीने मतं मांडली गेली.. या सगळ्यात अगदी सामान्य माणसांच्या तोंडीही आता बऱ्यापैकी ऐकू येऊ लागलेल्या एका शब्दाचा उल्लेख वारंवार झाला. तो शब्द म्हणजे बोटॉक्स उपचार. श्रीदेवी या बोटॉक्स उपचारामुळेच गेल्या याबाबत सोशल मीडियावरच्या तज्ज्ञांचं जणू एकमतच झालं.
म्हणूनच हे बोटॉक्स म्हणजे नेमकं काय यावर चर्चा होण गरजेचं आहे.
इंटरनेटसह अगदी कुठेही या बोटॉक्सचा उल्लेख शस्त्रक्रिया या अर्थानं होत असलेला आढळतो. म्हणून सुरुवातीलाच हे नमूद करतो की बोटॉक्स ही सर्जरी नाही. बोटॉक्सला उपचारपद्धती असं म्हणणं जास्त योग्य ठरेल, कारण या पद्धतीमध्ये सर्व उपचार हे एक किंवा अनेक इंजेक्शन्स देऊन केले जातात. या उपचार पद्धतीमध्ये कोणत्याही पद्धतीची कापाकापी होत नाही, अनेकदा तर भूल देण्याचीही गरज पडत नाही, त्यामुळेच याला सर्जरी म्हणता येत नाही.
बोटॉक्स म्हणजे नेमकं काय?
बोटॉक्सचं संपूर्ण नाव – ‘बोटुलिनम टॉक्सिन ए’. हे टॉक्सिन सहसा शिळ्या झालेल्या अन्नातून आपल्या पोटात जातं. त्याचं प्रमाण हाताबाहेर गेलं तर मानवी शरीरात ते एखाद्या विषासारखं काम करतं, हे लक्षात घ्यायला हवं. हे विष मानवी शरीराला मारक ठरू शकतं, त्याचबरोबर अनेक गंभीर आजारांना निमंत्रणही देऊ शकतं. मात्र ‘बोटुलिनम टॉक्सिन ए’चा इतर काही परिस्थितिजन्य आजारांमध्ये औषध म्हणून करता येतो का हे पाहण्यासाठी स्कॉट नावाच्या शास्त्रज्ञाने त्याच्या चाचण्या घ्यायला सुरुवात केली. ही गोष्ट १९७० मधली. तिरळेपणा, स्नायू खेचले जाणं किंवा डोळ्यांच्या वरच्या पापणीची सातत्यानं होणारी उघडझाप अशा परिस्थितीत स्कॉटने हे बोटुलिनम टॉक्सिन ए त्या रुग्णांवर इंजेक्शन मार्फत थेट स्नायूमध्ये टोचून पाहिलं. त्या त्या परिस्थितीत इंजेक्शन टोचलेल्या शरीरातील स्नायूंच्या हालचालींवर नियंत्रण मिळवण्यात स्कॉटला यश आलं. हे ‘बोटुलिनम टॉक्सिन ए’ ज्यांच्या शरीरावर टोचण्यात आलं, त्यांच्या शरीरभागातील संबंधित स्नायूंच्या हालचालींवर नियंत्रण आल्यामुळे सुरकुत्या कमी झाल्याचा फरक स्कॉटच्या निदर्शनास आला. त्यातूनच चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी करण्यासाठी याचा उपयोग होऊ शकेल हेही लक्षात आलं.
उपचार कोणासाठी?
तरुण दिसायचं आहे, असं वाटणाऱ्या प्रत्येकासाठी बोटॉक्स उपचार उपयुक्त ठरतात. सहसा वयाच्या ३५ ते ४० वर्षांनंतरच्या महिला आणि पुरुषही हे उपचार करून घेण्यासाठी येतात. विशेष म्हणजे हे उपचार फक्त सिनेसृष्टीतलेच तारे-तारका करून घेतात हा गैरसमज आहे.
बोटॉक्स आणि सौंदर्योपचार –
१९८०-८५ च्या सुमारास ‘बोटॉक्स टॉक्सिन ए’चा उपयोग सौंदर्योपचारांमध्ये अर्थात कॉस्मेटोलॉजीमध्ये करण्यास सुरुवात झाली. अमेरिकी कंपनी असलेल्या लर्गन या ब्रॅण्डचे ‘बोटुलिनम टॉक्सिन ए’ हे इंजेक्शनमध्ये घेऊन शरीराच्या विशिष्ट भागावरील स्नायूंमध्ये थेट टोचल्यास ते तिथे जादूसारखे काम करताना दिसते. उदाहरणार्थ कपाळावरच्या आठय़ा कमी करणे, डोळ्यांच्या कोपऱ्यांमध्ये किंवा डोळ्यांखाली येणाऱ्या सुरकुत्या कमी करणे अशा गोष्टींसाठी बोटॉक्स प्रभावीपणे काम करतं. इंजेक्शनच्या सीरिंजमध्ये अल्प प्रमाणात, शक्यतो युनिट्सच्या प्रमाणात हे बोटॉक्स दिले जाते. याचे प्रमाण कमी जास्त झाल्यास किंवा ते टोचण्याची पद्धत चुकल्यास त्याचे विपरीत परिणामही दिसतात. एकदा बोटॉक्स टॉक्सिन घेतल्यानंतर त्याचा परिणाम सर्वसाधारणपणे चार महिन्यापर्यंत टिकतो, त्यानंतर ते पुन्हा घ्यावं लागतं!
इतर फायदे कोणते?
‘बोटुलिनम टॉक्सिन ए’ हा मुळात विषासारखे काम करणारा घटक. त्याच्या दुष्परिणामांचा वापर उपचारांसाठी करण्याच्या युक्तीमधून अनेक आजारांवर गुणकारी इलाज उपलब्ध झाले. अनेक व्यक्तींना हाताच्या तळव्यांना किंवा काखेत प्रचंड प्रमाणात घाम येतो. याला हायपर हायड्रोसिस असंही म्हणतात. हे अतिरिक्त घामाचं प्रमाण कमी करण्यात ‘बोटुलिनम टॉक्सिन ए’ महत्त्वाची भूमिका बजावतं. तिरळेपणा, वेगवेगळ्या प्रकारचे स्नायूंचे आकुंचन (मसल स्पाझम) रोखण्यासाठीही हा उपाय चांगलं काम करतो. काही व्यक्तींचे मूत्राशय अतिसंवेदनशील असल्याने थोडे पाणी प्यायले तरी लगेच लघवीला जावेसे वाटते, त्यावर उपचार करण्यासाठीही बोटॉक्स हा एक चांगला पर्याय ठरतो!
धोके काय?
बोटॉक्स उपचार पद्धतीमुळे मृत्यू ओढवत नाही. मात्र ‘बोटुलिनम टॉक्सिन ए’ हे सौंदर्योपचार तज्ज्ञ असलेल्या, अनुभवी डॉक्टरकडूनच टोचून घेणं हिताचं आहे. बोटॉक्समुळे मृत्यू ओढवणे शक्य नसले तरी ते चुकीच्या पद्धतीने किंवा कमी-जास्त टोचले गेले तर चेहरा किंवा अवयव विद्रूप होण्याचा धोका आहे.
किंमत कशी ठरते?
सौंदर्यासाठी कोणी किती खर्च करायचा हा वैयक्तिक प्रश्न आहे. इंजेक्शनद्वारे किती युनिट ‘बोटुलिनम टॉक्सिन ए’ टोचलं गेलं, यावर या उपचार पद्धतीचा खर्च ठरतो. उदाहरणार्थ कपाळावरच्या आठय़ा कमी करण्यासाठी ‘बोटुलिनम टॉक्सिन ए’चे ४० युनिट्स टोचून घेतले तर एका युनिटचे २०० ते ३०० रुपये गुणिले ४० एवढी किंमत मोजावी लागते.
– डॉ. नरेंद्र पटवर्धन, त्वचारोगतज्ज्ञ
(शब्दांकन – भक्ती बिसुरे)