डॉ. प्रकाश मराठे
उन्हाच्या झळांनी राज्यभर सर्वाना हैराण करून सोडले आहे. अनेक ठिकाणी तापमानाने ४० अंशाचा टप्पा केव्हाच ओलांडला असून, सातत्याने तापमान चढे राहत आहे. बाहेर जाताना डोक्यावर टोपी घातल्याशिवाय किंवा स्कार्फ बांधल्याशिवाय बाहेर जाणेच अशक्य झाले आहे. हा काळ उन्हाळी आजारांचा. ऊन वाढते तसे सर्वात आधी डोळय़ांच्या तक्रारी सुरू होतात. या दिवसांत डोळय़ांच्या कोणकोणत्या तक्रारी उद्भवतात आणि त्यापासून बचाव कसा करावा हे पाहू या.
आपल्या डोळय़ांमध्ये नैसर्गिकरीत्या तयार होणाऱ्या आणि डोळे निरोगी ठेवण्यास मदत करणाऱ्या अश्रूंचे सतत बाष्पीभवन होत असते. उन्हाळय़ात उष्ण हवा आणि आजूबाजूच्या रखरखीतपणामुळे ही प्रक्रिया वाढते आणि त्यामुळे डोळे कोरडे पडण्याची शक्यता असते. काही जणांना मुळातच डोळे कोरडे पडण्याचा त्रास असतो. मोबाइल आणि संगणकाच्या अतिवापरामुळे त्यांचे डोळे आधीपासूनच कोरडे पडत असतात (ड्राय आय सिंड्रोम). त्यांना उन्हाळय़ात अधिक त्रास होतो. परंतु इतर वेळी ज्यांच्या डोळय़ांमध्ये अश्रूंचे स्रवण योग्य प्रकारे होत असते त्यांनाही त्रास होऊ शकतो.
डोळय़ांची पापणी जेव्हा बुबुळावर घासली जाते तेव्हा डोळय़ांत काहीतरी गेल्यासारखे वाटण्याचा अनुभव अनेकांनी घेतला असेल. वैद्यकीय भाषेत याला ‘फॉरेन बॉडी सेन्सेशन’ असेही म्हणतात. यात डोळय़ांत खडा टोचल्यासारखे वाटते. शिवाय डोळे लाल होणे, त्यातून पाणी येणे व खाज सुटणे अशी लक्षणेही दिसतात. डोळय़ांचा काही आजार नसलेल्या व्यक्तींनाही डोळय़ांची आग होणे, डोळे चुरचुरणे, खाज सुटणे, डोळय़ांतून पाणी येणे आणि डोळे लाल होणे ही लक्षणे दिसू शकतात आणि ‘इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स’ वापरणाऱ्यांना हे त्रास अधिक जाणवतात.
काहींना डोळय़ांच्या ‘अॅलर्जी’चाही त्रास असतो. उन्हाळय़ाच्या दिवसांत तो वाढतो. उष्णता, डोळय़ांचा कोरडेपणा आणि अॅलर्जी या सर्व गोष्टी एकत्र आल्यामुळे त्याच्या लक्षणांची तीव्रता वाढते. हे रुग्ण सतत डोळे चोळतात, तसेच त्यांचे डोळे सारखे लाल होतात.
काय करावे?
- उन्हाळय़ात शरीराला भरपूर पाण्याची आवश्यकता असते, तशीच डोळय़ांनाही पाण्याची गरज असते. त्यासाठी स्वच्छ व गार पाण्याने दिवसातून तीन-चार वेळा डोळे धुवायला हवेत.
- डोळय़ांच्या अॅलर्जीसाठी अनेक जण स्वत:च्या मनानेच ‘स्टिरॉईड आय ड्रॉप’ वापरत असतात. डोळय़ांत घालण्याच्या या औषधांचे काही दुष्परिणाम असल्यामुळे वैद्यकीय सल्ल्याशिवाय त्याचा वापर नकोच. या लोकांनीही स्वच्छ व गार पाण्याने डोळे धुवायला हवेत, तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने ‘स्टिरॉईड’ नसलेले, ‘अँटी अॅलर्जिक ड्रॉप’ डोळय़ांत घातलेले चांगले.
- काही ‘ल्युब्रिकेटिंग आय ड्रॉप’देखील मिळतात. तेही वैद्यकीय सल्ल्याने वापरता येतात.
- डोळय़ांना उन्हाळय़ाचा त्रास होत असतानाच जंतुसंसर्गदेखील होऊ शकतो. असे झाल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने ‘अँटिबायोटिक’ औषधे घेतल्यास फायदा होतो.
- कुठेही बाहेर जाताना डोळय़ांना संरक्षण देणारा चांगल्या प्रतीचा गॉगल जरूर वापरावा.
- चष्मा असलेल्या व्यक्तींनी चष्मा आणि उन्हात गेल्यावर गॉगल असे दुहेरी काम करणारा चष्मा तयार करून घ्यावा व तो नेहमी वापरावा.
drprakashmarathe@gmail.com