डॉ. अविनाश गावंडे
नवजात अर्भके पहिल्या तीन दिवसांत प्रकृतीने खूप नाजूक असतात. पहिल्या काही दिवसांत बाळांना त्यांच्या शरीराची ऊब राखता येत नाही. त्यामुळे बाह्य़ वातावरणातील कमी तापमानाशी आपोआप जुळवून घेणे त्यांना जमत नाही. विशेषत: हिवाळा व पावसाळ्यात बाळांना ऊबदार वातावरणात ठेवण्याची आवश्यकता असते. बाळ एक वर्षांचे होईपर्यंत त्याच्या शरीराचे तापमान योग्य ठेवणे गरजेचे असते.
नवजात अर्भकांच्या वजनाच्या तुलनेत त्यांचा ‘बॉडी सरफेस एरिया’ जास्त असतो. त्यामुळे त्यांच्यात अंग गार पडण्याचे प्रमाण तुलनेने अधिक असते. शिवाय कमी वजनाच्या बाळांच्या त्वचेखाली चरबीचे प्रमाण कमी असते. त्यातही शरीरात उष्णता निर्माण होण्यासाठी मदत करणाऱ्या ‘ब्राऊन फॅट’चे प्रमाण कमी असल्यामुळे शरीराच्या तापमानाच्या नियंत्रणासाठी शरीरच तयार करत असलेली यंत्रणा त्यांच्यात नीट काम करत नाही. परिणामी त्यांच्या शरीरातून विविध कारणांमुळे उष्णता घटत असते.
बाळ गार पडलेले कसे ओळखावे?
- बाळाच्या काखेत किंवा गुदद्वारात थर्मामीटर ठेवून त्याच्या शरीराचे तापमान पाहिले जाते. यात काखेतले तापमान घरीही बघता येईल. त्यासाठी बाळाच्या काखेत थर्मामीटर ३ मिनिटे लावून तापमान बघावे.
- बाळ गार पडण्यास वैद्यकीय भाषेत ‘हायपोथर्मिया’ असे संबोधले जाते. बाळाच्या शरीराचे तापमान ३६.५ अंश सेंटीग्रेड असेल तर त्याला सौम्य ‘हायपोथर्मिया’ आहे असे समजावे, तापमान ३६ अंश सेल्सिअस असेल तर मध्यम ‘हायपोथर्मिया’, आणि ३२ अंश सेंटिग्रेड असेल तर गंभीर ‘हायपोथर्मिया’ आहे असे समजावे.
- गंभीर ‘हायपोथर्मिया’मध्ये तातडीने वैद्यकीय मदतीची गरज असते. सौम्य ‘हायपोथर्मिया’त स्थिती दखल घेण्याजोगी आहे असे समजून पुढील उपाययोजना करावी, तर मध्यम स्थितीत लगेच ऊबेची गरज असते.
- बाळाच्या तळपायाला, पोटाला वा डोक्याला स्पर्श करूनही गार पडण्याबाबत अंदाज येतो. बाळाचा तळपाय थंडगार व पोट ऊबदार असेल तर बाळ ‘कोल्ड स्ट्रेस’मध्ये (शीत ताण) आहे असे समजावे, तर ‘हायपोथर्मिया’त पोट व तळपाय दोन्हीचा स्पर्श थंड लागतो. एरवी दोन्ही ऊबदार असते.
- गार पडलेले- ‘कोल्ड इंज्युरी’ झालेले बाळ मलूल दिसते, अंगावर टिचकी मारली तरी प्रतिसाद देत नाही, त्याचे रडणे क्षीण व हालचाली मंदावलेल्या असतात. ते दूध पीत नाही. बाळाच्या त्वचेला हात लावला तर त्याचे स्नायू कडक झालेले असतात. गार पडण्याचा गंभीर त्रास झाला तर बाळाच्या प्रकृतीत आणखीही गुंतागुंती होऊ शकतात. अशा वेळी वेळीच उपचार केले नाहीत तर मृत्यूही येण्याची भीती असते.
बाळाच्या शरीरात ऊब कशी ठेवावी?
नवजात बाळाच्या शरीराचे तापमान साधारणत: ३६.७ ते ३७.५ अंश सेंटिग्रेड असते. बाळाचा जन्म होतो त्या वेळी त्याच्या अंगाला गर्भजल लागलेले असते. जन्म झाल्यावर बाळाला पुसले नाही तर गर्भजलाचे बाष्पीभवन होताना बाळाच्या शरीरातील उष्णता कमी होऊ शकते. बाळाला एकीकडून दुसरीकडे हलवताना ते थंड वस्तूच्या संपर्कात आले किंवा थंड हवेचा झोत बाळाच्या अंगावर आला तरी ते गार पडू शकते. काही साध्या गोष्टींनी बाळ गार पडणे टाळता येईल.
- बाळाला नेहमी कोरडे ठेवा. बाळाने शू केलेले ओले कपडे त्याच्या अंगावर तसेच ठेवू नका.
- बाळाला आंघोळ घालताना फार वेळ उघडे ठेवू नका.
- बाळ इकडून तिकडे घेऊन जाताना उबदार दुपटय़ात गुंडाळून न्या. बाळाला पुरेसे कपडे घाला, तसेच डोक्यावर टोपी घाला.
- बाळाचे वजन करताना वजन काटय़ावर चादर ठेवा.
- बाळंतपण झालेल्या खोलीत हवेचा झोत येणे टाळावे.
- बाळाला आईजवळ देतानाही उबदार कपडय़ात गुंडाळून ठेवायला हवे.
- बाळाचा जन्म झाला ती खोली ऊबदार हवी, त्या ठिकाणी वातानुकूलित यंत्रणा लावू नका. खोलीचे तापमान २५ अंशांपेक्षा अधिक तर बाळाला ठेवलेल्या कोपऱ्याचे तापमान ३० अंशापेक्षा थोडे अधिक असणे चांगले. पंखा जोरात लावू नका. तसेच थंड हवामान असताना दारे-खिडक्या उघडय़ा टाकू नका.
- काही ठिकाणी बाळाला ऊबदार ठेवण्यासाठी त्याच्यापासून काही अंतरावर २०० व्ॉटचा दिवा लावतात. परंतु ऊबेसाठी ते पुरेसे नसून प्रसंगी दिवा फुटण्याची भीती असल्यामुळे ते शक्यतो टाळावे. तसेच काही जण गरम पाण्याच्या बाटल्यांचा वापर करतात. पण त्याने बाळाला भाजण्याची शक्यता असते
- बाळाच्या त्वचेचा मातेच्या त्वचेशी संबंध येऊ द्या. त्याद्वारे नवजात बाळाला ऊब मिळेल. ही पद्धत ‘कांगारू मदर केअर’ या नावाने अनेक ठिकाणी वापरात आहे.
- नवजात बाळांना लगेच आंघोळ घालू नका. दोन दिवसांनंतर आंघोळ चालू शकेल, पण त्याआधी त्यांना फक्त पुसून काढा. वजन कमी वजनाचे वा अपुऱ्या दिवसांचे असेल तर त्यांना गार पडण्याचा धोका अधिक असतो, त्यामुळे त्यांचे वजन जोपर्यंत किमान २ किलो होत नाही तोपर्यंत आंघोळ नको. याला काही आठवडेही लागू शकतात.
- बाळाला मालिश करायचे असेल तरी बाळाचे वजन ३ किलोपेक्षा अधिक झाल्यावर करा. बाळाच्या कान व नाकात तेल टाकू नका
(शब्दांकन- संपदा सोवनी)