* आवळय़ाचा रस नुसता खडीसाखर घालून किंवा जिरेपूड घालून घ्यावा. रस ताज्या आवळय़ांचाच घ्यावा. ताजे आवळे न मिळाल्यास आवळा पावडर रात्री पाण्यात भिजत ठेवून सकाळी ते पाणी गाळून प्यावे.

* डोके शांत राहणे किंवा केसांच्या सर्व तक्रारींसाठी आवळय़ाचे तेल इतर औषधींसह नियमित वापरावे.

* पित्त प्रकृती किंवा पित्ताचा वारंवार त्रास होत असलेल्यांनी रोज सकाळी उपाशीपोटी ‘मोरावळा’ खावा.

* आवळय़ाचा महत्त्वाचा कल्प म्हणजे ‘च्यवनप्राश.’ १२ वर्षांपासून वृद्धांपर्यंत सर्वानी रोज सकाळी नाश्त्यानंतर एक चमचा च्यवनप्राश कोमट दुधाबरोबर घ्यावा. नंतर दीड-दोन तास काही खाऊ नये. पित्तविकारी व्यक्तींनी फक्त नोव्हेंबर ते फेब्रुवारी-मार्चपर्यंतच घ्यावा. लहान मुलांना च्यवनप्राश शक्यतो देऊ नये.

* च्यवनप्राशप्रमाणे आवळा-गोखरू-गुळवेल एकत्र असलेले रसायन चूर्ण धातुवृद्धी, धातुपृष्टी, कडकी, पित्त यावर खूप उपयोगी आहे. हे बाराही महिने घ्यायला हरकत नाही. मधुमेही रुग्णांना च्यवनप्राशचा उत्तम पर्याय आहे.

– वैद्य राजीव कानिटकर