पाच दिवसांच्या तापानंतर सहा वर्षांच्या योगेशची डेंग्यूची तपासणी पॉझिटिव्ह आली आणि आईवडिलांच्या चेहऱ्यावर आभाळ कोसळल्यासारखे भाव आले. त्यांना काळजी वाटणे साहजिक होते. पण योगेश छान जेवत होता. त्याला थकवा जरूर आला होता आणि भूक थोडी कमी झाली होती, पण तेवढे अपेक्षित होते. थोडय़ा वेळाने पेशींच्या तपासाचा रिपोर्ट घेऊन योगेशचे वडील धावतच आले. डॉक्टर, अहो प्लेटलेट्स ९० हजार झाले आहेत. आपण योगेशला तातडीने प्लेटलेट्स दिले पाहिजे. लवकर चिठ्ठी द्या आणि कुठल्या ब्लड बँकेत जायचे ते सांगा. मी त्यांना जरा हसतच म्हणालो, अहो, मला डॉक्टर म्हणून काही निर्णय घेऊ  द्या. सगळे निर्णय तुम्हीच घेऊ  नका. पण डॉक्टर प्लेटलेट्स खाली घसरले.. वडिलांना मध्येच तोडत मी समजावून सांगितले. अहो, डेंग्यूमध्ये प्लेटलेट्स कमी होणे हे स्वाभाविक असते आणि लगेचच प्लेटलेट्स द्यायची मुळीच गरज नसते. अजून एखाद्या आठवडय़ात प्लेटलेट्स आपोआप वर येतील आणि या तात्पुरत्या कमी झालेल्या प्लेटलेट्सने काही समस्या येत नाही. जर प्लेटलेट्स वीस हजारांच्या खाली गेले तरच आपल्याला प्लेटलेट्स देण्याचा विचार करायला हवा आणि असे खूप कमी केसेसमध्ये घडते. तरी आईवडिलांच्या मनातील शंका पूर्ण गेली नव्हती. डॉक्टर पण डेंग्यूमध्ये प्लेटलेट्स कमी का होतात? योगेशच्या इतर पेशीही कमी झाल्या आहेत. बघा डेंग्यू हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे. काही व्हायरल इन्फेक्शन्समध्ये पेशी बनवणारा कारखाना म्हणजे बोन मॅरो हा काही काळासाठी स्वत:च बंदी घोषित करतो. तयार होणाऱ्या पेशी नष्ट होण्याची शक्यता असल्याने असे घडते. म्हणजे एका अर्थाने ही इष्टापत्तीच असते. शहरात दंगल उसळल्यावर हानी टाळण्यासाठी कर्फ्यू लावला जातो तसेच हे असते. काही काळाने जनजीवन पूर्वपदावर आले की कर्फ्यू उठवला जातो. शरीरातील डेंग्यूचा जंतूसंसर्ग कमी होण्यास एक ते दीड आठवडा लागतो. त्यानंतर हळूहळू पेशींचा कारखाना आपोआप सुरू होतो व पेशींचे प्रमाण पूर्ववत होते. पण मग या पेशी वाढवण्यासाठी काही औषध नाही का? नाही. पेशी वाढवण्यासाठी असे काही औषध उपलब्ध नाही. पण त्याची गरजदेखील नाही. मग आपण आता नेमके काय करायचे? प्लेटलेट्स थोडे खाली आल्यामुळे आपण एक गोष्ट मात्र नक्की करायची. दर दोन दिवसांनी प्लेटलेट्सचे प्रमाण तपासत राहायचे. तसेच योगेशचा रक्तदाब आणि त्याला किती लघवी होते यावर लक्ष ठेवायचे. त्यावरूनही आपल्याला बऱ्याच गोष्टींचा अंदाज येईल. डॉक्टर आपण पहिल्या दिवशीच डेंग्यूची तपासणी केली असती तर चालले नसते का? खरे तर आधी केली जाणारी डेंग्यूची तपासणी ही एक आठवडय़ानंतर पॉझिटिव्ह येते, पण एन एस वन अँटीजन ही तपासणी जंतुसंसर्गाच्या पहिल्याच दिवशी पॉझिटिव्ह येते. पण कुठल्याच तापाच्या पहिल्या दिवशी कुठलीही तपासणी आवश्यक नसते. आणि तेव्हा डेंग्यू आहे हे कळले तरी ताप-सर्दी-खोकल्याच्या औषधांशिवाय करण्यासारखे काही नसते. ते आपण केलेच आहे. मुळात डेंग्यू हा आपोआप बरा होणारा आजार असल्याने रुग्णावर व पेशींवर लक्ष ठेवणे हा डेंग्यूच्या उपचारांचा महत्त्वाचा भाग असतो. डॉक्टर तरीही सतर्कता म्हणून आपण प्लेटलेट्स दिलेच तर? एक लक्षात घ्या की, या वेळेला योगेशच्या शरीरात प्लेटलेट्स नष्ट करणारे घटक फिरत आहेत. त्यामुळे प्लेटलेट्स दिले तर हे घटक अजून जागरूक होऊन शरीरातील प्लेटलेट्सची अधिक हानी होऊ  शकते. तसेच थोडा वेळ प्लेटलेट्सची खोटी वाढ खरेच प्लेटलेट्स किती घसरले आहेत हे कळू देणार नाहीत. आता मात्र प्लेटलेट्स न देण्याचा विचार योगेशच्या आईवडिलांना पूर्ण पटला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

amolaannadate@yahoo.co.in

amolaannadate@yahoo.co.in