आपल्या सगळ्यांना कधी कधी अगदी दुर्बल, ऊर्जा नसल्यासारखे वाटते. याची कारणे वेगवेगळी असतात. कधी रात्रभर डोळा न लागल्याने, कधी खूप कामामुळे, कधी कार्यालयातल्या तणावामुळे तर कधी घरी लहान मूल असल्यानेही! आराम आणि छान झोप यामुळे आपला थकवा पळूनही जातो. मात्र तरीही थकवा जात नसेल तर मात्र डॉक्टरकडे जावे लागते.

थकव्याचे निदान

’ थकव्यामागे साधारणपणे तीन प्रकारची कारणे असतात. जीवनशैलीशी निगडित, शारीरिक किंवा मानसिक.

जीवनशैलीशी निगडित कारणे कोणती?

’ आपल्या रोजच्या आयुष्याशी निगडित अनेक कारणे आरोग्यावर परिणाम करतात आणि थकव्याला आमंत्रण देतात.

’ अतिकाम

’ व्यायामाचा अभाव आणि आरामदायी जीवनशैली

’ अपुरी झोप (किमान ७ ते ९ तासांची झोप आवश्यक असते.)

’ जेट लॅग

’ सततचा प्रवास

’ कार्यालयामधील बदलत्या वेळांमधील काम

’ शरीरातील पाणी कमी होणे

’ औषधे

’ दारू

’ सतत तंबाखू चघळल्याने थकवा जाणवतो

’ चहा, कॉफीतील कॅफिनमुळे सुरुवातीला ताजेतवाने वाटते, मात्र त्यानंतर थकवा येतो.

’ तापमानात होणारे बदल

शारीरिक कारणे कोणती?

’ शरीराच्या यंत्रणेवर परिणाम करणाऱ्या आजारांमुळेही थकवा जाणवतो.

’ लोहाची कमतरता

’ हायपोथायरॉइडिझम. म्हणजे संप्रेरकांचे आवश्यकतेपेक्षा कमी प्रमाण.

’ कावीळ

’ मूत्रमार्ग संसर्ग तसेच दीर्घकालीन मूत्रपिंड विकार

’ पोटात झालेले कृमी, जेवणातून झालेली अ‍ॅलर्जी

’ निद्रादोष. झोपेतून सतत उठणे, घोरण्यामुळे झोपेत अडथळे येणे.

’ फुप्फुसाचे आजार

’ मधुमेह, हृदयरोग, कर्करोग, मेंदूविकारासारखे गंभीर आजार

मानसिक कारणे कोणती?

’ दीर्घकाळ जाणवणारा भावनिक आणि मानसिक ताण थकव्याला कारणीभूत ठरतो.

’ नैराश्य

’ सततच्या वेदना

’ अस्वस्थता

’ व्यसन

’ दु:ख

थकव्याची लक्षणे

’ थकव्याला जशी शारीरिक, मानसिक आणि जीवनशैलीशी निगडित कारणे आमंत्रण देतात, त्याचप्रमाणे थकव्याची लक्षणेही या तिन्ही प्रकारांमध्ये दिसू लागतात.

’ भूक मंदावते

’ सतत झोप आल्यासारखी वाटते

’ चिडचिड होते.

’ लक्ष केंद्रित करता येत नाही.

’ डोकेदुखी

’ भोवळ येते.

’ स्नायू अशक्त होतात आणि दुखतात

’ प्रतिसाद आणि प्रतिक्षिप्त क्रिया मंदावतात.

’ निर्णयक्षमता आणि सारासारविवेक कमी होतो.

’ स्मरणशक्ती उणावते. चटकन विसरायला होतात.

थकव्यामधील काही कारणांसाठी तातडीने उपचार घ्यावे लागतात का?

हो, काही वेळा तातडीने रुग्णालय गाठण्याची वेळ येते. छातीत दुखणे, धाप लागणे, छातीत धडधड होणे, चक्कर येणे, ओटीपोटात किंवा पाठीत तीव्र कळ येणे, सततची तीव्र डोकेदुखी, तोंड किंवा गुदद्वारावाटे रक्तस्राव होत असेल, तर तातडीने उपचाराची गरज आहे.

औषधांनीही थकवा येतो का?

अनेक औषधांनी अशक्तपणा आणि थकवा जाणवतो. रक्तदाब नियंत्रणाची औषधे, उच्च कोलेस्टेरॉलसाठी दिलेली औषधे, पित्तासाठी दिलेल्या गोळ्या, अस्वस्थतता कमी करण्यासाठी दिलेली बेन्झोडायझेपिन्स औषधे, अ‍ॅलर्जीच्या गोळ्या, नैराश्य तसेच इतर मानसिक उपचारांवरील औषधे, जीवाणूसंसर्गावर दिली जाणारी प्रतिजैविके, वेदनानाशक औषधे यांमुळे थकवा जाणवू शकतो. औषधांनी थकवा जाणवत असेल तर काही सोपे उपाय करता येतात.

’ हलका व्यायाम करा. काही अंतर चालून जा किंवा स्ट्रेचेसचाही फायदा होतो.

’ खोल श्वास घ्या.

’ थोडा चहा किंवा कॉफी घ्या.

समुपदेशन नि व्यायाम

काही वेळा थकवा जाण्यासाठी समुपदेशनाची गरज पडते. थकव्यामागची निश्चित कारणे शोधून तो कमी करण्यासाठी व्यावसायिक मदत घेता येते. व्यायाम हा थकव्यावरचा चांगला उपाय आहे. त्यामुळे मेंदूमध्ये एन्डोर्फिन हे चांगले वाटणारे रसायन पाझरते. किमान दहा मिनिटे वेगाने चालण्याचा व्यायाम सुरू करा आणि दर आठवडय़ात पाच दिवस ३० मिनिटे नेमाने चालायला जा. पोहणे, वॉटर एरोबिक्स, सायकलिंग, टेबल टेनिस अशा मध्यम स्वरूपाच्या व्यायामामुळेही थकवा जातो.

थकवा कमी कसा कराल?

’ थकव्यासाठी एकच कारण नाही. त्यामुळे जीवनशैली आणि आहारातील काही बदल थकव्यावर मात करण्यासाठी उपयोगी पडू शकतात.

’ झोपण्याच्या सवयीमध्ये बदल करा आणि पुरेशी झोप घ्या.

’ नियमित व्यायाम करा.

’ चहा, कॉफी टाळा. भरपूर पाणी प्या.

’ चांगला आहार घ्या आणि वजन आटोक्यात ठेवा.

’ कामांबाबतीत वास्तविक उद्दिष्ट ठेवा.

’ आराम करा, ध्यानधारणा (मेडिटेशन) आणि योगाभ्यास उपयोगी पडतो.

’ ताण कशामुळे येतो हे शोधून त्यावर उपाय शोधा.

’ दारू, निकोटीन आणि ड्रग्ज टाळा.