तिखट-मीठ लावलेली कैरी बघून कुणाच्या तोंडाला पाणी सुटले नाही तरच नवल. आता तर आंबासुद्धा मोठय़ा प्रमाणावर बाजारात यायला लागला आहे. उन्हाळ्यातच प्रामुख्याने मिळणाऱ्या कैरी आणि आंब्यांचे आरोग्यासाठीही खूप फायदे आहेत.
कैरीचा आंबा तयार होतो, तसे त्यात ‘अ’ जीवनसत्त्व तयार होते आणि तिचा रंगही बदलत जातो. या दोन्ही फळांमध्ये आपापल्या परीने आरोग्यदायी गुणधर्म आहेत.
कैरी-
कैरी थंड प्रकृतीची असते. उन्हाळ्यात मुळातच हवामान उष्ण असल्यामुळे कैरीचे लोणचे, मुरांबा, पन्हे असे पदार्थ या दिवसांत चाखणे उत्तम.
* या दिवसांत घाम खूप येत असल्याने शरीरातील क्षार घामावाटे निघून जातात. स्नायू दमतात व थकवा जाणवतो. कैरीत सोडियम आणि पोटॅशियमचे प्रमाण चांगले असल्यामुळे क्षारांची परिपूर्ती होते. शिवाय कैरीत मॅग्नेशियमही असते. ते स्नायू शिथिल करण्याचे (मसल रीलॅक्संट) काम करते.
* ‘सी’ व ‘के’ जीवनसत्त्वेही कैरीत आहेत. अनेकांना उन्हाळ्यात घोळणा फुटण्याचा त्रास होतो. अशा वेळी रक्त येणे बंद होण्यासाठी ‘सी’ व ‘के’ जीवनसत्त्वे मदत करतात. ‘सी’ जीवनसत्त्वामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासही मदत होते.
* कैरीचे सरबत किंवा पन्हे करताना त्यात वेलची घाला. तसेच कच्च्या कैरीचे पन्हे व लोणच्यात काळ्या मिरीची पूड जरूर घाला. कच्च्या कैरीत आंबटपणा अधिक असल्यामुळे त्यामुळे घशाचा त्रास होऊ शकतो. तो टाळण्यासाठी मिरपूड फायदेशीर.
* कैरी वापरताना ती किमान दोन तास पाण्यात बुडवून ठेवावी म्हणजे त्याचा चीक निघून जाईल. हीच काळजी आंब्यांच्या बाबतीतही घ्यावी. काहींना या चिकाची अ‍ॅलर्जी असू शकते व त्यामुळे अंगावर पित्ताच्या गाठी उठण्यासारखा त्रास होऊ शकतो.
आंबा-
* आंब्यात प्रामुख्याने ‘अ’ जीवनसत्त्व असते. डोळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी ते चांगले. आंब्यातील ‘ल्यूटिन’ व ‘झियाझँथिन’ ही तत्त्वेदेखील डोळ्यांना अतिनील किरणांपासून संरक्षण मिळण्यात मदत करतात. ‘अ’ जीवनसत्त्व शरीरात साठवून ठेवले जाते व शरीर पुढे बराच काळ ते वापरत असते.
* आंब्यातील ‘बी ६’ जीवनसत्त्वामुळे शरीरातील ‘होमोसिस्टेन’ची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.
होमोसिस्टेन वाढले तर हृदयातील रक्तवाहिन्यांना (कोरोनरी आर्टरीज) त्रासदायक ठरू शकते.
* ‘पेप्टिन’, रेस्व्हरट्रॉल’ ही दोन्ही तत्त्वेही आंब्यात असतात. शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल (एलडीएल) बाहेर टाकण्यासाठी त्यांची मदत होते. त्यामुळे आंबा योग्य प्रमाणात खाल्ल्यास हृदयाला हितकर.
* आंबा थोडा सारक गुणधर्माचा असतो. आंब्याची कोय मात्र त्यावर उतारा असतो. आंब्याच्या कोयीतील गर आंब्यामुळे
होणाऱ्या जुलाबांवर उतारा म्हणून वापरला जातो.
* आमरस खाताना त्यात तूप व मिरपूड अवश्य घालावी. आंबा काही प्रमाणात गॅसेस निर्माण करणारा असल्यामुळे तूप-मिरपुडीमुळे तो चांगला पचतो
*‘कॅल्शियम कार्बाइड’ची पावडर लावलेला आंबा टाळावा. गवतात आढी घालून नैसर्गिकरीत्या पिकवलेले आंबे चांगले. खाण्याआधी ते दोन तास पाण्यात भिजवून ठेवावेत.
डॉ. संजीवनी राजवाडे – dr.sanjeevani@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा