डॉ. सागर मुंदडा, मानसोपचारतज्ज्ञ
लठ्ठपणावर मात करण्यासाठी धावणे, चालणे, व्यायाम करणे असे शारीरिक व्यायाम केले जातात. मात्र लठ्ठपणासाठी मानसिकताही कारणीभूत असते. त्यामुळे शारीरिक व्यायामाबरोबर मानसिक स्वास्थ्य सुधारणाऱ्या उपचारांची मदत घेतली तर लठ्ठपणावर मात करता येते.
लठ्ठपणा वाढवणारे मानसिक आजार
नैराश्य : दैनंदिन जीवनातील विविध कारणांमुळे येणारे नैराश्य वजन वाढण्याचे महत्त्वाचे कारण आहे. नैराश्यग्रस्त रुग्ण खूप कमी खातात आणि वजन कमी झाल्यामुळे अशक्तपणा येतो. मात्र हा प्रकार सर्वच रुग्णांबाबत होत नाही. बहुतांश रुग्ण मानसिक अस्थैर्य व नैराश्यांमुळे अधिक खातात. या आजारात रुग्णाचा आहार तिपटीने वाढतो. त्या तुलनेत शारीरिक हालचाल किंवा व्यायाम केला जात नाही आणि दिवसागणिक वजन वाढत जाते.
सतत खाणे : हा मानसिक आजार बहुतांश महिलांमध्ये आढळतो. बिघडलेले मानसिक स्थैर्य पुन्हा मिळवण्यासाठी रुग्ण सतत खात राहतो. असुरक्षिततेची भावना, आत्मविश्वासाचा अभाव यांसारख्या भावना सातत्याने येत राहिल्यास त्यावर नियंत्रण आणण्यासाठी किंवा या भावना विसरण्यासाठी खाण्याचे प्रमाण वाढते. ही कृती इतक्या नकळतपणे घडत असते की ते संबंधित व्यक्तीच्या लक्षातही येत नाही. सतत खात राहिल्यामुळे आपल्यातील कमतरतेवर दुर्लक्ष होईल अशा समजातून दोन तासांच्या अंतराने खूप खाल्ले जाते. अनेकदा पोटभर जेवण झाल्यानंतर काही मिनिटांनी पुन्हा खाण्याची इच्छा निर्माण होते. मात्र कालांतराने मन:स्थिती सुधारली नसल्याचे लक्षात आल्यावर दोषी वाटत राहते. आपले वजन वाढेल अशी भीती रुग्णाच्या मनात निर्माण होते. यातून मानसिक आरोग्य पुन्हा बिघडते. हीच परिस्थिती काही तासांनी पुन्हा निर्माण होते. हा आजार तरुण महिलांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येतो आणि कालांतराने लठ्ठपणा या आजारालाही तोंड द्यावे लागते.
बुलिमिआ नवरेसा : या आजारात खूप खाल्ले जाते, मात्र त्यातून निर्माण झालेल्या दोषीपणावर मात करण्यासाठी खाल्लेले अन्न विविध पद्धतीने बाहेर काढले जाते. सतत खाणे आणि खाल्लेले अन्न शरीराबाहेर काढणे या दोन्ही आजारांत बरेच साधम्र्य आहे. या आजारात अनेकदा ओकारी काढून अन्न बाहेर काढले जाते, तर काही वेळा औषधांचाही वापर केला जातो. या प्रकारामुळे रुग्णाच्या चयापचय क्रियेत असंतुलन निर्माण होते आणि झपाटय़ाने वजन वाढते.
नैराश्यात वाढ
अतिलठ्ठपणामुळे रुग्णांना घराबाहेर पडणे अवघड होते. आत्मविश्वास कमी असल्यामुळे व अनेक कामांसाठी इतरांवर अवलंबून राहावे लागत असल्यामुळे परावलंबन वाढते. लठ्ठपणाची खिल्ली उडवली जाईल, आपण इतरांसारखे नाही किंवा आपल्यात कमतरता आहे या विचारांनी त्यांच्यामध्ये नैराश्य हा आजार अधिक दिसून येतो.
ऑप्स्ट्रक्टिव क्लिप अॅप्निया
अतिलठ्ठपणामुळे श्वसननलिकेचा आकार लहान होतो. त्यामुळे रुग्णाला झोपेच्या दरम्यान श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो. यात काही तासांच्या अंतराने १० ते १५ सेंकद रुग्णाला श्वास घेता येत नाही आणि सतत झोपमोड होत राहते. रात्रीची गाढ किंवा चांगली झोप न झाल्यामुळे जीवनशैलीजन्य आजार निर्माण होतात. अनेकदा रुग्णाला झोपेच्या समस्याही होतात.
उपचार
नैराश्यामुळे दैनंदिन आयुष्यात बदल होत असल्याचे लक्षात आल्यावर डॉक्टरांचा सल्ला घ्या. सतत खाणे व खाल्लेले अन्न शरीराबाहेर काढणे अशा प्रकारच्या क्रिया जर सातत्याने होत असतील तर या मानसिक आजाराची लागण होण्याची शक्यता आहे. यासाठी तज्ज्ञांकडून सल्ला घेणे आवश्यक आहे. अशा आजारांमध्ये समुपदेशनासोबत औषधे देऊन उपचार केले जातात. योगा व व्यायामाच्या माध्यमातून मानसिक आरोग्य सुधारणे शक्य असते, तसेच श्वासावर नियंत्रण ठेवणारे व्यायाम केल्याने मानसिक आजारावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. वारंवार पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. सतत खात असल्याचे लक्षात आल्यावर रुग्णाने अंकमोजणी सुरू करण्याची पद्धत आजारात खाण्यावरील लक्ष दुर्लक्षित करण्यास मदत करते. मानसिक आजारावरील रुग्णांसाठी हे उपचार सोपे नसले तरी कालांतराने हे साध्य होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे समुपदेशनातून रुग्णाला मानसिक आजार किंवा अस्थिरता निर्माण होण्याची नेमकी कारणे जाणून घेण्यास मदत केली जाते. रुग्णाने मानसिक आजार स्वीकारून त्यावर उपचार करावे. अनेकदा हे मानसिक आजार आनुवंशिकही असू शकतात.