शुण्ठय़ाऽस वातं शमयेदू गुडूची
गुडूची सत्त्व सस्वादू पथ्यं लघूच दीपनं
आयुर्वेदीय औषधी महासागरात आवळा, हिरडा, कुडा, शतावरी, आस्कंद अशा अनेकानेक वनस्पतींना खूप मोठे महत्त्व आहे, पण या सर्व वनस्पती भगिनींमध्ये मौल्यवान गुळवेलीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कन्नड, तामिळ व मलेशियातील भाषांमध्ये अमृतवल्ली असे गौरवाने या वनस्पतीचे वर्णन केले जाते. ही वेल सर्वत्र अनेकानेक मोठय़ा वृक्षांच्या आधाराने वाढते. तिला चुकून खालून तोडली, तरी वरवर ती वाढत राहते म्हणून तिला छिन्नरूहा असे सार्थ नाव आहे. कोकणात काही जण तिला गरुडवेल म्हणून संबोधतात, पण प्रत्यक्षात गरुडवेल ही वेगळी वनस्पती आहे. गुळवेल बहुवर्षांयु मांसल असून तिच्या ताण्यास लांब धाग्यासारखी मुळे फुटून ती लोंबत असतात आणि जमिनीत घुसतात. पाने एकांतराने गुळगुळीत व हृदयाकृती, देठ लांब, फुले बारीक, पिवळय़ा रंगाची आणि झुबक्याने येतात. फळे लाल रंगाची असतात. ताज्या गुळवेलीची साल हिरवी व मांसल आणि तिच्यावर पातळ उदी रंगाची त्वचा असते. गुळवेलीचा ताणा आडवा कापला असता आतील भाग चक्राकार असतो. गुळवेलीस विशिष्ट वास नसतो, पण चव खूप कडू असते. गुळवेल फेब्रुवारी, मार्च महिन्यात खूप पुष्ट होते, पण ऐन उन्हाळय़ात गुळवेल जमवून, बारीक तुकडे करून वाळवावी. गुळवेलीत एक कडू द्रव्य फार लहान प्रमाणात, दारूहाद्रिक अत्यल्प प्रमाणात व पुष्कळसे पीठ असते. बाजारात मिळणाऱ्या गुळवेल सत्त्वात खूप भेसळ असते. खरे गुळवेलसत्त्व बाजारी गुळवेलसत्त्वासारखे पांढरेशुभ्र कधीच नसते. मे महिन्यात जुनी गुळवेल जमवून त्याची वरची साल खरडून काढावी. बारीक तुकडे करून ते थोडे ठेचावे. पाण्यात दहा-बारा तास भिजत ठेवून नंतर नीट कुसकरावे. सर्व मिश्रण रवीने नीट घुसळावे. चोथा वर तरंगत असतो, तो वेगळा करावा. पाणी कपडय़ातून गाळून घ्यावे. काही तासाने तळास पीठ बसते. मग वरचे पाणी काढून घेऊन पुन्हा चोथा कुसकरून रवीने घुसळून एक-दोन चांगले कड द्यावे आणि पुन्हा वस्त्रगाळ करून अधिक सत्त्व मिळवावे. ते उन्हात परातीत सुकवावे. असे सत्त्व मळकट, पांढरे, बनारसी साखरेसारखे दिसते, परंतु कडवट असते.
गुळवेलीत ज्वरहरधर्म आहे, अशी चुकीची समजून आहे. टाइफाइडसारख्या जीर्ण विकारात अमृतारिष्टाचे योगदान खूपच मोलाचे आहे. अन्य तापाच्या विकारात जी थंडी वाजते ती थंडी गुळवेलीच्या काढय़ाने बंद होते. मात्र जीर्ण ज्वरात अंगावर काटा येत असल्यास गुळवेलीचा चांगला उपयोग होतो. गुळवेल धमासा, परिपाठ यांचा काढा तापात एकत्रित चांगला गुण देतो. पांथरी वाढली असल्यास गुळवेलसत्त्व सत्त्वर गुण देते. गुळवेलीचा मूत्रजनन व मूत्रविरजीनय धर्म विशेष आहे. त्यामुळेच गुळवेलीचा वापर सर्व प्रकारच्या प्रमेहात होतो. वाचक मित्रांनो, तुम्हाला जर १०० वर्षांचे निरोगी आयुष्य जगायचे असेल तर गुळवेलीबरोबर गोखरू व आवळा अशी घटकद्रव्ये असणारे रसायनचूर्ण अवश्य वापरा. मधुमेह, रक्तदाबवृद्धी, मूत्रपिंडविकार, स्थौल्य, केश्यविकार, नेत्रविकारासकट अनेक विकारांमध्ये रसायनचूर्णाचा उपयोग होतो. स्त्री-पुरुषांच्या हट्टी मूत्रेंद्रिय विकारात गुळवेलीचा काढा किंवा रसायनचूर्णाचे महत्त्व खूपच आहे. माझ्या वापरात गुळवेल घटकद्रव्य असणारी नागरादिकषाय, रक्तशुद्धी काढा, आरोग्य काढा, दशमूलारिष्ट, खोकला काढा, महातिक्त व महात्रफल घृत, संशमणीवटी, मधुमेहवटी अशी जवळपास १५ औषधे आहेत. च्यवनप्राश व अश्वगंधापाक या दोन थोर बल्य औषधात ताजी गुळवेलच वापरावी हे सांगणे नको.
–इति अमृता पुराण!