डॉ. राकेश भदाडे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रोगप्रतिकारकशक्तीचा मारेकरी गेल्या आठवडय़ात औरंगाबाद येथील सहा हजारांहून अधिक नागरिकांना पोटविकार झाल्याची माहिती उघड झाल्यानंतर इतर सर्व महानगरपालिकांनी आपआपल्या भागांत प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. गॅस्ट्रोएन्टरायटिस हा आजार दूषित पाणी व उघडय़ावरील अन्नपदार्थातून पसरतो. हा आजार इतर विषाणूजन्य आजारांप्रमाणे साधा वाटत असला तरी याचा परिणाम रुग्णाच्या रोगप्रतिकारकशक्तीवर होतो.

पावसाळा संपल्यानंतर दूषित पाण्यातून पसरणाऱ्या आजारांचा फैलाव वाढतो. यामध्ये गॅस्ट्रो हा आजार प्रामुख्याने दिसून येतो. विषाणू, जिवाणू, बुरशी, परजीवी यांच्या संसर्गामुळे गॅस्ट्रो हा आजार होतो. दूषित पाण्यासोबतच शिळे, अस्वच्छ ठिकाणी तयार केलेले अन्न, उघडय़ावर ठेवलेले पदार्थ यावाटे हा संसर्ग होऊ शकतो. उलटय़ा-जुलाब ही ‘गॅस्ट्रोएन्टरायटिस’ची प्रमुख लक्षणे आहेत. या आजारातून रुग्णांना आजाराच्या सुरुवातीच्या काळात पोटात मुरडा येतो, उलटय़ा आणि जुलाब होतात. दूषित पाणी वा अस्वच्छ अन्न पोटात गेल्यानंतर पुढील १२ ते ७२ तासांमध्येच हा त्रास सुरू होतो. काही रुग्णांमध्ये याची लक्षणे तीव्र असतात. अगदी दिवसाला २० ते ३० उलटय़ा आणि त्याच प्रमाणात जुलाब होतात. अनेकदा उलटय़ा, जुलाब याबरोबरच ताप येणे, अंगदुखी अशी लक्षणेही दिसून येतात. ‘कॉलरा’ आणि ‘शिगेलोसिस’ हे गॅस्ट्रोएन्टरायटिसचेच प्रकार आहेत. कॉलरामध्ये अगदी भाताच्या पाण्यासारखे पांढरे पातळ जुलाब होतात. ‘शिगेलोसिस’मध्ये शौचावाटे रक्त पडते.

काही खाल्ल्यानंतर जुलाब होणे किंवा उलटी होणे ही गॅस्ट्रोची लक्षणे दिसत असली तरी पाणी पिणे थांबवू नये. इलेक्ट्रॉल पावडर घातलेले पाणी किंवा लिंबू-साखर घातलेले पाणी प्यावे. आणि असे पाणी घोट घोट पित राहावे. प्रत्येक रुग्णाला गॅस्ट्रो या आजारात तीव्र लक्षणे दिसून येत नाहीत. काहींना पोटात मुरडा येऊन दिवसाला दोन ते तीन जुलाब आणि आणि एखादी उलटी होते. जुलाब, उलटय़ा ही लक्षणे तीव्र स्वरूपात दिसत असतील तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉक्टरांनी दिलेल्या औषधांनंतरही उलटय़ा व जुलाब थांबत नसतील तर शरीरातील पाणी व ग्लुकोजचे प्रमाण राखण्यासाठी सलाइन लावण्याची गरज भासते. शरीरातील कमी झालेले पाणी भरून काढण्यासाठी हे आवश्यक आहे. फार काळ जुलाब होत असतील तर त्यामुळे मूत्रपिंडावर परिणाम होऊन तात्पुरत्या काळासाठी मूत्रपिंडाच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो.

लहान मुलांची रोगप्रतिकारकशक्ती कमी असते. त्यांना गॅस्ट्रो हा आजार झाल्यास खूप त्रास सहन करावा लागतो. या आजारात अतिसार व उलटी होत असल्याने शरीरातील पाणी कमी होते. यातून अशक्तपणा वाढतो. लहान मुले शाळेत किंवा बाहेर खाण्याकडे लक्ष देत नाहीत. खाण्यापूर्वी हात धुण्याचा कंटाळा करतात. त्यामुळे लहान मुलांच्या खाण्या-पिण्याकडे अधिक कटाक्षाने लक्ष द्यावे.

गॅस्ट्रोएन्टरायटिस म्हणजे काय?

गॅस्ट्रो म्हणजे पोट आणि आतडय़ांना सूज येणे. विषाणू किंवा जिवाणू संसर्गामुळे होत असलेल्या या आजारात पोट दुखणे, उलटी होणे, तोंड कोरडे पडणे, मूत्रविसर्जन कमी होणे, वारंवार पातळ जुलाब होणे अशी लक्षणे दिसतात.

काळजी काय घ्यावी?

पावसाळ्यात व त्यानंतरही पाणी उकळून व गाळून पिणे हिताचे. घराबाहेर जाताना व सहलींच्या वेळीही पाण्याची बाटली सोबत ठेवावी. रस्त्यावरील बर्फाचा वापर केलेले थंड पेय, बर्फाचा गोळा खाऊ नये. अस्वच्छ परिसरातील अन्नपदार्थ खाणे टाळावे. पाणीपुरी किंवा तत्सम पदार्थ खाताना विक्रेत्याचे हात स्वच्छ आहेत की नाहीत याची खात्री करून घ्यावी किंवा विक्रेत्याला हातमोजे घालण्याचा सल्ला द्यावा. मधुमेह, रक्तदाब यांसारखे आजार असलेले रुग्ण किंवा रोगप्रतिकारकशक्ती कमी असलेल्या रुग्णांनी बाहेरील पाणी कटाक्षाने टाळावे. पाणी उकळून थंड झाल्यावर फार काळ तेच पाणी पिणे टाळावे. उलटय़ा व जुलाब त्रास होत असल्यास साखर आणि लिंबू घातलेले सरबत, इलेक्ट्रॉल वा ओआरएस घेता येईल. या आजारात पचनक्रिया मंदावते. त्यामुळे पचावयास हलके अन्नपदार्थ खावेत. अशा वेळी ताक, दही, मुगाची कमी मसाल्याची खिचडी, भाताची पेज चालू शकते. काहीही खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावेत. वापरण्यापूर्वी पालेभाज्या, फळे स्वच्छ धुऊन घ्या. त्याबरोबरच मटण व चिकन व्यवस्थित शिजवून घ्या. असे पदार्थ अर्धकच्चे राहिल्यास जिवाणूंचा प्रसार होऊ शकतो. त्यामुळे मांसाहार कूकरमध्ये शिजवणे केव्हाही चांगले. हा आजार प्रामुख्याने दूषित पाण्यातून होत असल्याने घरात पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या व्यवस्थित स्वरूपात आहेत की नाहीत याची तपासणी करून घ्यावी.

मराठीतील सर्व लोकआरोग्य बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Issue of gastro stomach flus