यंदा मार्चपासून उन्हाचा तडाखा वाढत आहे. या दिवसांत प्रचंड उकडत असताना सतत पाणी किंवा काही तरी थंड प्यावेसे वाटते. शाळांना सुट्टय़ा लागल्यावर मुलेही दिवसभर घरात असल्यामुळे त्यांचीही थंड पेयांसाठी भुणभुण सुरू असते. बाहेरच्या प्रचंड साखर व ‘प्रीझव्र्हेटिव्ह’ असलेल्या किंवा फसफसणाऱ्या थंड पेयांपेक्षा घरगुती आणि ताज्या फळांपासून बनवलेली पेये केव्हाही चांगली. ताजेतवाने करणाऱ्या घरगुती थंड पेयांविषयी..
आंबा, रातांबे (कोकम), करवंदे, जांभळे, फणस, काजू हा खास उन्हाळ्यातला मेवा. कलिंगडे आणि टरबुजासारखी पाणीदार फळे तर असतात, शिवाय केळी आणि चिकू बारा महिने मिळतात.
आंबा मिल्कशेक/ आंबा लस्सी- आंब्यात त्वचा व डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असलेले ‘अ’ जीवनसत्त्व असते. तोंडाच्या व फुप्फुसांच्या कर्करोगाला प्रतिबंध करण्यासाठीही ‘अ’ जीवनसत्त्व चांगले. रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे ‘क’ जीवनसत्त्व, रक्तातील ‘होमोसिस्टेन’ द्रव्याच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवण्यास मदत करणारे ‘बी- ६’ जीवनसत्त्व त्यात आहेच. शिवाय रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर ठरणारे ‘पोटॅशियम’, रक्तातील लाल पेशींची निर्मिती वाढवण्यासाठी मदत करणारे ‘तांबे’ आंब्यात आहे.
केळी, चिकू आणि काजूचा मिल्कशेकसुद्धा चवीला उत्तम लागतो. फळे मुळातच गोड असल्यामुळे मिल्कशेक करताना साखर आपल्या प्रकृतीनुसार कमी करता येईल. वजन जास्त असल्यास गाईचे दूध, ‘लो फॅट’ किंवा ‘स्कीम्ड मिल्क’ वापरावे. नुसत्या फळांच्या रसापेक्षा मिल्कशेक चांगला. त्यातून प्रथिनांचा चांगला स्रोत असलेले दूध पोटात जाते आणि भूक लवकर लागत नाही. दुधातून कबरेदके, ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’, ‘ई’ आणि ‘के’ ही जीवनसत्त्वे, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, तांबे, सोडियम आणि जस्त मिळतच असते.
मिल्कशेकप्रमाणेच आंबा किंवा फळे घालून घरीच बनवलेली लस्सी हाही चांगला पर्याय.
फळांची स्मूदी-
‘स्मूदी’मध्ये फळे जास्त व द्रवपदार्थ कमी असतो. हे मिल्कशेकपेक्षा घट्ट पेय आहे. पिकलेली ताजी फळे किंवा भाज्या या पाणी, दूध किंवा दही (योगर्ट) घालून मिक्सरमध्ये ‘ब्लेंड’ करून स्मूदी बनवतात. त्यात आवडीप्रमाणे साखर वा काजू-बदाम घालता येतात. केळे, आंबा वा स्ट्रॉबेरीची अशी स्मूदी करता येईल.
भाज्यांचीही स्मूदी बनवतात. पालक, ब्रोकोली, सेलरी, पार्सली या भाज्यांसह केळी किंवा स्ट्रॉबेरीसारखे एखादे गोड फळ घालून ‘ग्रीन स्मूदी’ही करतात.
कैरीचे पन्हे- कैरीत मुबलक प्रमाणात ‘क’ जीवनसत्त्व आहे. ते रोगप्रतिकारशक्तीसाठी चांगले. त्यातील ‘के’ जीवनसत्त्व उन्हाळ्यात होणारा रक्तस्राव थांबवण्यासाठी मदत करते. कैरीतील सोडियम व पोटॅशियममुळे शरीरातील पाणी धरून ठेवण्यास मदत होते. मॅग्नेशियममुळे पायात गोळे येण्यासारख्या गोष्टी टाळता येतात. कैरीचे पन्हे करताना त्यात वेलची व अगदी थोडी हिरवी मिरचीदेखील घालतात.
कोकम सरबत किंवा सोलकढी- कोकमात भरपूर प्रमाणात ‘क’ जीवनसत्त्व आहे. मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि मँगेनीजदेखील त्यात आहे. कोकमात तंतुमय पदार्थही चांगल्या प्रमाणात असल्याने ते सारक ठरते आणि बद्धकोष्ठावर त्याचा फायदा होतो. कोकमाचे सरबत वा सोलकढी करताना जिऱ्याची पूड जरूर घालावी. मधुमेही व्यक्तीही कोकमाचे बिनसाखरेचे ‘आगळ’ सरबत घेऊ शकतात. ताज्या कोकम फळांचा (रातांबे) नुसत्या साध्या पाण्यात गर काढून त्याचे सरबतही छान लागते.
आवळा सरबत- आवळ्यात ‘क’ जीवनसत्त्वाचे प्रमाण उत्तम आहे. शिवाय ‘अ’ जीवनसत्त्व, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, पोटॅशियम, सोडियम, मॅग्नेशियम व तांबे हे घटकही आहेत. या सगळ्यामुळे नेहमीच्या सरबतांपेक्षा जरा वेगळ्या चवीचे आवळा सरबत चांगले.
उसाचा रस- उसाच्या रसात पूर्णपणे साखर असली तरी ती शरीराला हानीकारक नसलेली ‘अनरीफाइन्ड शुगर’ आहे. उसात मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम व लोह ही खनिजे आहेत. पोटॅशियममुळे शरीरातील पाणी कमी होण्यास अटकाव होतो. ऊस ‘लो ग्लायसेमिक इंडेक्स’ या प्रकारात मोडतो. त्यामुळे उसाचा रस प्यायल्यावर झटकन शरीरातील साखर वाढत नाही; परंतु पोट भरल्यासारखे वाटते. उसाच्या रसाची चव वाढवण्यासाठी आले व लिंबू वापरता येईल.
शहाळ्याचे पाणी- शहाळ्याच्या पाण्यात सोडियम आणि पोटॅशियम चांगल्या प्रमाणात असते. त्यामुळे शरीरातील कमी झालेले पाणी भरून निघते आणि ताजेतवाने वाटते. स्नायूंमध्ये येणाऱ्या पेटक्यांना प्रतिबंध करण्यासाठीही पोटॅशियम चांगले.
काकडीचे ताजे सरबत- काकडी, पुदिन्याची पाने, साखर, मीठ, थोडीशी मिरपूड व लिंबाचा रस पाण्याबरोबर एकत्र वाटून गाळून घेतात व बर्फ घालून पितात. काकडीत उष्मांक खूप कमी आहेत, तर स्निग्ध पदार्थ नाहीत. त्यात पोटॅशियमदेखील चांगल्या प्रमाणात आहे.
बडिशेपेचे सरबत- हे एक चविष्ट व थंडगार पेय. बडिशेपेत ‘क’ जीवनसत्त्व, पोटॅशियम, मँगनीज, लोह आणि काही प्रकारची जंतू मारणारी तेले (‘व्होलटाइल आइल्स’) आहेत. शिवाय बडिशेप पोटासाठी चांगली असल्याने उन्हाळ्यात हेोरबत विशेष चांगले.
वाळ्याचे सरबत- वाळ्यातसुद्धा काही विशिष्ट तेले आहेत. त्यामुळे सरबताला चांगला स्वाद येतो. शरीराला होणारा उन्हाचा त्रास आणि शरीरातील पाणी कमी होण्यावर त्याचा फायदा होतो. उन्हाळ्यात झोप न येणे, त्वचेला पडणाऱ्या भेगा, स्नायूदुखी यावरही ही तेले चांगली.
drjoshivaishali@gmail.com
डॉ. वैशाली जोशी
(शब्दांकन- संपदा सोवनी)