या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खेळ.. मग ते मैदानी असो की बैठे, त्यांचा मेंदूच्या विकासासाठी चांगला उपयोग होतो. विचार करणे, क्लृप्त्या लढवणे, व्यायाम असे व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक घटक खेळांमध्ये असतात. मात्र गेल्या काही वर्षांत ऑनलाइन गेमच्या आभासी दुनियेत कोणत्याही प्रतिस्पध्र्याशिवाय एकटीच जिंकत चाललेली मुले पाहून ‘खेळू नका’ असे सांगण्याची वेळ आली आहे. सध्या तरुणांना झपाटणाऱ्या ‘पोकेमॉन-गो’ या ऑनलाइन गेमच्या निमित्ताने दुर्बल करणाऱ्या गेमच्या जगाचा मानसिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून घेतलेला वेध..

गेमच्या वेडापायी सध्या अनेक जण रस्ते धुंडाळून काढत असून, वाहतुकीच्या नियमांना बाधा ठरणारे ‘पोकेवॉक’ आयोजित करत आहेत. यामुळे काहीजणांचे अपघात झाल्यावरही या खेळाचे गारुड लोकांच्या मनावरून उतरलेले दिसत नाही. ‘पोकेमॉन गो’ हा या ऑनलाइन खेळांमधील पुढचा टप्पा असला तरी आभासी जग निर्माण करणाऱ्या व्हिडीओ गेमची सुरुवात खूप आधीपासून झाली आहे.

संगणक जगात स्थिरस्थावर होत असतानाच व्हिडीओ गेमने जगाच्या दारावर टकटक करण्यास सुरुवात केली होती. १९८० च्या दशकाच्या सुमारास ‘अटारी २६००’ हा व्हिडीओ गेम आला. त्यानंतर आजवर या व्हिडीओ गेमचे असंख्य प्रकार व तंत्रज्ञानातील अमूलाग्र बदल यामुळे सध्याचे आभासी जग निर्माण करणारे व्हिडीओ गेम वापरात आहेत. सध्या हे व्हिडीओ गेम तयार करणाऱ्या कंपन्या अर्थाजनासाठी नव-नवीन क्लृप्त्या लढवत असून ‘पोकेमॉन-गो’ हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. मात्र यातून एक संपूर्ण पिढी विकलांग होईल, अशी भीती मानसोपचारतज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

या आभासी जगाचा आनंद लुटणाऱ्या प्रत्येकालाच कधी ना कधी या व्यसनाचा फटका बसतो. कधी बस चुकते, ट्रेन चुकते, काही वेळा गेमच्या नादात पुढच्या स्थानकावर उतरून मागे फिरण्याची वेळ येते, कधी महत्त्वाचा फोन टाळला जातो, कधी अभ्यास, करिअर व असाइनमेंटचे बारा वाजतात. बाहेरच्या आयुष्यातील ताणतणाव विसरून फक्त स्वत:च्या जगात, जिथे घडणाऱ्या पराभवाचा वास्तवात कोणताही फटका बसणार नाही, अशा जगात राहण्याच्या ओढीने शिक्षण, करिअर बाजूला ठेवणारे काही रुग्ण मानसोपचारतज्ज्ञांकडे येतात. इंटरनेट पिढीत जन्माला आलेली लहान मुले आणि तरुण यात प्रामुख्याने बळी पडत असून त्यांना चिडचिड, एकलकोंडेपणा, नराश्य असे मानसिक विकार तसेच डोळ्यांचे विकार जडल्याचे दिसून येते. हे गेम खेळताना मानवी मेंदू उत्तेजित होतो आणि या उत्तेजित मेंदूला अधिकाधिक उत्तेजित करण्याचे कार्य हे व्हिडीओ गेम करत असतात. खरे तर गेमचे नव्हे तर गेम खेळताना होणाऱ्या उत्तेजनाचे व्यसन मानवी मेंदूला जडलेले असते. या मेंदूच्या अंतर्गत प्रक्रियेचा फरक गेम खेळणाऱ्याच्या समाजात वावरण्याच्या क्रियांवर होतो. यातूनच बहुतेकांचे परिवर्तन मनोरुग्णात झालेले दिसते.

गेममुळे मानसिक आरोग्य का बिघडते?

मानवी मेंदू हा संवेदना, भावना, विचार करणे, आज्ञा देणे या चार पातळ्यांमधून लोक व्यवहारात व्यक्त होत असतो. प्रतिक्षिप्त क्रिया वगळता संवाद साधणे, नियमित कामे करणे या वेळी या चार पातळ्यांचा सयंतपणे वापर होत असतो. मात्र, जितके काम किचकट व गुंतागुंतीचे तितके मेंदूच्या या चार पातळ्यांचे काम वाढीस लागते. नेमके व्हिडीओ गेम हे खूप किचकट असून त्यात यश मिळवण्यासाठी या चारही पातळ्यांचा कस लागतो. या गेमच्या वारंवार खेळण्याने मानवी मेंदूला उत्तेजना मिळण्यास सुरुवात होते. गेममधील क्रियांना प्रतिक्रिया देण्याची वेळ अधिक येते तितकेच या गेममधून उत्तेजना वाढीस लागते व पर्यायाने मेंदूला एकप्रकारे उत्तेजनांचा मोहच अधिक होतो. याला शास्त्रीय भाषेत ‘ओव्हर स्टिम्युलेटेड ब्रेन’ म्हणतात. या उत्तेजना वारंवार न मिळाल्यास मानवी शरीरावर त्याचा परिणाम होतो. यातूनच चिडचिडेपणा, एखादी गोष्ट मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाणे, एकांगी होणे, समाजाभिमुख नसणे, आभासी जगण्याची ओढ अशा प्रकारचे मानसिक आजार जडतात. असे याबाबत माहिती देताना मानसोपचारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे यांनी सांगितले.

पारंपरिक खेळांहून प्रभावी का ठरतात?

शारीरिक खेळ व बठे खेळ यात स्पर्श असलेले व स्पर्श नसलेले असे दोन प्रकार पडतात. ज्यात जय आणि पराजय हे प्रमुख घटक असतात. हे खेळ खेळण्यासाठी खेळाडू एक विशिष्ट योजना मनात आखून त्याद्वारे आपल्या कौशल्यांचा वापर करत असतो. यातील बरेच खेळ परस्पर विरोधात खेळले जातात. त्यात समोरच्याशी थेट स्पर्धा असते आणि हे अनेकांना आवडत असतं. मात्र या खेळांमध्ये प्रत्येक जण यशस्वी होताना दिसत नाही. काही ठरावीक जणच यात उत्तुंग खेळ करत असल्याचे आपण पाहतो. मात्र, व्हिडीओ गेम हे कोणालाही खेळता येतात. त्यात रंग, संगीत, पात्र यातून वेगळे जग आपल्यासमोर उभे राहत असते. त्यातील पात्र व अन्य वस्तू या वेगात क्रिया-प्रतिक्रिया करत असतात. यातून एखाद्या सामान्यालाही त्या खेळाची मजा अनुभवता येते. त्यामुळे त्यातून मिळणारी उत्तेजना ही शारीरिक खेळांपेक्षाही अधिक असते. वास्तवाचा आभास निर्माण झाल्याने अनेक जण या व्हिडीओ गेम्समध्ये रमतात. त्यात सध्या मदाने कमी होत असून संगणकासमोर बसण्याची कामे वाढत आहेत. अशी माहिती मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आशीष देशपांडे यांनी दिली.

या गेममुळे व्यसनी झालेल्या प्रत्येकाचे मनोव्यवहार कुंठित होत असून  ‘अति उत्तेजनेने’ मानसिक आरोग्य धोक्यात येत चालले आहे. याला मुले, तरुण, त्यांना गेम खेळू देणारी पालक मंडळी व बाजारपेठेत गेमच्या निर्मितीत सहभागी असलेले असे सगळेच घटक कारणीभूत आहेत. पोकेमॉनसाठी रस्त्यावर इतरत्र लक्ष न देता गेममध्ये लक्ष देऊन चालण्याचे जाहीर कार्यक्रम करण्यापर्यंत तरुण मंडळींची मजल गेल्याने या गेमद्वारे मानसिक आरोग्याला तिलांजली देण्याचेच हे प्रकार असल्याचा काळजीचा सूर सध्या मानसोपचारतज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

कोणती काळजी घ्याल?

  • मुलांच्या हातात नवे तंत्रज्ञान सोपवताना त्याचा वापर कसा करावा हे मुलांना समजावून सांगितले पाहिजे.
  • मुलांच्या हाती संगणक दिला म्हणजे आपली सुटका झाली ही पालकांची वृत्ती चुकीची आहे.
  • मुलांचे आई-वडील हे स्वत:च तंत्रज्ञानावर अवलंबून असतात, त्यामुळे त्यांची मुले त्यांच्या पावलावर पाऊल टाकतात. हा मुलांपुढचा चुकीचा आदर्श आहे.
  •  मुलांना गेम खेळायला देतानाच त्यांचा ओढा अन्य शारीरिक खेळांकडे वळवणे हे तितकेतच महत्त्वाचे आहे.
  • व्हिडीओ गेमच्या आहारी गेलेल्या मुलांना दरडावून नव्हे तर मानसोपचारतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने समुपदेशन करावे.
  • मुलांसोबत पालकांचेही तज्ज्ञांकडून समुपदेशन करून घेणे आवश्यक आहे.

खेळातून बाहेर पडण्यासाठी..

महेश हा १२ वीला असणारा वाणिज्य शाखेतील महाविद्यालयीन विद्यार्थी. शाळेपासूनच अभ्यासात अत्यंत हुषार. अभ्यासासाठी इंटरनेटच्या संपर्कात आल्यावर महेशला मात्र इंटरनेटवर गेम खेळण्याचे वेड लागले. त्याच्या पालकांनी सुरुवातीला दुर्लक्ष केले. मात्र, महेश रात्रीचे चार-पाच वाजेपर्यंत गेम खेळू लागला. या वेळी त्याला पालक अडवायला गेले की, तो घरात मोडतोड करत असे. त्याला या गेममध्येच करिअर करायचे आहे, असेच तो पालकांना वारंवार सांगे. याने पछाडलेल्या महेशला अखेर मानसोपचारतज्ज्ञांकडे न्यावे लागले. महेशवर मानसोपचार करून त्याला औषेधेही द्यावी लागली, तेव्हा महेश पूर्णत: बरा झाला. सध्या महेश चार्टर्ड अकाऊंटंट झाला आहे, असे त्याच्यावर उपचार करणारे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आशीष देशपांडे यांनी सांगितले.

sanket.sabnis@expressindia.com