तीन वर्षांचा संदीप हा एकुलता एक आणि आईचा लाडका आहे हे आधीच्या भेटींमधून माझ्या लक्षात आले होते. या वेळी संदीप आला तेव्हा ताप, सर्दी, खोकला असे काही कारण नव्हते. तो हसत, खेळत कन्सल्टिंग रूममध्ये आला. आई मात्र काळजीत दिसत होती. ‘डॉक्टर सहा महिन्यांपासून हे सगळे सुरू आहे. मी सुरुवातीला दुर्लक्ष केलं पण आताशा ही सवय खूप वाढली आणि परवा तर कहरच झाला.’

मी विचारले, ‘नेमकं काय झाले आहे?’

‘डॉक्टर हा आजकाल त्याला हवी असलेली गोष्ट हातातून घेतली किंवा जराही त्याच्या मनाविरुद्ध झालं की रडायला सुरुवात करतो. आणि रडत रडत मध्येच श्वास रोखून धरतो. सुरुवातीला मला काही वाटले नाही, पण नंतर त्याची ही सवय वाढतच गेली आणि मग असं करून तो थोडा निळा पडायचा. परवा मात्र त्याने श्वास इतका वेळ रोखून धरला की त्याला थोडे झटके आल्यासारखे झाले. मी खूपच घाबरले.’

खरं तर माझ्यासाठी हा ओपीडीमध्ये खूप नित्याचा आढळणारा प्रकार आहे. पण प्रत्येक आईवडिलांना मुलांची ही श्वास रोखून धरण्याची सवय खूप घाबरवून सोडते. याला आम्ही आमच्या वैद्यकीय भाषेत ‘ब्रेथ होल्डिंग स्पेल्स’ असे म्हणतो. १ ते ३ वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये ही सवय आढळून येते. याचे प्रमाण जवळपास २७ टक्के एवढे आहे. यात घाबरून जाण्यासारखे काहीही नाही. पण यावर उपचार मात्र करायला हवेत. ‘मला सांगा हा स्वभावाने जास्त हट्टी आहे का?’

‘डॉक्टर आपल्याला वाटते लहान आहे, जाऊ  द्या म्हणून आम्ही त्याचे हट्ट पुरवतो. पण आता मात्र त्याला जराही विरोध केला की हा असा श्वास रोखून धरतो म्हणून आम्हीही विरोध करत नाही.’

‘बघा त्याची ही सवय जाईल, पण तुम्हाला हळूहळू त्याचा प्रत्येक हट्ट पुरवणंही कमी करायला हवं. जेव्हा तो श्वास रोखून धरेल तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवून त्याला थोडं हलवून त्याचा श्वास आधी पूर्ववत करायला हवा. तसेच एकदा श्वास पूर्ववत झाला की लगेच काळजीने त्याचे लाड करणं, आपण खूप भावुक झालो आहोत हे त्याच्यासमोर दाखवणे टाळा. एकदा त्याचं रडणं थांबलं की तुम्ही थोडं दुर्लक्ष केल्यासारखं करून दुसऱ्या खोलीत जाऊ  शकता. तो हे मुद्दामहून करत नाही. पण त्याला जर कळले की असे केल्याने आपल्या मागण्या मान्य होतील तर मात्र तो जाणीवपूर्वक दर वेळी रडताना श्वास रोखू लागेल.’

‘डॉक्टर पण झटक्यांचे काय? याला झटक्यांची औषधे सुरू करण्याची गरज आहे का?’

‘नाही, मुळीच नाही. श्वास रोखल्याने मेंदूला रक्तप्रवाह कमी पडला की झटके येतात. म्हणून आपण श्वास रोखण्याच्या सवयीला आधी आळा घालायला हवा. यासाठी एक औषध आपण देऊ  शकतो. बऱ्याचदा या मुलांमध्ये लोहाची कमतरता असते म्हणून लोहाच्या औषधाचे टॉनिक सुरू करायला हरकत नाही.’

‘डॉक्टर अजून काही औषधे द्यायची का?’

‘मी सांगितलेल्या वागणुकीच्या पद्धती, श्वास रोखणे, मधून तोडणे आणि लोहाचे टॉनिक एवढे उपचार तीन महिने होऊ  दया. जर याने फरक पडला नाही तर पिरॅसीटॅम नावाचे औषध आहे. ते आपण देऊ  शकतो. पण बहुतांश मुलांना मी सांगितलेल्या उपचाराने फरक पडतो. डॉक्टर पुढे याचा काही त्रास होईल का?’

‘मुळीच नाही, या सवयीमुळे असा पुढे काही त्रास संभवत नाही. पण हा पुढे जास्त हट्टी होऊ  शकतो. याविषयी ही धोक्याची घंटा आहे. म्हणून त्याच्या हट्टी स्वभावाविषयी तुम्ही सतर्क राहायला हवं, एवढंच.’

amolaannadate@yahoo.co.in

Story img Loader